संघ तेव्हा कुठे होता?

Editorial News

राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  भाजपवर बोलताना  ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घसरले.  तसे पाहिले तर  संघाचा विषय काढायची गरज नव्हती. पण काढला. संघाला झोडपणे सर्वांना  आवडते. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता’ असे ठाकरे म्हणाले. त्यावरून राजकारण तापले आहे.  संघाचे संस्थापक सरसंघचालक    केशव बळीराम हेडगेवार हे  स्वतः   एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे   असा टोला  विरोधी नेते  देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.  हेडगेवार  यांची एवढीच ओळख नाही. ते कॉन्ग्रेसचे  सक्रीय कार्यकर्ते होते. दोनदा  तुरुंगातही  जाऊन आले. पुढे १९२५ मध्ये त्यांनी  संघाची स्थापना  केली आणि त्यांची लाईन बदलली.

                   आता ७० वर्षापूर्वी कोण कुठे होते? हा प्रश्न उपस्थित करणेच चुकीचे आहे. किती काळ  तीच तीच टेप वाजवत बसणार?  किती काळ इतिहास चिवडत बसणार. वर्तमानकाळात जगायला शिका. आजची गोष्ट करा ना.  राम मंदिरासाठी  संघ परिवाराने फक्त ४४ दिवसात २१०० कोटी रुपये  गोळा केले.  दुसऱ्या कुठल्या संघटनेत आहे ही ताकद?  काहीतरी विश्वासार्हता आहे म्हणून लोक दरवाजात उभे करतात ना. संघाचा छुपा अजेंडा  सर्वांना ठाऊक आहे.  तरीही संघाचा एक स्वयंसेवक  एकदा नव्हे तर दोनदा देशाचा पंतप्रधान होतो, याचा अर्थ  स्पष्ट आहे. मेजॉरिटीला ते हवे आहे.  संघात पूर्वी गडबड असेल. पण आज संघ बदलला आहे. बदलला नाही तर लोकच फेकून देतील.  सध्याचे सरसंघचालक  मोहन भागवत यांनी खूप बदल केले आहेत.  गोळवलकरांचे  कालबाह्य विचार आम्ही टाकून दिले आहेत  असे  त्यांनी मागे जाहीरपणे सांगितले.  तरीही  उद्धव ठाकरेंना अडचण  आहे.   युतीमध्ये   अनेक वर्षे सोबत होते तेव्हा त्यांना  संघात गडबड दिसली नाही.   आता दिसते. कारण  आता ते दोन कॉन्ग्रेसच्या पंगतीला बसले आहेत.  नव्या संगतीत त्यांना मजा येत आहे.  हिंदुत्वासाठी  ठाकरे आज ना उद्या  परत येतील ही आशा आता कुणी ठेवू नये. संघाला हाणून ठाकरे यांनी परतीचे दोर कापून टाकले आहेत.  तीन पायांचे हे सरकार  आता पूर्ण पाच वर्षे  पक्के  आहे.  पडायचे झाले तर   कुठल्या तरी एक कॉन्ग्रेसला बाहेर पडावे लागेल.  आणि ते शक्य नाही.  जातींचे आणि मतांचे गणित  पाहिले तर महाआघाडीला  दोनतीन निवडणुका मरण नाही.

0 Comments

No Comment.