“अथातो मुंजजिज्ञासा”

Analysis
Spread the love

काही दिवसांपूर्वीच मुंज आणि तिची वस्तुस्थिती यावरचा लेख वाचला. लेखकाचं नाव दुर्दैवानं लक्षात नाही. पण आशय लक्षात आला. मुद्दे महत्वाचेच आहेत. पण परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे आणि ती कशी सुधारतां येईल यावर अधिक विचार आणि चर्चा व्हायला हवी, असं मला वाटतं.

मंगल पांडे हे या संदर्भातलं फार महत्वाचं नाव आहे. ते केवळ सशस्त्र क्रांतिविषयी नाही, ज्या कारणामुळे तो अतिशय दुखावला गेला ते कारण फार महत्वाचं आहे. त्याचा संबंध धार्मिक श्रद्धेशी आहे. जी जीवनशैलीची मूल्यं आपल्याला आपल्या धर्मानं (जातीनं नव्हे) आणि संस्कृतीनं दिली आहेत, त्यांच्याशी प्रतारणा करायची नाही एवढी एक खूणगाठ मनाशी पक्की बांधली जाण्याचा तो काळ होता. जे त्याच्या मनाला खटकत होतं ते अवाजवी नव्हतं. म्हणूनच त्यानं कडाडून विरोध केला आणि त्याकरिता फाशीची शिक्षादेखील स्विकारली. मूल्यवर्धित संस्कार असे असतात..!

वाढदिवसादिवशी केक कापणं हा प्रकार आता जवळपास सगळ्यांनीच स्वीकारला आहे. वास्तविक केक तर आपण कधीही कापू शकतो. वाढदिवसाचा त्याच्याशी तसा काय संबंध आहे? पण पूर्ण निरर्थक गोष्टी आपण अगदी आनंदानं स्वीकारल्या. शिवाय केक तलवारीनं कापणं, अंगाला फासणं, वाढदिवसादिवशी त्या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तुडवणं वगैरे भरही घातली. पण जे आपलं हजारो वर्षांचं आहे, ज्याला विशिष्ट परंपरा आहे, भक्कम वैज्ञानिक आधार आहे, ते आपण किती सहजगत्या झटकून टाकायला निघालो आहोत…! मला याचं आश्चर्यही वाटतं आणि संतापही येतो..!

आपल्या संस्कृतीनं सांगितलेले १६ संस्कार हे आर्थिक-सामाजिक परिस्थितीवर मुळीच अवलंबून नाहीत. सुदाम्याला सुद्धा त्याच्या आईवडिलांनी मुंजीनंतर गुरूगृही शिक्षणाकरिता पाठवलाच होता. गुरूंनी देखील त्याचा शिष्य म्हणून स्विकार केलाच होता. आता ज्या कुटुंबात दोनवेळ ताजं अन्न खाण्याची मारामार, त्या पालकांनी सुदाम्याची मुंज कशी केली असेल? बरं, त्याकाळच्या आर्थिक परिस्थितीनुसार सुदामा अल्प उत्पन्न गटाच्याही खालच्या पायरीवरचा म्हणजे ‘नो उत्पन्न’ गटातला होता. तो खरं तर सरकारी शाळेतच शिकायला जाणं अपेक्षित. पण तो अशा ठिकाणी शिकायला गेला जिथं साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम शिकत होते. म्हणजे आजच्या व्याख्येनुसार हे तर ब्रॅंडेड शिक्षण झालं. का? कारण, पालकांनी त्यांचं कर्तव्य केलं, गुरूंनीदेखील त्यांचं कर्तव्य केलं. पालक आणि गुरू हे दोघेही जण आपापल्या कर्तव्यांना उत्तमप्रकारे जागले की, सुदाम्याला अडचण येत नाही.

