SAY NO TO LOCKDOWN !!! – सचिन पावगी

Analysis News

स्वतः जागे व्हा!
इतरांना जागं करा!

बहुसंख्य लोकांच्या बुद्धीवर काबू मिळवण्यात ही सगळी राजकारणी मंडळी, मिडिया, सगळेजण यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळेच बहुसंख्य लोक हे असलं काहीतरी बडबडायला लागले आहेत…कोरोना पुन्हा वाढतोय हां!…दुसरी लाट आलेय आता!…खूपच घातक आहे हां ही महामारी!…2024 पर्यंत हे असंच चालणार!…वगैरे वगैरे…या बुध्दीमान लोकांच्या हे का लक्षात येत नाहीये की नेमकं महामारी कशाला म्हणतात!!! 100 पैकी 70 लोकं जेव्हा मरतात तेव्हा त्याला महामारी म्हणायचं असतं. या रोगावर कुठलही औषध नसताना इथे 100 मधले 98 लोकं बरी होतायत तर या रोगाला इतकं घाबरण्याचे काय कारण आहे!!!

बरं या आजाराबाबत पहिल्यापासूनच डॉक्टर्स कडून जे काही सांगण्यात आलं आहे त्याच्यात आणि सरकारकडून केले जाणारे उपाय या दोन्हीत प्रचंड प्रमाणात तफावत दिसून येतेय.उदा. पहिले – 18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण केलं जाणार आहे कारण 18 वर्षांखालील मुलांना कोरोना पासून काहीही धोका नाही…मग जर असं असेल तर तुम्ही शाळा कॉलेजस का बंद ठेवली आहेत? जे शिक्षक आहेत त्यांच्या ठराविक काळाने कोरोना चाचण्या करत राहून शाळा कॉलेजस सुरु ठेवताच आले असते.

उदा. दुसरे – सरकार म्हणतंय की गर्दी करू नका. मग तुम्ही दुकानं आणि इतर आस्थापनांच्या वेळा कमी करायला हव्या की वाढवायला हव्या? ठराविक वेळा साठीच जर दुकानं उघडी ठेवली तर गर्दी होणारच आहे. 24 तास सगळं चालू ठेवलं तर गर्दी विभागली जाईल ना!!!

उदा. तिसरे – रुग्णसंख्या वाढतेय आणि आपल्याकडे आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे त्यामुळे अशीच रुग्णवाढ होत राहिली तर उपचार मिळणे कठीण होऊन बसेल असे म्हणून लोकांना घाबरवून सोडणे…

मुळात कोणाला रुग्ण म्हणायचं हाच मुख्य प्रश्न आहे. काहीही लक्षणं नसताना ज्याची टेस्ट पॉजिटिव आहे तो रुग्ण की ज्याला ताप आणि सौम्य लक्षणं आहेत पण घरच्या घरी उपचार घेऊन बरा होऊ शकतो तो रुग्ण की ज्याला हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन (ICU नाही) बरे व्हावे लागणार आहे तो रुग्ण की ज्याला हॉस्पिटल मध्ये भरती केल्याशिवाय वाचूच शकत नाही (अत्यवस्थ) तो रुग्ण??? ऋतू बदलामुळे दर तिसरा माणूस सर्दी, खोकला अथवा तापाने आजारी पडतो व 4-5 दिवसात घरगुती उपचार घेऊन ठणठणीत बराही होतो!!! मग त्यालाही तुम्ही रुग्ण म्हणणार का???
हॉस्पिटल मध्ये दाखल करूनच बरे केले जाऊ शकणारे रुग्ण किती आहेत? तर एकूण रुग्णसंख्येच्या 2% आणि अत्यवस्थ होणारे रुग्ण किती तर या 2% च्या 20%…म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या 0.02%!!!

स्वाईन फ्लू, चिकन गुनिया, डेन्ग्यू, मलेरिया, टायफॉएड, कॉलरा यांपैकी कोणतीही साथ आली तरी एवढी लोकं तर दुर्दैवानं मरतातच ना!!!
मग या कोरोना साथीमध्ये तर मृत्यूदर 1.25% म्हणजे अगदीच नगण्य आहे ना. बरं, पहिल्यापासून हेच सांगितलं जातंय की लॉकडाऊन हा काही उपाय नाही. कारण लॉकडाऊन करूनही तुमची so called रुग्णसंख्या आटोक्यात राहातच नाहीये. मुळात लॉकडाऊन कशाकरता असतं? तर इतर कारणांमुळे (अपघात, दुर्घटना, इतर ऋतूजन्य रोग) आरोग्य व्यवस्थे वर पडणारा ताण कमी करून महामारी साठी आवश्यक त्या आरोग्य सुविधा उभ्या करण्यासाठी लागणारा वेळ व मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून. थोडक्यात, परीक्षेपूर्वी जशी preaperatory leave असते ना तो ऊद्देश आहे लॉकडाऊनचा! पण आज वर्षभरानंतरही जर तुम्ही लॉकडाऊनच्याच धमक्या देणार असाल तर याचा अर्थ ज्या विषयाची वर्षभर परीक्षा चालू आहे तोच पेपर पुन्हा देण्यासाठी preparatory leave मागण्यासारखं आहे ना!!! पुन्हा लोकांवरच जबाबदारी ढकलायला मोकळे. की लोकं नियम पाळत नाहीत. ऐकत नाहीत. गर्दी करतात.
अहो 136 कोटी लोकांचा देश आपला…गर्दी हीच आपल्या देशाची ओळख! काय आणि किती सामाजिक अंतर राखणार आपण?

