नाना पटोले होणार प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष

News Politics

अखेर ठरले.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नाना पटोले  यांना प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय  राहुल गांधी यांनी  घेतला आहे.     संसदीय परंपरेप्रमाणे  विधानसभेचा अध्यक्ष  कुठले राजकीय पद  स्वीकारू शकत नाही.  त्यामुळे पटोले  आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा  उपाध्यक्षाकडे देतील. त्या नंतर  दिल्लीतून त्यांच्या नियुक्तीची घोषणा होईल.

                    नाना पटोले यांना   प्रदेश अध्यक्षपदासोबत मंत्रिपदही हवे होते. पण   राहुल गांधींनी तसे  करायला नकार दिला अशी माहिती मिळाली.   दिल्लीतल्या दोन दिवसाच्या मुक्कामानंतर नाना   मुंबईमध्ये परतले आहेत. कॉन्ग्रेसमधल्या नव्या घडामोडींची कल्पना शरद पवार आणि मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असून त्यांची ह्या बदलाला संमती घेण्यात आल्याचा दावा  कॉन्ग्रेसच्या एका नेत्याने केला.   नानांच्या जागी नवा अध्यक्ष एकमताने निवडायचा असल्याने  ही दक्षता कॉन्ग्रेसने घेतली आहे.

    विद्यमान अध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांच्याकडे   महसूल मंत्रीपदही होते.  त्यामुळे  पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष  देण्याची  मागणी  सुरु झाली होती. कामाचा ताण  येत असल्याने  थोरात यांनीही    अध्यक्षपद सोडण्याची इच्छा   हायकमांडकडे  बोलून दाखवली होती.  त्याबरहुकूम पक्षाला  पटोले यांच्यासारखा आक्रमक अध्यक्ष देण्याचा निर्णय झाला आहे.

         शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉन्ग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याची कॉन्ग्रेसजनांची  तक्रार होती.   तिचीही दखल  हायकमांडने घेतली आहे. लवकरच  मंत्रिमंडळात  मोठा बदल होऊ शकतो. नव्या कार्याध्यक्षांचीही यादी तयार होत आहे.

0 Comments

No Comment.