लाभले आम्हास भाग्य ‘टाळतो’ मराठी!

Analysis
Spread the love

“मम्मा, ७५ म्हणजे किती गं?!” गेम खेळता खेळता कन्सोल वरचा हात आणि लक्ष दोन्ही बाजूला न काढता छोट्या चश्मेबद्दूरांचा प्रश्न! “७५ म्हणजे सेवेंटी फाईव्ह, का रे?” टम्म फुगलेल्या पोळीवर चमच्याने तुपाची धार सोडत मातोश्री उद्गारल्या. “अगं, स्वरांग सांगत होता त्याच्याकडे उद्या फंक्शन आहे. त्याचे ग्रँडपा ७५ वर्षाचे होणार म्हणून. मला ७५ म्हणजे कळलं नाही ना म्हणून तुला विचारलं!”

आजकालच्या सर्वसाधारणपणे ९० टक्के घरकुलात अशा प्रकारचे संभाषण वरचेवर होताना दिसतं. इंग्रजाळलेलं मराठी बोलणारी ही पुढची पिढी ७५ म्हणजे किती यालाच अडून बसली तर रौप्य महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव यांची काय तऱ्हा?!

हा लेखप्रपंच मुलांना इंग्रजी माध्यमात टाकणाऱ्या पालकांसाठी नाहीच मुळी, मराठी घरकुलात राहूनही मुलांना अस्खलित मराठी न शिकवणाऱ्या घरकुलासाठी आहे. इंग्रजी येणं हि काळाची गरज आहे. मुलांना काळासोबत पुढे जायला हवं. अशी एक ना अनेक करणे आपण ऐकली वा ऐकवली असतील. पण कारणं देण्याची वेळ का यावी? फ्रान्स मध्ये जाता तेव्हा घरी आल्यावर कौतुकाने काय बोलता तर तिथली पोरं पण फ्रेंच बोलतात.

मराठीचा पालकांनाच एवढा न्यूनगंड असतो कि बऱ्याचदा तेच मुलांना मराठी बोलण्यापासून परावृत्त करतात. इंग्रजी जागतिक भाषा आहे ती येणं अत्यावश्यक आहे हे नक्की. पण सोबतच आपली भाषा मुलांना अस्खलित बोलता यावी असा पालकांना का वाटत नाही?

मी माझा स्वानुभव सांगते, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा शालान्त परिक्षेपर्यंतचा अभ्यासक्रम सारखाच असतो. माझे बाबा वर्ष सुरु झालं कि इतिहासाचे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाचे पुस्तक आणायचे. शनिवार – रविवारच्या सुट्टीत एक एक धडा मराठीतला एक परिच्छेद आणि त्याचा इंग्रजीतला परिच्छेद असं शब्द शब्द घोटून वाचून दाखवायचे. खूप कंटाळा यायचा. १-२ तास हे वाचन चाले मग मी चुळबुळ करायचे. पण बाबा नेटाने वाचन चालू ठेवत. त्या वेळेत कोणीही दूरदर्शन लावणं व्यर्ज असायचं. (तसही मला काही फरक पडत नसे पण अभ्यासाचं वाचन करायचा कंटाळा!)
याचा फायदा काय हे मला तेव्हा कळायचं नाही. पण अवचेतन मनात ते मराठी शब्द आणि त्यांचे इंग्रजी अर्थ बसले होते. वाक्यरचना होत्या. पाचवी ते आठवी नववीत असेपर्यंत हा नियम चालला. या सोबतच लहानपणीपासून बाबांनी मला लावलेली एक उत्तम सवय म्हणजे वाचन! पु.ल. आणि अत्रे यापासून ते शिवाजी सावंत आणि रणजित देसाईं पर्यंत चे लेखक मला त्यांचं साहित्य वाचून पाचवी सातवीतच माहित झाले.
या गोष्टीचा फायदा काय याची छोटी झलक मला दहावीच्या वर्षात दिसली. इंग्रजीच्या पेपर मध्ये एक अवांतर प्रश्न असे ज्याचं उत्तर आपल्याला स्वतःला वाक्यरचना करून आणि अवांतर वाचनावरून लिहायचं असायचं. अशाच एका प्रश्नात पु.ल. देशपांडे यांच्या कोणत्याही एक पुस्तकाची समीक्षा लिहायची होती. मला आठवतंय माझं उत्तर शिक्षकांनी सगळ्या वर्गासमोर वाचून दाखवलं होतं आणि माझ्या इंग्रजी शब्दसंपदा आणि वाक्यरचनेचं कौतुक केलं. इतकं भारी वाटलं! तेव्हा कळलं बाबा इतकी वर्ष जे वाचून दाखवायचे त्याचा फायदा काय ते. असंच अजून एकदा सातवी-आठवीत असताना सामान्य ज्ञानाची जलद तोंडी उत्तर द्याची स्पर्धा होती. ‘उपरा’ या पुस्तकाचे लेखक कोण असा प्रश्न होता. एका सेकंदात मी ‘लक्ष्मण माने’ असं उत्तर दिलं होतं. तेव्हा शिक्षकांनी विचारलं, “हे पुस्तक तुला कसं माहित?”. कॉलर टाईट करत मी बोलले, “मी वाचलंय!”. तेव्हा सुद्धा शिक्षकांनी केलेलं कौतुक आजही मला आठवतंय.

