‘जिंकणारच’म्हणणारे ‘हरू’शकतात….

Analysis Sports
Spread the love

५ ऑक्टोबर २०२३ ते १९ नोव्हेंबर २०२३… तब्बल ४५ दिवस, ४५ सामने, १० संघ, पहिल्या दिवसापासूनच ‘भारतीय संघ अंतिम सामना जिंकणार,’ अशी चर्चा माध्यमांनी सुरू केली. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय संघाचा पहिला सामना चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाशीच होता… अवघ्या १९९ धावांत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उखडून काढले. नंतर २०१ धावा करून पहिल्या विजयाची ‘बोहनी’ केली. तिथपासून सलग दहा च्या दहा सामने भारतीय संघाने जिंकले होते, त्यामुळे ‘१२ वर्षांनंतर अंतिम सामना भारत जिंकणार,’ अशी सर्वत्र चर्चा होती. माध्यमांनी तर अंतिम सामना होण्यापूर्वीच, ‘रोहित शर्माचा संघ िजंकलाच आहे,’ अशी हवा तयार करून ठेवली. या स्पर्धेचा पहिला सामना अहमदाबादला ठरला होता आणि अंतिम सामनाही अहमदाबादला घेण्याचाही निर्णय आधीच झाला होता.
यापूर्वीचे या देशातील अंतिम सामने मुंबई किंवा कलकत्ता येथे खेळवले गेले होते. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईचे महत्त्व कमी करायचे असल्यामुळे, पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादला झाला. अंतिम सामन्यापूर्वी सगळे अहमदाबाद ‘निळे’ झाले. कारण भारतीय संघाचा निळा ‘ड्रेस कोड’ होता… अंतिम सामन्यासाठी खुद्द पंतप्रधानांनीसुद्धा निळे जॅकेट शिवून घेतले असावे. पंतप्रधान आिण गृहमंत्री शहा त्यांच्याच राज्यातील पंतप्रधानांच्या नावाच्या स्टेडिअमवर, भारतीय संघाला खुद्द पंतप्रधान विजयी-ट्रॉफी देणार, असे वातावरण सामन्याआगोदरच तयार झालेेले होते. महाराष्ट्रातील सगळ्या वृत्तपत्रांनी ‘भारतीय संघ जिंकणार’, हे अगदी नैसर्गिकपणे गृहित धरले होते. कारण ११ सामन्यांतील आपला सर्व क्षेत्रातील प्रभाव (बॅटिंग, बॉलिंग, फिल्डींग) दर्जेदार होता. बॉलिंग तर कमालीची दर्जेदार होती. भारताजवळ वेगवान गोलंदाजांची चौकडी कधीच नव्हती. ती याचवेळी गवसली. त्यामुळेच स्पीनर्स दुय्यम ठरले. फलंदाजी मजबुत होती. रोहितची सुरुवात आक्रमक होती. कोहली, अय्यर फर्मात होते. सूर्यकुमार यावेळी झाकोळला होता… तरीही बॅटिंग खोलपर्यंत होती. शमी, बुमराह, सिराज हे अचूक टप्प्यांवर गोलंदाजी करत होते. अंतिम सामन्यात ‘टॉस’ कोण जिंकणार, याची कधी नव्हे एवढी, चर्चा यावेळी झाली. टॉस होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कप्तान खूप हुशारीने वावरत होता… त्याने आपल्याच मोबाईलमध्ये खेळपट्टीचे फोटो काढून घेतले. संध्याकाळी थोडे दव येईल… चेंडू स्वींग होऊ शकतो… म्हणून टॉस जिंकला तर भारताला प्रथम फलंदाजी द्यायचे त्याने मनोमन ठरवले होते. टॉसचे ‘दान’ त्याच्या बाजूने पडले. अर्धी लढाई त्याने तिथेच जिंकली. पण, सगळ्या समिक्षकांपासून पूर्ण स्टेडिअममधील गर्दीला वाटत होते की, ‘आता ऑस्ट्रेलिया फलंदाजी घेणार’ पॅट कम्युनिसने भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघाला पहिला धक्का तिथे बसला. ‘टॉस’ विरोधात गेला होता. प्रथम खेळावे लागेल, अशी कल्पना नव्हती. दोन दडपणे एकदम आली. मॅच सुरू होण्यापूर्वीच पूर्ण संघ थोडा विचलीत होता. तरीही रोहितने आक्रमक सुरुवात करून दिली. पण, नको त्याच वेळी त्याने चुकीचा फटका मारला. चेंडू लेगकडे वळवत असताना बॅटची