ज्या गुरू द्रोणाचार्यांच्या नावे आता भारत सरकार पुरस्कार देते, त्या द्रोणाचार्यांची आर्थिक स्थिती दयनीयच होती. पण त्यांचं मुंजीनंतरचं शिक्षण राजा द्रुपदाबरोबर झालं. अध्ययन उत्तम झालं. म्हणूनच ते भीष्मांच्या पारखी नजरेतून कुरूकुलाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले. एवढ्या मोठ्या कुरूवंशाचे प्रशिक्षक म्हणून काम करत असतानासुद्धा एक गाय पाळण्याची त्यांची ताकद नव्हती. अश्वत्थाम्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून देई. अश्वत्थाम्याचीही मुंज झाली. ही उदाहरणं काय सांगतात? संस्कार महत्वाचा. समारंभ महत्वाचा नाही.

मुंज हा संस्कार आहे किंवा असतो, हे खोटं पाडायला कोण जबाबदार? मुलं त्रिकाल संध्यावंदन करत नाहीत किंवा त्यांच्याकडून ते करवून घेतलं जात नाही, याला कोण जबाबदार? मुंज झाल्यानंतरही ती ब्रह्मचर्य पाळत नाहीत, उष्टं खातात, परान्न खातात, अभक्ष्यभक्षणही करतात, याला जबाबदार कोण? ह्याचं उत्तर एकच आहे – कुटुंब..!

आताची मुलांची पिढीच काय, पण त्याच्या वडीलांच्या आणि आजोबांच्या पिढीतही त्रिकाल संध्या किती जणांनी केली आहे? किती जणांनी ब्रह्मचर्य व्रताचं आचरण केलं आहे? किती जणांनी अभक्ष्यभक्षण वर्ज्य केलं आहे? या प्रश्नांची उत्तरं फार कडवट आहेत. मुंज्या मुलाला देवदर्शनासाठी मिरवून आणताना ‘कोंबडी पळाली’ वर मुंज्या मुलाच्या आईलाच नाचताना मी पाहिलंय. आई,मामी,मावशी,आत्या,काकू या सगळ्याचजणी बेभान होऊन नाचत होत्या. त्या नाचण्यामागचं प्रयोजनच मला तेव्हाही उमगलं नव्हतं आणि आजतागायत उमगलेलं नाही. एका मुंजीत तर आदल्या दिवशी संगीत केलं होतं आणि बटू एकदम ढिनचॅक नाचत होता. बटूचे वडील, त्याचे काका, मामा आणि अन्य पुरूष मंडळी हातात ग्लास घेऊन हसत खिदळत होती.

अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानासाठी अन्य कितीतरी प्रसंग असतात, समारंभ असतात. तरीही माणसं अशा धार्मिक संस्कारांच्या वेळी असले शौक का बाळगतात? कुटुंबातल्या मंगल प्रसंगी ही थेरं करणं आवश्यकच आहे का?

पण हा प्रकार केवळ मुंजीपुरताच मर्यादित राहिलाय का? मुंज म्हणजे व्रतबंध. एका विशिष्ट शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगिकार. स्वत:च्या सर्वांगीण उत्कर्षासाठी जी खडतर साधना केली पाहिजे, जो विद्याभ्यास केला पाहिजे, त्यासाठीची व्रताची बंधनं स्वीकारण्याचा धार्मिक संस्कार म्हणजे मुंज. हा संस्कार एका दिवसात होत नाही, तो आचरणातून घडत जाणारा संस्कार आहे. दुसरा पर्यायच नाही.

