जानेमन तुम कमाल करते हो! -डॉ अनिल पावशेकर

News Sports
Spread the love

जवळपास एक वर्षापूर्वी टी ट्वेंटी विश्वचषक २०२२च्या उपांत्य लढतीत इंग्लंडने टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता. अर्थातच रोहीत ॲंड कंपनीला हा हिशोब चुकता करायला या एकदिवसीय विश्वचषकात नामी संधी चालून आली आणि त्यांनी त्या पराभवाचा पुरेपूर वचपा काढला आहे. इंग्लिश संघाच्या दहा विकेट्स घेत भारतीय संघाने तब्बल शंभर धावांनी बटलर कंपनीला सडेतोड उत्तर दिले आहे. बॅझबॉलच्या गुर्मीत वावरणाऱ्या इंग्लिश संघाला अवघ्या १२९ धावांत नेस्तनाबूत करत टीम इंडियाने आपला बदला पुर्ण केला आहे.

झाले काय तर लखनौची खेळपट्टी अत्यंत नखरेल होती. विशेषतः गोलंदाजांच्या प्रेमात होती तर फलंदाजांना चकवणारी होती. बॅकफूट असो फ्रंट फूट, फलंदाजांना दोन्ही जागी डोळे फाडून संयम राखून फलंदाजी करणे अपेक्षित होते. त्यातच इंग्लिश संघाचे वेगवान असो की फिरकी गोलंदाज असो, टिच्चून गोलंदाजी करत असल्याने फलंदाजांची अवस्था माय जेवू घालत नाही, बाप भीक मागू देत नाही अशी होती. त्यातही आतापर्यंतच्या पाच सामन्यात धावांचा पाठलाग केल्याने पहिले लक्ष्य निर्धारित करणे थोडं अवघडच होतं. ज्याप्रकारे ख्रिस वोक्सने शुभमनला उडवले ते पाहता आपल्या संघाची दहीहंडी लवकरच फुटेल अशी शंकेची पाल चुकचुकली होती आणि झालेही तसेच.

या स्पर्धेत अजेय योद्धा म्हणून नावलौकिक असलेल्या विराटची धावबंदी करताच तो हाराकिरी करून बसला. भारतीय संघाची सध्या चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा सर्वात कमजोर बाब आहे. आतापर्यंत आपण आलू से सोना ऐकले होते पण श्रेयस अय्यर कडे पाहता सोन्या सारख्या संधीचे माती करण्याचे श्रेय त्याला नक्कीच द्यावे लागेल. श्रेयसने आखूड टप्प्याच्या चेंडूवर हुकूमत नाही गाजवली तर छोटी हाईट बीग फाईट असलेला ईशान किशन कधीही त्याला खो देऊ शकतो. ४० धावांत तीन बाद ही खरोखरच वाईट स्थिती होती. मात्र अनुभवी रोहीत, राहुलने धीरे धीरे स्कोअर को बढाना है, हद से गुजर जाना है चालू केले होते.

दोघांनी ९१ धावांची बहुमूल्य भागिदारी केली मात्र समोर विली दिसताच राहुलचा संयम सुटला. विलीच्या चेंडूने थोडी उसळी घेताच राहुल फसला. केवळ सहा फलंदाज असल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र पुन्हा एकदा रोहीतने सूर्यासोबत २५ धावा जोडत आशा पल्लवीत केल्या होत्या. एकेक मोती गळत असतांना रोहीतने कर्णधाराची खेळी करताना संयम आणि साहसी फलंदाजीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. रोहीत शतकाला गवसणी घालेल असे वाटतांनाच त्याची घालमेल झाली आणि तो परतला. एव्हाना सूर्या स्थिरावला होता आणि जडेजा सोबत कमीतकमी अडीचशेचा टप्पा गाठून देईल असे वाटत होते. मात्र जडेजा बाद झाला आणि मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य लोप पावले. अखेर सूर्याने मावळण्याच्या पहिले कमालीची फलंदाजी करून आपल्या पाठीराख्यांच्या जीवात जीव आणला.