कड लागल्याने उंचावरून चेंडू ऑफ साईडच्या फिल्डरच्या हातात गेला. हा झेल ट्राव्हीसने इतक्या अप्रतिमपणे पकडला की, सामना इथे फिरला. आठवण झाली ती १९८३ ला कपिल देव ने व्हीव रिचर्ड याचा धावत जावून पडकलेला झेल. कालचा झेल त्याहीपेक्षा भारी होता.. त्या आगोदर दडपणाखालचा शुभम गिल स्वस्तात गिऱ्हाईक झाला हाेता. सुरुवातीच्या दोन्ही विकेट हातात आल्यावर, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या कमिन्स, हेझलवूड, स्टार्क या तिन्ही वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज नेमका आला होता. त्यांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. राहुल आणि विराट यांच्या २० ओव्हरमधील खेळात फक्त एक चौकार होता. सामना आपल्या हातातून निसटतोय, याची जाणीव तेव्हा हळूहळू व्हायला लागली. तरीसुद्धा २४० ची धावसंख्या गाठली. सुरुवातीला चेंडू स्वींग होत होता त्यामुळे ‘ही धाव संख्या ऑस्ट्रेलियासाठीसुद्धा कठीण आहे,’ असे समिक्षक सांगू लागले. त्याचा प्रत्ययही आला. या संपूर्ण विश्वचषक सामन्यात वॉर्नर फारसा प्रभावी वाटला नाही. एक-दोन वेळाच ५० पर्यंत पोहोचला. पहिला बळी त्याचा गेला. मग मिचेल मार्श आणि स्मिथ… या संपूर्ण १० सामन्यांत भरवशाचा वॅार्नर आणि स्मिथ हे लवकर बाद होत गेले. एक स्थिती अशी आली की ३ बाद ४७ धावा… सर्व स्टेडिअमवर जल्लोष… विजय आटोक्यात आला, असे वाटू लागले. काही समिक्षकांना आठवण झाली की, अफगाणिस्थानविरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळत असताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ अशी होती. आणि २०१ धावा करायच्या होत्या. त्यावेळी मॅक्सवेल कमरेत लचक भरली असताना ‘योध्या’सारखा खेळला आणि त्याने २०१ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाचे हेच सामर्थ्य आहे. सहावेळा त्याने विश्वकप जिंकला. त्या प्रत्येक शेवटच्या सामन्यात आणि त्यापूर्वीच्या उपांत्य सामन्यात किमान २ फलंदाज आक्रमकपणे खेळले आहेत. कधी बॉर्डर, कधी पॉन्टींग तर कधी अॅडम गिलख्रिस्ट तर कधी मॅक्सवेल आणि आता ट्राव्हीस हिड… याच हिडने याच स्पर्धेत १६४ धावांची भन्नाट खेळी अॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सामन्यात केली होती. त्याच्या बोटाला फॅक्चर झाल्याने त्याला सहा सामने (तब्बल चार आठवडे) बाहेर बसावे लागले आणि शेवटच्या सामन्यात तो नेमका हजर झाला. ११ चौकार, ३ षटकार मारून त्याने धुलाई केली. एकहाती सामना जिंकून दिला. सगळ्या गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या मनासारख्या घडल्या आणि सहाव्यांदा त्यांना विश्वकप उचलता आला. या संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने फिलि्डंग करताना सात ते आठ चौकार वाचवले. इतके अचूक क्षेत्ररक्षण सामना जिंकायला मदत करते. ऑस्ट्रेलियाचे मोठेपण व्यक्तिपूजेवर नाही. सांघिक शक्तीवर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे रिची बेनाॅ असो, बॉर्डर असो, स्टीव्ह वॉ असो किंवा स्मिथ आणि आता कमिन्स असो… कोणत्याही कप्तानाचे, फलंदाजाचे, गोलंदाजाचे किती कौतुक करायचे, त्याच्या मर्यादा ते आणि त्यांची माध्यमे सांभाळतात. एकेका क्रीडापटूवर त्यांच्याकडे मिडियावर तास-तास कार्यक्रम होत नाहीत. आपल्याकडे अापण जरा चांगला खेळला की, त्याला डोक्यावर घेतो… आणि थोडे अपयश