बारसं,जावळ,मुंज,लग्न हे इव्हेंट्स आहेत की संस्कार आहेत? संस्कारांचे इव्हेंट्स करण्याची खरोखर आवश्यकता आहे का? आपल्या कुटुंबातच जे आचरणात नाही, ते आपल्या मुलांनी मात्र आचरावं हा कुठला अजब प्रकार ? बरं, ते आचरणही एका दिवसापुरतंच असतं. वडिल गायत्री मंत्र सांगण्याचा अभिनय एकदम झकास करतात, बटू तो मंत्र ऐकून म्हणण्याचा अभिनय चपखल करतो, आई मुंजीची पैठणी आणि भिक्षावळीची खास पांढरी गर्भरेशमी साडी घेऊन आधीच खूष झालेली असते. आदल्या दिवशी बफे, दुसऱ्या दिवशी सकाळी चारीठाव नाश्ता, दुपारी सुग्रास भोजन करून नातेवाईक,आप्तेष्ट सुखावलेले असतात. इकडे बटू खास जरीकाठाची रेशमी बाराबंदी आणि पेशवाई पगडी घालून फोटोशूट करण्यात गुंतलेला असतो. सेल्फी पाॅईंट गजबजून गेलेला असतो. एकूण काय, सगळा आनंदी आनंद असतो..!

मुंज हे एक निमित्त असतं. निमित्त कशाचं? घरात नवं फर्निचर, रिनोव्हेशन, रंगकाम, इंटिरिअर होतं. मागच्या नऊ-दहा वर्षात मोठा समारंभ तसाही झालेला नसतो. खरेदी दणकून होते.
बटूच्या आई आणि बहीण असल्यास तिच्याकरिता खास मेकअप आर्टिस्ट बुक केलेला असतो. गुरूजींना सगळं कार्य उक्तं दिलेलं असतं. मातृभोजनाचं, भिक्षावळीचं सगळं साहित्य विकतच मिळतं. दिमतीला गाड्या-घोडे मुबलक. त्यामुळं, मुंजीनंतर देवदर्शनाच्या निमित्तानं सहली होतात. सगळ्यांची सगळी हौसमौज होते आणि त्यातच मुंजही होते…!

हे आजकाल बहुतांशी दिसणारं चित्र आहे आणि ते खरंही आहे. आपण हा संस्कार का करतो आहोत, याविषयी फारसा विचार न करता, इव्हेंट देखणा आणि इतरांच्या नजरेत कसा भरेल, याचा विचार मात्र अगदी तपशीलात केलेला असतो. हे सत्य आहेच, कशाला नाकारायचं? पण ही वस्तुस्थिती बदलायला हवी.

आजकाल कुटुंबं लहान-लहान होत चालली आहेत. माणसं कामाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं इकडं-तिकडं विखुरली गेली आहेत. मोबाईल फोन्स, सोशल मीडीया, इन्स्टाग्राम, फेसबुक यांवर सगळेजण एकमेकांशी कनेक्टेड असतात. पण, एकाच शहरात राहूनही प्रत्यक्ष भेटी मात्र होत नाहीत. मग, मुंज हे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठीचं कारण बनलं तर “जेहेत्तेकालाचें ठायीं” त्यात गैर काहीही नाही. आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु, त्या कार्यक्रमाच्या मूळ उद्देशालाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाव्यात, हे मात्र निश्चित आक्षेपार्ह आहे. कार्यक्रमावर लाखोंचा खर्च होतो, हा आकस असण्याचं काही कारण नाही. पण नुसत्या फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीवर पन्नास-पन्नास हजार रूपये खर्च करणारी माणसं आपल्या मुलाकडून निदान संध्याकाळची संध्या तरी नियमितपणे व्हावी, त्याला न्यास,योग,प्राणायाम,संकल्प आदी उत्कृष्टपणे यावं, या करिता एखाद्या गुरूजींना योग्य ती दक्षिणा देऊन ती व्यवस्था का करत नाहीत? त्याकरिता असा कितीसा खर्च होणार आहे? जसं आपण आपल्या मुलांना अन्य क्लासेसना पाठवतो किंवा होम ट्यूटर लावतो, तसं हे करता येणार नाही का? मला वाटतं, हे नक्की जमेल.

