अमित शहांमध्ये शिवसेना फोडण्याची हिंमत नाही – संजय राऊत

News
Spread the love

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोरील सुनावणीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात आहे. ठाकरे गटाने शिवसेना फुटीचे खापर थेट भाजपवर फोडले होते. त्यातही या फुटीमागे भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. त्यावर भाजपकडूनही पलटवार करण्यात येत होते. मात्र, आता या विषयामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना फोडण्याची अमित शहा यांची हिंमत नसल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी अमित शहा यांना क्लिनचीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राऊत यांच्या या विधानावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत हे मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदेंना सुद्धा ईडी आणि सीबीआयने फोडले. अमित शहा यांच्यात शिवसेना फोडण्याची हिंमत नाही, असे संजय राऊत म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या स्वागताचे फलक शिंदे गटाने लावले आहे. त्यावरून टीका करताना राऊत यांनी हे विधान केले.

नड्डा यांच्या स्वागताचे फलक मुख्यमंत्र्यांनी लावले. काय वेळ आली. अरे बाळासाहेब ठाकरे यांचे चेले म्हणवता आणि नड्डा यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लावता? ही वेळ आली तुमच्यावर? ही लुच्चेगिरी, ही लाचारी? तुम्ही शिवसेना म्हणताय ना स्वत:ला? असली शिवसेना आहात तर हे कुठून आले? याचे काय स्वागत करता? ही कोणती शिवसेना आहे? ही तर चायना मेड शिवसेना आहे. हा चायनाचा माल आहे हा, असा हल्लाबोल राऊत यांनी शिंदे गटावर चढवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊत यांनी खोचक टीका केली. सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. दिल्लीवाले या सरकारच्या चड्डीचा नाडा कधीही सैल करतात. कधीही टाईट करतात. मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री पळत पळत दिल्लीत जातात. जेव्हा बघावे तेव्हा मुख्यमंत्री कुठे तर अमित शहांना भेटायला गेले. मुख्यमंत्री कुठे आहेत विचारले तर माहिती पडते ते दिल्लीला गेले. मुख्यमंत्री कुठे तर मुख्यमंत्री दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बसले. मग इथे कोण आहे? इथे कोण सरकार चालवणार? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री उठसूट दिल्लीला जात आहेत. इथे सरकारी रुग्णालयात लोक मरत आहेत. १५०हून अधिक लोक आठ दिवसात दगावले आहेत. नागपूर, नांदेड, संभाजीनगर आणि इतर ठिकाणाहून बातम्या येत आहेत. सरकार कुठे आहे? मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. नक्षलवादावर चर्चा करत आहेत. जेवढे लोक नक्षलवाद्याच्या हल्ल्यात महाराष्ट्रात दगावले नाहीत. तेवढे लोक आठ दिवसात सरकारी रुग्णालयात मेले आहेत. ही जबाबदारी सरकारची नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.

 94 Total Likes and Views

0 Comments

No Comment.