आले तर वाडेकरच्या नावाने उभी केलेली इंदूरमधील बॅट क्रिकेट रसिकच तोडून टाकतात. ‘हुरळून जाणे’ आणि ‘निराश होणे’ यातील ‘मध्य’ भारतीय क्रिकेट रसिकाला सांभाळता येत नाही. आणि अलिकडे माध्यमांनी तर उच्छाद मांडला गेलाय… शिवाय क्रिकेट हा खेळ आहे. हे पहिले पथ्य ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि तेथील प्रेक्षक पाळतात. आपण प्रत्येक खेळाला ‘युद्ध’ समजतो. पाकिस्तान समोर असेल तर अगदी ‘धर्मयुद्ध’ समजतो. पण क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे. धर्मयुद्ध तर अिजबात नव्हे… हा खेळ आहे. यात खेळातील गुणात आवश्यक असलेले डावपेच जास्त महत्त्वाचे आहेत. त्या डावपेचात अंतिम सामन्यात रोहित कमी पडला. धोनी त्यात सरस होता. संपूर्ण सामन्यात रोहितचा चेहरा हेच सांगत होता की, तो भांबावलेला आहे. या उलट धोनी कधीही भांबावलेला जाणवला नाही. ज्या ऑस्ट्रेलियाला ८ ऑक्टोबरला पहिल्या सामन्यात भारतीय संघाने हरवले होते त्याच ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात आपल्याला डावपेचात यशस्वी झाल्यामुळे हरवले.
यापूर्वी म्हणजे १९८३ साली बलाढ्य वेस्टइंडिजला पराभूत केल्यावर त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कपिल देव याचे अभिनंदन केले. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ लंडनहून दिल्लीत परत आल्यावर त्या संघाला इंदिराजींनी मेजवानी दिली. २०११ साली त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही महेंद्रसिंग धोनीला ‘बधाई’ दिली. त्यानंतर ज्यांच्या नावाने स्टेडियम उभारले गेले आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहून भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करणार होते. पण त्यांना अॅस्ट्रेलियाच्या कप्तानाचे अभिनंदन करावे लागले. त्यांनी ते केलेही. आणि लगेच ते तिथून निघाले. अंतिम सामन्यात भारत हारला.. खेळामध्ये किंवा राजकारणामध्ये असे होत असते. सगळेच दान आपल्या बाजूने पडते, असे खेळातही होत नाही आणि राजकारणातही होत नाही. भारतीय संघाचा विजय जवळजवळ सगळ्यांनीच गृहित धरला होता. सामन्याच्या आदल्या दिवशी खेळपट्टीची पाहणी केल्यावर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने स्पष्टपणे सांगितले होते की, ‘पीच बाऊंन्स घेऊ शकते… आम्हीच ट्रॉफि उचलणार…’ याच स्टार्चने महत्त्वाच्या तीन विकेट काढल्या. १० सामन्यात आपण विजय मिळवला आणि ज्या सामन्यात विजय मिळवायला हवा होता तोच सामना आपण गमावला. क्रिकेट हे असे आहे… कोणीही कोणालाही गृहित धरू नये. कमी लेखू नये. आणि हा गृहपाठ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाचता आला. कोणाचाही पराभव होऊ शकतो. जगात अजय हे कोणीच नाही. एकदा शिखर गाठल्यावर वरती काहीही नाही. नंतर घसरगुंडीच असते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघ पराभूत झाल्याने कोट्यवधी क्रिकेटप्रेमी निराश झाले असले तरी… अपराजित ठरलेले किंवा ठरवले गेलेले पराजित होऊ शकतात… हा संदेश अहमदाबादमधून नरेंद्र मोदी स्टेडिअमवरून देशाला गेला. याला फार मोठा अर्थ आहे. तो अर्थ केवळ क्रिकेटपुरता नाही. राजकारणालासुद्धा तो लागू आहे.
कालच्या सामन्याने तोही संदेश दिला आहे.

मधुकर भावे
सध्या एवढेच…📞9892033458

 474 Total Likes and Views

0 Comments

No Comment.