लेटरबॉम्बने उद्धव सरकारमध्ये भूकंप

Editorial News
Spread the love

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग यांनी  राज्यातल्या  महाविकास आघाडी सरकारवर आज लेटरबॉम्ब टाकला.  ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सचिन वाझेला  दर महिन्याला  १०० कोटी रुपये गोळा करायला सांगितले होते’   अशा मजकुराचे पत्र  परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून   मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.  त्यांनी सोबत पुरावाही जोडला. राज्यपालांनाही ते पत्र पाठवले. ‘हा प्रकार आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  लक्षात आणून दिला होता’ असेही परमबीर यांनी म्हटले असल्याने  एकूण सरकारच  आरोपाच्या घेऱ्यात आले आहे.  अनिल देशमुखांनी  हे आरोप फेटाळले आहेत.  महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच  कोण्या गृहमंत्र्यावर  थेट  आरोप  झाल्याने  सरकार पडते की राहते अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे.

                    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ  एका  कारमध्ये  सापडलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या इतक्या स्फोटक असतील आणि  प्रकरण  इतके टोकाला जाईल अशी कल्पना विरोधकांनीही केली नसेल.   त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली, ह्या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारा पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या  पोलीस कोठडीत  आहे. परमबीर यांची उचलबांगडी झाली.    एकच प्रकरण, एकच  सचिन वाझे.  पण एकाचा जीव गेला  आणि दोघांना  घरी जायची वेळ आली. आणि आता तर गृहमंत्र्यालाच खायला वाझे निघाला  आहे. ही आग उद्धव ठाकरे यांचे सिंहासनही भस्म करू शकते.  भाजपच्या हाती तर आयते कोलीत लागले आहे.  देवेंद्र फडणवीस  यांनी  अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  पण ते राजीनामा देणार नाहीत. कारण राजीनामा देणे म्हणजे तो शरद पवारांचा पराभव असेल.  धनंजय मुंडे यांच्या भानगडीत पवारांनी राष्ट्रवादीचा मंत्री म्हणून मुंडेंना वाचवले होते.   शिवसेनेचे मंत्री  संजय राठोड यांचा मात्र राजीनामा घ्यायला उद्धव यांना भाग पाडले.   अनिलबाबू राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री.  त्यांचा राजीनामा म्हणजे सरकार  गेलेच समजा.  पवारांचा हा गेम आहे. ह्या खेळीत आपण कधी संपलो ते उद्धव ठाकरे  यांनाही कळणार नाही.  त्यामुळे  पवार राजीनामा घेणार नाहीत आणि देवेंद्र  राजीनामा घेतल्याशिवाय ह्या सरकारला सोडणार नाहीत. तिकडे दिल्लीत  अमित शहा यांचे काम सोपे झाले आहे.   राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट  आली तर  आश्चर्य वाटू नये.

 223 Total Likes and Views

0 Comments

No Comment.