ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

Editorial
Spread the love

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या ४८ जागांचे विभाजन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशा तीन पक्षांत करायचे आहे. परंतु, अनेक जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवू इच्छितात. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. राज्य पातळीवरील हे वाद राज्यांतर्गत सोडवले जावेत, असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. तसेच, इतर अनेक पक्षही महाविकास आघाडीत येण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान, जागा वाटपाबाबत ठाकरे गटाने मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने फेटाळल्याचे वृत्त समोर येत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसने ही मागणी अमान्य केली आहे. यासंदर्भात नुकतीस महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे.

शिवसेनेची दोन गटांत विभागणी झाली असून ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांच्यातील बरेच सदस्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले. तसेच, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी जागावाटपाबाबत संघर्ष टाळावा. ठाकरे गट २३ जागांची मागणी करू शकतं. पण या जागांचे ते काय करणार? शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत ठाकरे गटातच मोठं आव्हान निर्माण झाले आहे, असेही निरूपम म्हणाले.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे स्थिर मतांचा एकमेव जुना पक्ष आता काँग्रेस आहे, असं महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, पक्षांमध्ये चर्चेची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची २३ जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे.

 63 Total Likes and Views

0 Comments

No Comment.