एक हजार कोटी रु.मोजून खरेदी केले घर

Editorial

इंदिरा गांधींनी  १९७१ च्या निवडणुकीत  ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. गरिबी हटली की गरीबच हटले ते आपण पाहत आहोतच.  पण इथे आठवण यासाठी, की त्या घोषणेला  ५० वर्षे पूर्ण होत आहेत.  त्या मुहूर्तावर एका अब्जोपतीने मुंबईमध्ये मलबार हिल भागात   एक हजार कोटी रुपये मोजून एक घर विकत घेतल्याची बातमी आली. हा नियतीचा अजब न्याय म्हणावा लागेल. पाच हजार ७०० चौरस फुटाच्या ह्या घरासाठी  त्यांनी ३० कोटी रुपये तर नुसती स्टंप ड्युटी भरली.  ह्या अब्जोपतीचे नाव आहे  राधाकृष्ण दमाणी.  डी मार्ट नावाने  त्यांची मोठी उद्योग साखळी आहे.  १५ अब्ज डॉलर्स  किंमतीच्या संपत्तीचे ते मालक आहेत.  एका खोलीत वाढलेल्या  दमाणी यांनी स्वकर्तृत्वावर शुन्यातून  हे जग उभे केले.   पैसेवाल्यांना असले सौदे नवे नाहीत.  ६ वर्षापूर्वी  पूनावाला सायप्रस यांनी  ‘लिंकन हाउस’ ७५० कोटी रुपयाला विकत घेतले होते.  आपल्या भारतात  मुठभर लोकांकडे खूप पैसा आहे.

       फोर्ब्ज इंडिया ही संस्था दरवर्षी   श्रीमंतांची यादी जाहीर करते.  गेली १० वर्षे मुकेश अंबानी  ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.  अंबानींची संपत्ती आहे  ६ लाख कोटी रुपये.   पृथ्वीवरील सर्वात श्रीमंतांच्या यादीत  अंबानी आठव्या नंबरवर आहेत.  ३२ अब्ज डॉलर्सचे मालक गौतम  अदानी दुसऱ्या  नंबरवर आहेत. मोदींचे दोस्त म्हणून ह्या दोघांच्या नावाची चर्चा असते.  पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण  ३.६ अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. अब्जोपतींच्या यादीत  चीन, अमेरिकेनंतर   भारताचा नंबर लागतो.  एकट्या मुंबईत ६० अब्जोपती राहतात.

             आता गरीबीचे आकडे ऐका. तुम्हाला चक्कर येईल.  दर डोई दर दिवशी  ३२ रुपये  कमावणारी व्यक्ती  दारिद्र्यरेषेवर  आहे म्हणजे दरिद्री नाही  असे सरकारने नेमलेली तेंडुलकर समिती म्हणते.   एखाद्या मंत्र्याला ३२ रुपयात  माणूस  एक दिवस भागवू दाखव म्हणा.  पण सरकार म्हणते तर ऐकावे लागेल. प्रसिध्द   समाजशास्रज्ञ सुब्रमन्याम   यांच्या अभ्यासानुसार,  मात्र आजही  देशातील ३२ कोटी  लोकांना  दरमहा १ हजार रुपयेही  उत्पन्न मिळत नाही. करोनाच्या संकटानन्तर  हा आकडा  आणखी फुगला  असेल.  करोना येण्याच्या आधीही एक वेळ उपाशी राहणाऱ्यांची संख्या मोठी होती. आता तर करोना आहे आणि नोकऱ्या नाहीत.   करोना वाढला असतानाही  गरिबांकडून लॉकडाउनला  विरोध होतोय  याचे कारण गरिबी आहे. आपण खूप विकास केला. पण ह्या विकासात गरीब कुठे  दिसत नाही. ही शोकांतिका आहे.

0 Comments

No Comment.