योग्य ती दक्षिणा घेऊन मुलांकडून दैनंदिन संध्या करवून घेण्याकरिता गुरूजींनी देखील सकारात्मकता दाखवायला हवी. त्यांनी पुढाकार घेतला तर अनेक पालक नक्की तयार होतील. आपण फक्त उपचार म्हणून मुंज केली, पण तो संस्कार कायमस्वरूपी कसा बिंबवावा, हा प्रश्न अनेक पालकांना पडत असेलच. त्यावर हा उपाय चांगला ठरेल. आज समाजात काहींनी सुरूवात केली तर हळूहळू हे रूजेल. काळानुसार आपण या प्रश्नांवर योग्य आणि प्रभावी उत्तरं शोधायला हवीत.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे,संध्यावंदन का करावं आणि त्याचे लाभ या गोष्टीचा पुन्हा नव्यानं प्रचार-प्रसार करायला हवा,असं मला वाटतं. मुंज करण्याआधी गुरूजींनी बटूच्या सर्व कुटुंबियांचं एक छान सविस्तर काऊन्सेलिंग सेशन घ्यायला हवं. मुंजीआधी किमान शंभर दिवस तरी कुटुंबियांनी ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन, त्यानुसार घरातल्या पद्धती, वळणं बदलायला हव्यात. जर हे घडलं नाही तर मुंज करण्याचा उपयोगच काय ? आपण या सगळ्या गोष्टींचं उपयोजन जिवंत ठेवलं पाहिजे.

पण हे जिवंत कसं ठेवणार? कुणी ठेवायचं? कसं ठेवायचं? यावर कालानुरूप योग्य मार्गदर्शन या क्षेत्रातल्या तज्ञांनी करणं आवश्यक आहे. अगदी कर्मठपणा नको, पण सध्याच्या जीवनशैलीला अनुसरून हे आचरता येईल आणि त्यातून फायदाही होईल, हे द्रष्टेपणानं पाहिलं पाहिजे.

आता विषय निघालाच आहे तर, संध्यावंदनाविषयी थोडंसं स्पष्टीकरण दिलंच पाहिजे. सध्या “पळी-पंचपात्री घेऊन फिरणाऱ्या भट-बामनांचं ते काम” अशा गैरसमजांचा सुळसुळाट करून देणाऱ्या अडणीवरच्या शंखांना मुळात संध्योपासना म्हणजे काय हेच माहित नाही. रामायण,महाभारतातही संध्यावंदनाचा उल्लेख आहे. पितामह भीष्मदेखील संध्या करत होते. संध्योपासना ही प्रकृतीची उपासना आहे. त्यातून आपण सृष्टीविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. साहजिकच, सकारात्मकतेचा भाव दृढ होतो.

वर्तनात स्थिरता येणं, चंचलता कमी होणं, संयम येणं, क्रोधावर नियंत्रण येणं याकरिता संध्योपासनेचा अतिशय उत्तम फायदा होतो. आपल्यातल्या संतुलनाचा विकास होतो. त्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्तकाळी संध्या करायला हवी. “यथाशक्ति गायत्री मंत्र जपमहं करिष्ये।” असा संकल्प सोडून गायत्री उपासना करायला हवी. ती सूर्याची उपासना आहे. वैज्ञानिकदृष्ट्या संध्योपासनेतल्या प्राणायामाचं महत्व तर आता जगभर मान्य झालेलंच आहे.

समर्थ रामदास स्वामी तपःसाधनेच्या कालावधीमध्ये पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास ‘श्री राम जय राम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. समर्थांनी १३ कोटी रामनाम जप केला. यातून काहीच घेण्यासारखं नाही का?

