गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

Editorial
Spread the love

मुंबई :- आमच्या पक्षातील आमदारांना ५० खोके देऊन तुम्ही आमचे सरकार पाडले. मंत्रालय काबीज केले. कमीत कमी तिथे बसून कामे तरी करा. मुंबईकरांसाठी संघर्ष करत असताना जर गुन्हा होत असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनाही अभिमान झाला असता, आई वडिलांनाही अभिमान आहे कारण त्यांचा मुलगा मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढत आहे. केवळ श्रेयवादासाठी सगळे सुरू आहे. मला याच कारणासाठी फासावर लटकवणार असतील तरी मी मुंबईला लुटू देणार नाही आणि महाराष्ट्राला झुकू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, नवी मुंबईची मेट्रो ५ महिने पूर्ण होऊनही उद्घाटनासाठी रखडली होती. वरळीतील लोअर परेळ ब्रीजही उद्घाटनासाठी सुरू झाला नव्हता. मी तिथला स्थानिक प्रतिनिधी आहे, मला कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे. तिथल्या जनतेला त्रास होतोय, मुख्यमंत्र्यांना या कामासाठी वेळ नाही. जनतेसाठी मी गुन्हा घ्यायला मी तयार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री इतर राज्यात प्रचाराला फिरतात, राज्यातील जनतेच्या कामासाठी त्यांना वेळ नाही. डिलाईल रोडच्या पूलावरील एका लेनचं उद्घाटन गणेशोत्सवात झाले, त्यानंतर दुसरी लेन तशीच ठेवली होती. या पूलाच्या उद्घाटनाला होणाऱ्या दिरंगाईमुळे तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. परवा रात्री आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्ही रस्ता खुला झाल्याचे सांगितले. १० ते १५ दिवसांपासून दुसरी लेन पूर्ण झाली होती. केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नाही म्हणून महापालिका थांबली होती असा आरोप त्यांनी केला.

तसेच मुंबई, महाराष्ट्रासाठी लढताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर माझ्या आजोबांनाही अभिमान वाटला असेल. मुंबई आम्ही लुटू देणार नाही आणि महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही, जे काही गुन्हे दाखल झालेत, त्याआधी बिल्डर पालकमंत्री आहेत जे बीएमसीत अतिक्रमण केलंय त्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत. मुंबईचे महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह यांच्याविरोधात जे भ्रष्टाचार आम्ही समोर आणले आहेत. त्यांची चौकशी अजून का झाली नाही. त्यांना बढती देणार असल्याची चर्चा आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटन केले नाही म्हणून आम्ही लोकांसाठी ते खुले केले, म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. घाणेरडे राजकारण जनतेला पसंत नाही. गद्दारी करून तुम्ही सरकार पाडलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता यांना धडा शिकवेल असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

जे सत्यमेव जयतेसोबत उभे राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. परंतु जे सत्तामेव, कॉन्ट्रॅक्टरमेव जयते बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही. आम्ही राज्यपालांना पत्र लिहिलंय, घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना बोलावून समज द्यावी, इतर राज्यांत फिरण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्यावे. नवी मुंबई मेट्रोबाबत ट्विट केल्यानंतर काल-परवा उद्घाटन केले. ५ महिन्यापासून ही ट्रेन तयार होती. ट्रान्सहार्बर लिंक रोड अजूनही पूर्ण केला नाही. उद्घाटन करायचं नसेल तर कामे बाकी ठेवली जातात ही सरकारी पद्धत आहे. उद्घाटनाची तारीख मिळाल्यानंतर २४ तासांत कामे पूर्ण केली जातात. स्वत:च्या कुटुंबासाठीही सुरक्षेचे कारण देत रस्ते बंद ठेवले जातात. बिल्डर, कॉन्टॅक्टरची कामे केली जातात. जेवढे दिवस सरकार आहे तेवढे दिवस कामावर लक्ष द्यावे. ३१ डिसेंबरनंतर सरकार नसणार, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

 23 Total Likes and Views

0 Comments

No Comment.