पक्ष आणि त्यांचे आत्मे, एक चिंतन

Editorial
Spread the love

धर्मनिरपेक्षता हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आत्मा आहे, असे सांगत आपण घेतलेली भूमिका बदलणार नाही, हे स्टँम्प पेपरवरही लिहून द्यायला तयार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी मुंबईत घेतली आणि ही भूमिका स्पष्ट केली.

आपली आघाडी कोणत्याही पक्षाशी होवो पण शाहू फुले आंबेडकरवाद ही भूमिका कायम राहील. मायावती, चंद्रबाबू नायडू तसेच मेहबूबा मुफ्ती यांनी वेगळी भूमिका घेतली होती, तशीच आपण घेतलेली आहे, असेही अजित पवार यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

राज्यातील चारही प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, कॉँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या चारही पक्षांचे आत्मे काय म्हणू शकतील, असा विचार मनात आला. त्याला कारण अजित पवार यांचे हे ताजे विधान. या ताज्या विधानामुळे काही प्रश्न मनात निर्माण झाले आणि अलीकडच्या इतिहासातल्या काही घटना ठळकपणे आठवू लागल्या.

या चारही प्रमुख पक्षांचे आत्मे भटकत भटकत त्यांच्या चहाच्या अड्ड्यावर जमले तर ते काय गप्पा मारत असतील…हे सगळे पक्ष म्हणजे आपले देह परस्परांशी जुळवून घेत असतील, तर आपण सर्व आत्म्यांनी एकत्र जुळवून घ्यायला काय हरकत आहे…

राष्ट्रवादीने त्यांची धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही हिन्दुत्त्व सोडलेले नाही. पण, मध्यन्तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) मुंब्र्यात जाऊन भलतेच खूष झाले आणि म्हणाले की, खरे तर मी खूप पूर्वीच मुंब्र्यात यायला हवे होते पण येऊ शकलो नव्हतो. मुंब्र्यात शरद पवार यांचे सध्याचे जवळचे नेते जितेन्द्र आव्हाड यांचे राज्य आहे. त्यामुळे एकीकडे धर्मनिरपेक्षता न सोडलेल्या अजित पवारांबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांचे पट्टशिष्ट असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे कडवे हिन्दुत्त्ववादी असले तरी जमवून घेतच आहेत. दोघांनीही आपले कडवेपण म्हणजे कडवे हिन्दुत्त्व आणि कडवी धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही, हे विशेष.

तिकडे सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची जननी असलेल्या कॉँग्रेसने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकेकाळच्या पेरोक्यियल किंवा संकुचित प्रादेशिकतावादी कडवट शिवसेनेलाच पाठिंबा दिला. तरी कॉँग्रेसची धर्मनिरपेक्षता संपलेली नाही कां तिला जराही बाधा आलेली नाही. तिकडे शरद पवार यांची धर्मनिरपेक्षताही जातीयवादी शिवसेनेला सत्तेवर बसवताना जराही विचलित झालेली नव्हती. किंबहुना, शिवसेनेच्या तुलनेत खूपच जातीयवादी असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यापासून पवारसाहेबांनी जनाब उद्ध ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं ते धर्मनिरपेक्षता अक्षुण्ण रहावी म्हणूनच…

थोडक्यात, हे सारे वास्तव लक्षात घेता, या सर्व पक्षांचे आत्मे एकत्र जमू शकतात, चहा पिऊ शकतात आणि नांदूही शकतात. अर्थात, ते आपण स्थानिक पातळीवरच्या छोट्या निवडणुकांमधे कायमच बघत आलो आहोत. पण तरीही राष्ट्रीय पातळीवर कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत, हे त्यांचे प्राक्तन आहे. त्यामुळे आत्मे एकत्र चहा पिऊ शकले तरी ही दोन शरीरे मात्र एकत्र येण्याची शक्यता कमीच…

थोडक्यात, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या नव्या विधानामुळे आता आत्म्यांची शिवाशिवी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, असे मानायला वाव आहे. काही शाहू-फुले-आंबेडकरवादी, काही गांधीवादी, काही सावरकरवादी तर काही वडीलवादी, काही धर्मवीरवादी तर काही स्वतःच वादी-संवादी असे सारे प्रकार महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. त्यातून सर्वसामान्य लोकांना एकच गोष्ट लक्षात येईल आणि ती म्हणजे उमेदवारी देताना जात पोटजात बघावी लागते पण आत्मे सर्वार्थाने उदारमतवादी आणि कऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह असतात…

शैलेन्द्र परांजपे

 58 Total Likes and Views

0 Comments

No Comment.