उपासना आणि साधना या दोन्ही संकल्पनांचं मानवी आयुष्यातलं स्थान फार महत्वाचं आहे. प्रत्येकानंच या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पालकवर्गानं ‘उपासना’ आणि विद्यार्थीवर्गानं ‘साधना’ अशी विभागणी करून घेतली तरी सद्यपरिस्थितीत पन्नास टक्के सुधारणा होईल, याची मला खात्री आहे. पालकांनी उपासना कशाची करायची आणि मुलांनी साधना कशाची करायची, याची स्पष्टता आलीच पाहिजे. मोठ्यांचा मान राखणं, प्रामाणिकपणा, निस्पृहता, मनाची शुद्धता, तत्वनिष्ठता यांची दीक्षा तर दिली पाहिजेच, पण याशिवाय योग्य सामाजिक अंतर राखणं, स्क्रीनटाईम कमी करणं, रोज व्यायाम करणं, शाकाहार, वीज जपून वापरणं, राष्ट्रीय साधन संपत्तीचा योग्य व संतुलित वापर करणं, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळणं, जंक फूड चा त्याग, स्वदेशी वस्तू वापरणं आणि राष्ट्रभक्ती या दहा गोष्टींचीही दीक्षा पुरोहितवर्गानं संपूर्ण कुटुंबालाच दिली पाहिजे. ती काळाची गरज आहे.

मुंज झालेल्या बटूंची वजनं प्रचंड वेगानं वाढून ते गोलमटोल कसे होतात? आठवड्यातून दोनदा बाहेरचं अरबट-चरबट अन्न कसं खातात? अभ्यासाचं व्रत घेऊनही त्यांना उत्तम गुण कसे मिळत नाहीत? सामर्थ्याची साधना करण्याचं वचन देऊनही त्यांना जराशी हवा बदलली की त्रास कसा होतो? त्यांना नियमित आणि वेळेवर गृहपाठ पूर्ण करणंसुद्धा का जमत नाही? ते सतत खोटं का बोलतात? शालेय वयातच इंटरनेटचा गैरवापर कसा करायला लागतात? या व अशा इतर अनेक प्रश्नांच्या मुळाशी एक महत्वाचं कारण सापडेल, ते म्हणजे – आचरणानं समृद्ध, संपन्न, प्रगल्भ बनवणारे संस्कार आपल्या संस्कृतीत अस्तित्वात आहेत. पण त्या संस्कारांचं गांभीर्य आपण विसरून गेलो आणि त्यांचा इव्हेंट करून टाकला….!

हे सगळं सगळं सकारात्मक दृष्टीनं बदलायला हवं. अर्थातच, आपलीच कृती महत्वाची आहे, त्यातूनच बदल घडतील. मी एकट्यानं करून काय होणार? असा विचार करत राहिलो तर तेल-तूप गेलंच आहे, धुपाटणं सुद्धा हातचं जाईल…!

(ही मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत आणि बराच विचार करून, वेळ खर्च करून मी ती शब्दांत मांडली आहेत. आपण या मतांशी सहमत असाल तर नावानिशी शेअर करा. सहमत नसाल तर ‘तुझे आहे तुजपाशी’ म्हणून विषय सोडून द्या. पण माझं नाव खोडून, तोडफोड करून, ‘लेखक अज्ञात’, ‘सोर्स व्हाट्सॲप’, किंवा स्वत:च्या नावानिशी खपवण्याचा उद्योग कृपया टाळा.)

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.
सर्व हिंदुनी हा लेख जरुर वाचावा अन अनुकरण करण्याचा यत्न करणेस हरकत नसावी
अप्पा पाध्ये गोळवलकर

 2,901 Total Likes and Views

4 Comments
Buzzenn January 29, 2024
| | |
I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers
SignalBlogs January 28, 2024
| | |
Hello my loved one I want to say that this post is amazing great written and include almost all significant infos I would like to look extra posts like this
BlogMods January 28, 2024
| | |
Wow wonderful blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is great as well as the content
Networth Celeb January 23, 2024
| | |
I do not even know how I ended up here but I thought this post was great I dont know who you are but definitely youre going to a famous blogger if you arent already Cheers