हायकोर्ट म्हणते, एकटयाकडून बलात्कार अशक्य

Analysis

‘कोणताही प्रतिकार न होता  एकट्या माणसाने  बलात्कार करणे अशक्य आहे,’   असे नमूद करत   नागपूर उच्च न्यायालयाच्या न्या.  पुष्पा गणेडीवाला यांच्या पीठाने  नुकतीच एका आरोपाची    मुक्तता केली.    त्याच्यावर  अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.

                      २६ वर्षे वयाच्या  ह्या तरुणाला सत्र न्यायालयाने  ह्या बलात्कारप्रकरणी  १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा  सुनावली होती.  त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गतही  गुन्हे ठेवण्यात आले होते.  आरोपीने ह्या  निकालाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.   आपण परस्परसंमतीने संबंध ठेवले होते आणि मुलगी पळून गेल्याचे  तिच्या आईला  समजल्यानंतर  या मुलीने बलात्काराची तक्रार  दिली असा  बचाव आरोपीने केला.

                बलात्काराच्या खटल्यामध्ये  महिलेचा जबाब  ही एकमेव बाब  आरोपीविरोधात  गुन्हा सिध्द करण्यास पुरेशी असते.  परंतु, पीडितेच्या जबाबात  त्रुटी  असल्यास  त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. इथे  मुलीचा जबाब मानकानुसार नसल्याचे  कोर्टाने म्हटले.  ‘एकट्या पुरुषाने   १५ वर्षे वयाच्या मुलीचे तोंड दाबून, दोघांचे कपडे काढून, कोणत्याही प्रकारे झोंबाझोंबी न होता  बलात्कार करणे  अशक्य आहे.   आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध केला असता तर पीडितेने  प्रतिकार केला असता. मात्र असा प्रतिकार करताना जखम झाल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये  दिसून आलेले नाही    असे न्यायमूर्तीने   निकालात म्हटले आहे.

          न्या. गणेडीवाला यांचे काही निकाल याआधीही गाजले आहेत.  अल्पवयीन मुलीचा हात पकडून पंटची  चेन काढणे  म्हणजे लैंगिक  अत्याचार होत नाही    असे नमूद  करत याच पीठाने   एका आरोपीला ‘पोक्सो’तून मुक्त केले होते.  दुसऱ्या एका खटल्यात, पीडितेच्या त्वचेला स्पर्श  झाला नसल्याचे कारण देत   याच पीठाने आरोपीची ‘पोक्सो’तून सुटका केली होती.   त्यावर  सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्यानन्तर   सर्वोच्च न्यायालयाने  निर्णयाला स्थगिती दिली होती.

0 Comments

No Comment.