लोकसभेच्या निकालानंतर महायुती आणि मविआत फुट?

Analysis Maharashtra Politics

लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे मविआतील ठाकरे गट आणि कॉंग्रेसने चार पैकी २-२ जागा वाटून घेतल्या. शरद पवार गटाला एकही जागा सोडलेली नाही. शिवाय मनसेनेही उमदेवार जाहिर केला आहे.

मनसेचा उमदेवार

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीपुर्वी मोठी घोषणा केली होती. शिवाजी पार्कवर त्यांचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. फक्त लोकसभा निवडणूकांपुरता हा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले होते. आता लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत. विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ संपतो आहे. मुंबई, कोकण आणि नाशिकच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूका होतायेत. अशात मुंबई पदवीधरसाठी मनसेने उमेदवार जाहिर केला आहे. महायुतीतून मनसे काढता पाय घेते आहे का? असा सवाल यामुळं विचारला जातो आहे. शिवाय मविआतही पवार गटाला डावलून जागा वाटत झाल्याचं बोललं जातंय.

महायुतीचं फिसकटलं

मविआचे जनक अशी शरद पवारांची ओळख आहे. २०१९ विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागला. पवारांनी सुत्रं फिरवली. टोकाचा विरोध करणारे शिवसेना आणि कॉंग्रेस हे पक्ष त्यांनीच एकत्र आणले होते. २०२२ मध्ये मविआचं सरकार ढासळलं. अडीच वर्षे हे सरकार अस्तित्त्वात होतं. महायुतीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले. अशात लोकसभा निवडणूका जाहिर झाल्या. ठाकरेंनी स्वतःकडे सर्वाधिक जागा घेतल्या. जागा वाटपात बाजी मारली. नंतर सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट आणि कॉंग्रेस एकमेकांसमोर आले. त्यासाठी पवार गटाचे जयंत पाटील यांना जबाबदार धरण्यात आलं. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टीका केली. सांगलीवरुन ठाकरे गट आणि कॉंग्रेसचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळं पवार गटाच्या कुरघोड्या रोखण्यासाठी, मविआ एकसंध ठेवण्यासाठी ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय.

चार विधानपरिषदेच्या जागा

मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूकीला सामोरा जाईल. पैकी मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहिर केलेला नाही. या जागेवर सध्या ठाकरे गटाचे विलास पोतनीस आमदार आहेत. मविआकडून ठाकरे गटाने अनिल परब यांना इथून उमेदवारी दिलीये. कोकण पदवीधरमध्येही महायुतीने उमेदवार जाहिर केलेला नाही. ही जागा मविआत कॉंग्रेसला जाईल. सध्या या जागेवर भाजपचे निरंजन डावखरे आमदार आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात ही महायुतीने उमेदवार दिलेला नाही. इथं मविआकडून ही जागा ठाकरेंनी स्वतःकडे घेतलीये. इथून कपील पाटील हे लोकभारती पक्षाचे आमदार आहेत. नाशिकक्ष शिक्षकमध्येही महायुतीकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. इथून शिवसेनेचे किशोर दराडे आमदार आहेत.

२१ जागा रिक्त

महाराष्ट्र विधीमंडळात विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत. विधानसभेचे २७८ सदस्य आहेत. तर विधानपरिषदेत एकूण ७८ जागा आहेत, त्यापैकी शिवसेना (अविभाजित) ११, राष्ट्रवादी (अविभक्त) ९, काँग्रेस ८ आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) २२ सदस्य आहेत. जनता दल (संयुक्त), शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचे प्रत्येकी १ सदस्य आहेत, तर चार अपक्ष आहेत. विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. रिक्त झालेल्या जागांमध्ये राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या १२ सदस्यांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडलेल्या ९ सदस्यांचा समावेश आहे.

0 Comments

No Comment.