मनसेचे सुप्रीमो राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरील सभेत केलेल्या भाषणाने राजकारण तापलं आहे. भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा असा नवाच वाद सुरु झाला आहे. “मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना केलं होतं. त्याला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू झाला होता. पोलिसांनी कारवाई केली. पाच हजार रुपये दंडही ठोठावला. त्यामुळे राज यांचे हे ‘भोंगे कार्ड’ किती चालते तो प्रश्नच आहे.
राज ठाकरे सभेत म्हणाले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? असा सवालही त्यांनी केला. पण उद्या असे भोंगे विरुद्ध भोंगे उभे झाले तर तणाव निर्माण होऊ शकतो. राजसाहेबांना याचा अंदाज नसेल अशातला भाग नाही. मग स्वतःच्या हिंदुत्वाला नवी धार देण्याची ही धडपड आहे का? महाआघाडी सरकार हे भोंगे कसे हाताळते ते पहायचे.
राज ठाकरेंनी यावेळी शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांना टार्गेट केले. उद्धव यांनी भाजपशी दगा करून गद्दारी केली म्हणाले. पवारांचा राष्ट्रवादी आल्यानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले असाही घणाघात केला. त्यामुळे अस्वस्थ शरद पवारांनीही पलटवार केला. गेल्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणारे राज आता भोंगे वाजवायला आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात, याला काय म्हणायचे? राजसाहेबांना थोडे गंभीर व्हावे लागेल. उद्धव यांच्यापासून वेगळे झाल्यानंतरच्या २००९ च्या निवडणुकीत पहिल्याच एन्ट्रीत मनसेला १३ जागा मिळाल्या. हा जोश ते टिकवू शकले नाहीत. २०१४ मध्ये एकच आमदार निवडून येऊ शकला. गेल्या वेळी एकही जागा मनसे लढली नाही. कार्यकर्ते टिकतील कसे? उद्धव महाआघाडीच्या तंबूत गेल्याने हिंदुत्वाची पोकळी तयार झाली आहे. ‘पिक्चर दाखवतो’ असे राज म्हणाले होते. पण येत्या महापालिका निवडणुकीत त्यांचे पत्ते त्यांनी उघड केले नाहीत. पण एक नक्की. नव्या हवेत मनसे आणि भाजप जवळ येतील. शिवसेना सोडून गेल्याने भाजपलाही मित्र हवा आहेच. राजसाहेबांनी शिवसेनेची मराठी मते फोडली तर मुंबई महापालिकेचे निकाल भूकंपासारखे असतील. लोक आपल्याला फक्त ऐकायलाच येत नाहीत तर मतेही देतात हे राजसाहेबांना पुढच्या ६ महिन्यात दाखवून द्यायचे आहे. तसे झाले तर २०२४ मध्ये भाजप आणि मनसे ही नवी भक्कम युती महाराष्ट्राला दिसेल.
197 Total Likes and Views