उद्धव ठाकरेंवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

Editorial

मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.

भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उद्धव ठाकरेंविरोधात खटला दाखल होण्याची शक्यता
आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याविरोधात खटला देखील दाखल होण्याची शक्यता आहे.

काय सांगतो नियम?
शेवटच्या 48 तासात ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मुंबईचे मतदान गाजले ते त्याच्या भोंगळ कारभारामुळे… सामान्य जनता, विरोधी पक्ष, कलाकार सगळ्यांनीच टीका केला होती. मुंबईतील मतदारसंघातून संथ गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत अभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर केले. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.

आशिष शेलारांनी काय तक्रार केली?
उद्धव ठाकरेंनी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहे.

0 Comments

No Comment.