फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा पडला असेल; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

Analysis
Spread the love

उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणा विषयी मला खरं खोटं माहीत नाही. पण ज्यांच्या मनात राम आहे, त्यांना निमंत्रणाची गरज नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. मनात राम असल्यानंतर फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही. राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होत्या. राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो. लाखो भाविकही जात होतेच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) गटातील काही कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस बाबरीच्या ढाच्यावर चढले असतील आणि त्यांच्या वजनाने तो ढाचा पडला असेल तर माहीत नाही. त्यावेळी सुंदर सिंह भंडारी त्यांचेच नेते होते. लालकृष्ण अडवाणी यांची मुलाखत आहे. त्यात अडवाणी आणि भंडारी यांनी शिवसेनेचं योगदान सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस यांचा गृहपाठ कमी पडत असावा, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतो. ते शिवसेनाप्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल बोलत असतील तर त्यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. तुम्हीच तुमचा ढोंगाचा बुरखा फाडला याबद्दल मी फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अयोध्येच्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण आलं नाही. पण अयोध्येत राम मंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने लढा दिला आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार गेला. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं. त्याग दिला. पण आज कोणी का उद्घाटन करत असेल पण राम मंदिर झालं याचा आनंद आहे. राम मंदिर होतंय हे महत्त्वाचं आहे. केंद्रात सरकार आल्यावर विशेष कायदा करून राम मंदिर बनवलं जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कोर्टाने निर्णय दिला त्यानंतरच मंदिर झालं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मी अयोध्येत कधीही जाईल. रामलल्लाचे दर्शन घेईल. पण राम मंदिर उद्घाटनाचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ देऊ नका. मला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही. मी आजही जाऊन दर्शन घेऊ शकतो. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतरही मी तिकडे गेलो होतो. २२ तारखेलाच गेलं पाहिजे असं नाही. तो काही एकमात्र मुहूर्त नाही. त्यांना इव्हेंट करायचा आहे. तो त्यांनी करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

 392 Total Likes and Views

1 Comments
alpilean testimonials January 5, 2024
| | |
I appreciate you sharing this blog post. Thanks Again. Cool.