मुलामध्ये ज्ञानाचं कौतुक करून घेण्याची सवय वाढीस लागली कि ज्ञानार्जनाचा ध्यास लागतो. नवीन काही शिकण्याची उर्मी बळावते. चित्रपटातील नायक – नायिकांचा आदर्श ठेवण्यापेक्षा आणि त्याचं वेड असण्यापेक्षा सत्यात असण्याऱ्या नायक-नायिकांची माहिती त्यांना द्या. आभासी जगातील ‘ब्लॅक पॅन्थर’, ‘थॉर’, ‘बॅटमॅन’ इ. कॉमिक बुक पात्रांची माहिती/ पोस्टर्स गोळा करायला शिकवण्यापेक्षा खऱ्या जगातील धेय्य सिद्धीस नेणाऱ्या पात्रांची ओळख करून द्या. २० पदव्यांचा मानकरी असणारे ‘श्रीकांत जिचकर’ यांच्या सारख्या लोकांचे आदर्श ठेवायला शिकवा.

आमच्या लहानपणी दूरदर्शनवर आजसारख्या असंख्य वाहिन्या आणि मालिका तर नव्हत्याच तेव्हा तरीसुद्धा जे होतं ते पण दिवसातून १ तासापेक्षा पाहिलेलं आठवत नाही. आजकालच्या पालकांची मुलांच्या “स्क्रीन टाइम” चा आणि इतर उपक्रमांचा समतोल साधताना होणारी त्रेधातिरपीट पहिली कि हसू येतं. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? “स्क्रीन टाइम” चा समतोल राखण्याचे उपाय तुम्हीच मोबाईलवर पाहताय. मला स्वतःला वाटतं कि मुलांच्या वाढत्या वयात घरात दूरदर्शन असूच नये. गेलेला एक एक मिनिट परत येत नाही. आपला अमूल्य वेळ फेसबुक/ इंस्टाग्राम इ. वरचे वेळ खाऊ रील्स आणि पोस्ट बघण्यात घालवण्यापेक्षा उत्पादक काही करणं किंवा नवीन काही कला शिकणं यात घालवावा.