पन्नास षटकांत २३० धावा आणि ते सुद्धा फलंदाजीत प्रचंड खोली असलेल्या इंग्लिश संघाविरुद्ध म्हणजे ऊंट के मुंहमे जीरा सारखे होते. त्यातही भारतीय संघाला जुना बदला घेऊन, किसी दिन ये तमाशा मुस्कूरा कर हम भी देखेंगे हे दाखवायचे होते. मात्र २३० धावांची राखण करणे म्हणजे नंगा नहायेंगा क्या और निचोडेंगा क्या सारखे कठीण होते. समाधानाची बाब म्हणजे ढालगज बुमराह आणि शार्प शुटर शमी सध्या तुफान फॉर्मात असल्याने कांटे की टक्कर होण्याची शक्यता होती. खरेतर मो. शमी आणि कुलदीप यादव हे दोघेही मुल्यवान परंतु उपेक्षितच होते. मात्र या दोघांनी जबरदस्त कमबॅक दाखवत आपली निवड सार्थ ठरवली होती.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने कोणतीही दयामाया न दाखवता हल्ले सुरू केले होते. विशेषतः सिराजला त्यांनी लक्ष केले. पण पाचव्याच षटकांत बुमराहने इंग्लिश संघाचा पाया खचवला. खतरनाक डेव्हिड मलान आणि जो रूटला मुळापासून उपटून त्याने आपल्या संघाला झक्कास सुरुवात दिली. लगेच रोहीतने आपल्या निर्णय क्षमतेची चुणूक दाखवत मो.शमीला आक्रमणाला लावले. कारण रोहीत जाणून होता, मधुबन खुशबू देता है और शमी विकेट लेता है. शमीने सध्या जी यष्ट्यांची तोडफोड चालवली आहे ते पाहता तो मागच्या जन्मी लाकूडतोड्या असल्याची खात्री पटते. त्याने इंग्लिश संघाचा कणा असलेल्या बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टोला आपल्या धारदार, वेगवान गोलंदाजीने कापून काढले. चार बाद एकोणचाळीस धावसंख्या असतांना कुलदीप आला आणि जोस बटलरचा त्याने घास घेतला. ज्याप्रकारे कुलदीपने तो चेंडू वळवला ते पाहता जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या वनांत नागीण सळसळली असे म्हणावेसे वाटते.

अवघ्या बावन्न धावांत अर्ध्या इंग्लिश संघाचा खुर्दा उडवत भारतीय संघाने सामन्यावर जबरदस्त पकड घेतली होती. मात्र अजूनही त्यांच्याकडे मोईन अली, लीयम लिविंगस्टोन, वोक्स, रशीद खान आणि वुड सारखे अष्टपैलू खेळाडू असल्याने आपल्या गोलंदाजांना उसंत घेऊन चालणार नव्हते. पण अर्धा संघ तंबूत परतल्याने इंग्लिश संघाचा धीर खचला होता‌. तसेच शमी, जडेजा, कुलदीप आणि बुमराहने नाड्या आवळल्याने इंग्लिश संघाची तडफड वाढली होती. मुख्य म्हणजे त्यांचा कोणताही फलंदाज धावांची तिशी गाठू शकला नाही. केवळ तीस धावांच्या दोन भागिदाऱ्या इंग्लिश संघाला तारू शकल्या नाहीत.

टीम इंडियाची या विश्वचषकात वाटचाल पाहता गोलंदाजांची कामगिरी नजरेत भरणारी आहे. जेंव्हा जेंव्हा बळींची गरज भासली तेव्हा तीळा तीळा दार उघड सारखे आपल्या गोलंदाजांनी बळी घेत विजयाचे दार उघडून दिले आहे. गोलंदाजांच्या प्रयत्नांना यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलचे योगदान विसरता येत नाही. क्षेत्ररक्षणाचे काही अपवाद वगळता बरीच सुधारणा झाली आहे. या सामन्यात सूर्याची बॅट तळपल्याने दोनशेचा टप्पा सहज ओलांडला गेला. मात्र शुभमन, विराट, श्रेयस आणि राहुलने महत्वाच्या क्षणी बेजबाबदार फटके मारल्याने संघ अडचणीत आला होता. अखेर फलंदाजांच्या चुकांवर पांघरूण घालत आपल्या गोलंदाजांनी सामना इंग्लंडच्या जबड्यातून खेचून आणला आहे. निश्चितच या सामन्यातील आपल्या गोलंदाजांची नेत्रदीपक कामगिरी पाहता, जानेमन तुम कमाल करते हो असे म्हणावेसे वाटते.


दिनांक ३० ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

 38 Total Likes and Views

0 Comments

No Comment.