मंत्री संजय राठोड गुरुवारी प्रगट होणार

Editorial News

‘बेगुनाह कोई नही, सब के राज होते है,  किसी के छुप जाते है, किसी के छप जाते है.’ प्रसिध्द पत्रकार यदु जोशी यांच्या ह्या शेर शायरीचा अनुभव महाराष्ट्र गेली काही दिवस घेतो आहे. परळीच्या  पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले    राज्याचे वनमंत्री  आणि  शिवसेना नेते  संजय राठोड यांचे काय होणार?  याचे कुतूहल  दिवसेंदिवस ताणले  जात आहे. सामान्य माणसाचा   संबंध नाही. पण गोड चेहऱ्याच्या  पुजामुळे लोक या मामल्यात  भावनेने  ओढल्या गेले आहेत.  पुजाला  न्याय मिळावा ही प्रामाणिक भावना त्यामागे आहे. पण मायबाप सरकारला घाई नाही.  तपासात सत्य बाहेर येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सुरुवातीलाच सांगून टाकले.  पोलीस तपास किती दिवस चालेल   ते सांगता येत नाही.  विरोधी पक्षाच्या आरोपात काही तथ्य नाही  असा दावा खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख  करीत असताना व्यवस्थित  चौकशी कशी होणार हाही प्रश्न आहे.

       पुजाची आत्महत्या तपासाला वाटते तेवढी सोपी नाही. तिने  चिठ्ठी सोडलेली नाही. भाजपवाले   संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवत आहेत. ओबीसी समाजाच्या बदनामीचा हा डाव आहे का? पद्यामागे काय राजकारण शिजते आहे?  कारण   राठोड ज्या समाजाचे आहेत त्या बंजारा समाजाने  त्यांना केव्हाच क्लीन चीट दिली आहे.   राठोड गेली २० वर्षे ज्या  मतदारसंघातून  निवडून येत आहेत त्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये  बंजारा समाजाने आज जंगी मोर्चा काढून समाजाची बदनामी थांबवा अशी मागणी केली. पूजाच्या कुटुंबियांचीही    तक्रार नाही. पूजावर कर्ज होते. त्या तणावात ती  होती असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.  मग उरतात त्या   व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स. ह्या क्लिप्स सत्य खोदू  शकतात.  त्यातल्या संभाषणातला  एका बाजूचा आवाज   राठोड यांचा आहे का?  पोलिसांना  तपासायचे आहे.

       सत्य बाहेर येण्यासाठी लोकांना फार वेळ  वाट पहावी लागणार नाही   अशा घडामोडी आज घडल्या. राठोड  येत्या गुरुवारी  लोकांसमोर  येतील अशी माहिती  त्यांच्या समाजातूनच   पुढे आली.  वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे  बंजारा समाजाचे संत सेवालाल महराज यांचे मंदिर आहे.   तिथे धर्मगुरूंच्या साक्षीने  राठोड   बोलतील असे सांगण्यात आले.  सुरुवातीलाच  राठोड पुढे आले असते तर  ह्या आत्महत्येचे एवढे राजकारण झाले नसते.   पूजाने सात फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्या घटनेला  नऊ  दिवस होत आहेत.  भाजप नेते  या मामल्यात    सरकारला घेरत  असताना  राठोड  ‘नॉट रिचेबल’  झाल्याने  संशयकल्लोळ माजला आहे.  ‘हमाम मे सब नंगे  है’  ह्या म्हणीप्रमाणे साऱ्याच पक्षात कमीजास्त  ‘रसिक’ पुढारी आहेत.  पुजावरून सुरु आरडाओरड्यामुळे   ह्या ‘रसिक’ नेत्यांचे टेन्शन वाढले असणार.   पण भाजपवाले म्हणतात तो  न्याय  लावला तर  बरेचश्या राजकारण्यांना घरी बसवावे लागेल. उठसुठ राजीनामा मागण्याची लाट येईल  अशी  काळजी अनेक नेते  व्यक्त करताना दिसतात ते त्याच भीतीने.    एकूणच रंग असा आहे, की  शिवसेना  किंवा सरकार  ह्या भानगडीत पडू इच्छित नाही.  सारा मामला पोलिसांवर ढकलला आहे. अशा हवेत संजय राठोड गुरुवारी काय बोलतात? आरोप फेटाळतात की प्रायश्चित्त घेतात?  याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. राठोड यांचेच नव्हे तर   उद्धव सरकारचेही  भवितव्य पणाला लागले आहे असेच आपण समजायचे. मात्र लोकांच्या मनात शंका आहेत.  उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच  राठोड यांना  बोलावून  फैसला का केला नाही?  शेवटी त्यांच्याच पक्षाचा मामला होता. आपल्याच मंत्र्याची शिकार कशी करायची  अशा पेचात उद्धव  आहेत का? उद्धव यांनी  आठ दिवस  राठोड यांना संशयाच्या पिंजऱ्यात  का ठेवले? की  त्यांचे आधीच बोलणे झाले आहे? सरकारच्या हाती हायटेक पोलीस आहेत.  क्लिप्समधला आवाज तपासायला  पोलिसांना इतका वेळ लागावा?  लोकांच्या मनात  ह्या शंका आहेत. मुहूर्त काढून राठोड यांचाही मुंडे होणार अशी चर्चा लोक करीत असतील तर कुणाकुणाची तोंडे  आपण बंद करू शकतो?

0 Comments

No Comment.