लहानपणी माझ्या आई बाबांना सगळे नातेवाईक बोलायचे तुम्ही दोघे शिकलेले असूनही मुलींना मराठी शाळेत का घातलं? आजकालच्या स्पर्धेच्या युगात कॉलेज आणि कार्यालयात इंग्रजी वर प्रभुत्व नसेल तर मागेच पडणार मुली. यावर माझ्या पालकांचं उत्तर मला आता आठवत नाही पण एक गोष्ट नक्की बाबांच्या मराठी-इंग्रजी उपक्रमामुळे आणि वाचनाच्या सवयीने कधी अडचण आलीच नाही. मी अस्खलित मराठी बोलते आणि इंग्रजी भाषा मी सराईतपणे बोलू शकते. इतकं कि मराठी माध्यमातून शिकले आहे यावर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. हिंदी आणि संस्कृतचं ज्ञान आहे. माझं व्यावसायिक क्षेत्र भाषांशी संबंधीत आहे. वेगवेगळ्या ४० ते ४५ भाषांवर मला काम करावे लागते. ज्यात मला त्या भाषाचं इंग्रजी भाषांतर तपासायचं असतं. त्यामुळे माझं मत असं आहे की तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात या पेक्षा काय आणि कसं शिकलात व शिकवलंत हे महत्वाचं आहे.

‘राऊंड द क्लॉक’ या संद्येत ज्यांच्या कामाचं स्वरूप बसेल अशी आज कालची पिढी मुलांना वर्षाचे दहा दहा लाख फी असणाऱ्या मोठ्या शाळांत पाठवतात आणि जबाबदाऱ्या विसरतात. (अर्थात सगळेच पालक नाही). भपकेदार पालक-शिक्षक सभा, मुलांना ५-५ गणवेश, हजारोंची पुस्तके, हजारोंच्या ‘बर्थडे पार्ट्या’ आणि अशा बऱ्याच शिक्षणेतर गोष्टी या मोठ्या शाळा आणि शाळेतली मुलं करतात. मूल्यशिक्षणच्या नावाने बोंब!
मला उगाच तत्ववादी असल्यासारखं बोलायचं नाही पण मराठीमाध्यमातून शिकून इंग्रजी आणि त्यासोबत अजून दोन भाषांचं नीट ज्ञान मला आहे. संस्कृत भाषेतील स्तोत्र मला स्पष्ट म्हणता येतात. तर इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना इंग्रजीसोबत ज्या राज्यात राहतायत त्या राज्याची भाषा नीट आणि अस्खलित बोलता यावी एवढी साधी अपेक्षा असू नये?

मराठीचा न्यूनगंडच आपल्या मराठी भाषेला एक दिवस पाली आणि अर्धमागधीच्या वर्गात नेऊन बसवणार आहे! मराठीचा अभिमान बाळगून कटाक्षाने गरज नसताना इंग्रजी आणि हिंदी टाळून मराठी बोललं तरच पुढची पिढी मराठी बोलेल आणि मराठी भाषा अजून बहरेल. आता बघा कोरियन लोकांना माहिताय इंग्रजी बोलणारा कोरियनेतर वर्ग सुद्धा त्यांच्या सिरीज बघतो पण म्हणून काही ते इंग्रजीतून सिरीज काढत नाही. इंग्रजी डबिंगच पाहावं लागतं. आपण का नाही मराठीचा अट्टाहास धरत? मराठीमधलं अमूल्य साहित्य पुढच्या पिढीला वाटत?

महाराष्ट्र्र सोडता बाकी सारी राज्ये त्यांच्या भाषांवर अडून बसतात. येत असूनही इंग्रजी व हिंदी बोलत नाही. हवं तर आमची भाषा बोला अन्यथा हात वारे करून बोला. पण आपल्याकडे लोकांना मराठी बोलायची लाज वाटते. छत्रपतींच्या कर्मभूमीत राहतोय म्हणून किती भाग्यवान आहोत याची जाणीव ठेऊया आणि मराठीचा वारसा पुढे नेऊया!
-प्रतिक्षा डफळे

 583 Total Likes and Views

0 Comments

No Comment.