आता भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच निवडणुकीची उमेदवारी देणे बाकी; संजय राऊतांचा टोला

Editorial
Spread the love

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे लोकसभेच्या जागावाटपावरून गेले दोन दिवस काँग्रेसवर निशाणा साधत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेसबाबत सावध भूमिका घेत पुन्हा एकदा भाजपावर टीकास्र सोडले. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उदघाटन होणार असून भाजपाने यासाठी जोरदार तयारी केली आहे. आतापासूनच अयोध्येत तयारी सुरू आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानक यांचे उदघाटन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी आहे. एवढे प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे.

काँग्रेसवर दोन दिवसांपासून तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांनी आज नमती भूमिका घेत, माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षात योग्य ताळमेळ आहे. आमच्यात मतभेद असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यात काहीही तथ्य नाही. मविआत जागावाटपावरून कोणतीही धुसफूस नाही. आमच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांचे वाटप मेरिटनुसारच होईल. जिंकेल त्याची जागा, हे आमचे सूत्र आधीपासूनच आहे. आकडा वाढविण्यासाठी म्हणून जागा द्यायच्या नाहीत, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, “शिवसेनेचे सूत्र राहिले आहे की, आम्हाला २३ जागा मिळाल्या पाहीजेत. त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. एखाद्या जागेवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असू शकतो. तेव्हा त्या जागेवर नक्कीच त्यांचा विचार होऊ शकतो. एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल, त्यावरही चर्चा होऊ शकते.”

काँग्रेस शून्य आहे, असे मी कधीही म्हणालो नाही. काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही, असे मला म्हणायचे होते. आमच्याकडे १८ खासदार होते, त्यातील काही गेले आणि सहा बाकी आहेत. राष्ट्रवादीकडे चार-पाच खासदार होते, त्यातील एक-दोन निघून गेले. पण काँग्रेसकडे आज एकही खासदार नाही. पण आम्ही एकत्र लढून महाराष्ट्रात जवळपास ४० जागा जिंकू शकतो, एवढी आमची ताकद आहे, अशी भूमिका काल केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी मांडली.

 58 Total Likes and Views

0 Comments

No Comment.