नियम पाळण्याचं म्हणाल तर 100 लोकं सिग्नल ला थांबले तर 2 लोकं सिग्नल मोडणारे असतातच. ते 2 लोकं नियम पाळत नाहीत म्हणून उरलेल्या 98 लोकांवर निर्बंध लादायचे की तुम्ही रस्त्यावर येऊच नका, घरात बसा कारण 2 लोकं सिग्नल तोडतायंत…किती हास्यास्पद आहे हे!!!

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. आता कोणासाठी काय आवश्यक आणि काय अनावश्यक हे ठरवणार कोण? केवळ भाजीपाला, किराणा आणि दूध याच जीवनावश्यक गोष्टी आहेत का? सह – अस्तित्वाची संकल्पना आपण कधी समजून घेणार आहोत? फुलवाल्याकडून कोणीतरी फुलं विकत घेतल्याशिवाय फुलवाला भाजीपाला, किराणा दूध विकत घेऊ शकत नाही. समाजातल्या सगळ्या लोकांचे उद्योगधंदे चालू राहिले तरच आपला उद्योगधंदा चालू राहणार आहे हे कधी लक्षात येणारे आपल्या?

मा. मुख्यमंत्री काल म्हणाले की तुम्ही राजकारण करू नका. उपाय सुचवा. उद्योगपतींनी नुसते सल्ले देऊ नका तर डॉक्टर आणि नर्सेस पुरवा. हे सगळं जर बाकीच्यांनीच करायचं तर तुम्ही वर्षभर काय केलंत? तुम्ही का नाही आरोग्य सुविधा वाढवल्यात वर्षभरात? 98% लोकं वर्षभर इमाने इतबारे मास्क घालून फिरतायत, नियम पाळून आपापली कामं करतायत, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मधून कसंबसं सावरून सुद्धा पुन्हा आपापल्या पायांवर ऊभं रहायचा प्रयत्न करतायत. पण तुम्ही आपली खुर्ची संभाळण्याकडे लक्ष देण्याशिवाय वर्षभर काहीही केलं नाही.
मा. मुख्यमंत्री म्हणतात की ही लढाई आपण सर्वानी एकत्र येऊन लढायची आहे. अहो पण लढण्याची उर्मी ही “केवळ आणि केवळ ” पोट भरलं असेल तरच येऊ शकते ना! लॉकडाऊन करून लोकांचे कामधंदे बंद करून लोकांचं मानसिक खच्चीकरण करायचं आणि म्हणायचं की आता लढा! ” किंबहुना ” आपण लढणारचं आहोत…कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. काय अर्थ आहे याला???

काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की लोकं विचारतायंत, बाकीच्या राज्यांमध्ये बघा सगळं चालू आहे. तिथे होत नाहीये लोकांना कोरोना मग आपल्या राज्यातच का एवढं वाढलंय? त्यावर मला काही बोलायचं नाहीये!!! भले शाब्बास!! तुम्ही नाही तर कोण बोलणार? तुम्हीच (स्वयंघोषित बेष्ट शी एम ) मुख्यमंत्री आहात तर तुम्हीच उत्तर द्यायचंय!

आपल्याकडे एक म्हण आहे की ‘देव तारी त्याला कोण मारी ‘ त्याचं उलट सुद्धा आहे बरं का! ‘देव मारी त्याला कोण तारी ‘! आज ना उद्या प्रत्येकाला मरायचं आहेच. कोणीच अमर नाहीये. त्यामुळे माझी सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्व धीट होऊया, खंबीर होऊया आणि मनाशी ठरवून टाकूया की कोरोना ने मेलो तर आपलं स्वतःचं नशीब, पण प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी केल्या जात असलेल्या लॉकडाऊन मुळे होऊ घातलेल्या उपासमारी, बेरोजगारी, नैराश्य, आत्महत्या या सर्वांमुळे जिवंतपणीच मरणार नाही! म्हणून आता आम्हांला निर्बंधही नकोयत आणि लॉकडाऊनही नकोय. आमच्या स्वतःच्या आणि आमच्या प्रियजनांच्या जीवाची काळजी तुमच्या पेक्षा आम्हांला नक्कीच जास्त आहे. त्यामुळे निर्बंध आणि लॉकडाऊन च्या धमक्या देऊन लोकांचं मानसिक खच्चीकरण करणं बंद करा आणि परिस्थिती हाताळता येत नसेल तर पायउतार व्हा!!!

  • सचिन पावगी
0 Comments

No Comment.