क्रिकेट हे आपल्या न्यूनगंडाचे सेलेब्रेशन आहे.
बाकी जगात कुठेच आपण अव्वल नाही. म्हणून आपण आपली सगळी ऊर्जा या क्रिकेटमध्ये घातली आहे.
जे क्रिकेट हा निखळ धंदा झाला आहे, बदमाश राजकारण्यांचा अड्डा झाला आहे, जिथे खेळाडूंचे लिलाव होतात, त्या क्रिकेटला आपण देशभक्तीशी जोडले आहे. क्रिकेटमध्ये जिथे काही खेळाडू आपले रेकॉर्ड आणि आपल्या सेंच्यु-या याशिवाय कसलाही विचार करत नाहीत नि भेट मिळालेल्या फेरारीवरही टॅक्सची सवलत मागतात, अशांना आपण देवच काय, पार ‘भारतरत्न’ नि खासदार वगैरे करून टाकले आहे.
माझा क्रिकेटला विरोध नाही.
खेळ आहे.
तो खेळावा. बघावा.
मस्त एन्जॉय करावा.
कोणी जिंकावे, कोणी हरावे.
खरे तर आपणच जिंकावे.
मग त्याचे छान सेलेब्रेशन व्हावे.
पण, मेन्स क्रिकेट नावाच्या बाजाराच्या ट्रॅपमध्ये आपण एवढे अलगद अडकलो आहोत की आपण त्याला देशभक्ती, देशाभिमान, देशाची अस्मिता वगैरे मानू लागलो आहोत.
त्यातून त्या खेळाडूंच्या मनावरही आपण असे ओझे देत असतो की बिचारे सोपा सामनाही गमावतात!
या क्रिकेटच्या मूर्ख आणि उन्मादी वेडापायी आपण जे काही सगळे पणाला लावतो आणि अन्य जागतिक दर्जाच्या सर्व खेळांकडे नि खेळाडूंकडे दुर्लक्ष करतो, ते अक्षम्य आहे! तिकडे महिला कुस्तीपटू जाहीरपणे काही आरोप करतात, त्यावर आपण देश म्हणून ‘रिॲक्ट’ही करत नाही. आपले फक्त एकच. क्रिकेट. तेही पुरूषांचे क्रिकेट! आपल्या या क्रिकेटवेडेपणाला अवघे जग हसत असते. क्रिकेट हा आपला धर्म वगैरे असेल तर, ही धर्मांधता आपल्याला विध्वंसक वळणावर घेऊन चालली आहे. आणि, अशी मूर्ख लोकसंख्या भांडवली जगाला हवीच तर असते!
अमेरिका आणि चीन महासत्ता आहेत. याचे एक कारण हेही आहे की, हे दोघेही क्रिकेट खेळत नाहीत.
ऑलिम्पिकमध्ये बघा.
हे दोघेही जगात अनुक्रमे पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर आहेत. इंग्लंड क्रिकेट खेळतो आणि त्यानेच तुम्हाला कामाला लावले हे खरे, पण ऑलिम्पिकमध्ये हाच ग्रेट ब्रिटन जगात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया आहे. मग न्यूझीलंडही आहे. हे शहाणे देश अन्यत्रही तेवढेच पुढे आहेत.
तुम्ही कुठे आहात?
जगाची वीस टक्के लोकसंख्या व्यापणारे तुम्ही कुठे आहात?
ऑलिम्पिक असो… हॉकी वर्ल्ड कप असो की फूटबॉल वर्ल्ड कप!
Where are you?
बाकी- नोबेल असो की ऑस्कर, कोण विचारतो तुम्हाला?
मग न्यूनगंडातून जन्मलेले तुमचे हेच जग.
कूपमंडूक!
क्रिकेट वर्ल्ड कप.
दहा देशांचा कसला डोंबलाचा वर्ल्ड कप?
तर, रडणं थांबवा. सोडा ही नशा.
पुढच्या ऑलिम्पिकची तयारी करा.
येडे कुठचे!
- संजय आवटे
45 Total Likes and Views