इंडियाकडून पंतप्रधानपदाचा चेहरा मल्लिकार्जुन खरगे; शरद पवार नाराज

Editorial
Spread the love

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उघडली आहे. विरोधी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे चेहरा असतील, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून झळकत आहेत. आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत यावर चर्चा झाली. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यास पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्याने आघाडीतल्या काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील नाराज असल्याची बातमी समोर आली आहे.

इंडिया अघाडीच्या (India Aghadi) पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारल्यावर १९७७च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, त्यावेळीही निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, तर त्यावेळी निवडणुका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या (जनता पार्टी) नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या आणि सरकार स्थापन झाले. त्यावेळीदेखील असे म्हटले जात होते की, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार हे ठरलेले नाही. पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नाही तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील. परंतु, तसे झाले नाही. जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात. जनता सत्ताबदलाच्या मनःस्थितीत असतील तर काहीही होऊ शकते, इंडिया टूडेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीत बरेच स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत बोलताना जेडीयू कडून अनेकवेळा आपले नेते नितीश कुमार यांचे नाव घेण्यात आले आहे. मात्र खरगे यांचे नाव पुढे आल्यानंतर नाराजीच्या चर्चांवर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या उमेदवारीबाबत नितीश कुमार म्हणाले, मी जरादेखील नाराज नाही. मी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की, ज्याला पंतप्रधान व्हायचं असेल त्याने व्हावं. माझीही इच्छा नव्हती. बैठकीत मी तेच सांगितलं आहे. मी कधीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलेले नाही.

 52 Total Likes and Views

0 Comments

No Comment.