नितीन गडकरींशी आता कोण लढणार?

Analysis Nagpur Politics

लोकसभा निवडणुकीला अजून  तीन-साडे तीन वर्षे आहेत. पण चर्चा सुरु झाली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी  यांनी ज्या जोमाने  विकास कामांचा नव्याने धडाका  लावला आहे ते पाहता  तिसऱ्या टर्मलाही ते उभे राहतील.  असे झाले तर मग  गडकरींशी कोण टक्कर घेणार? गेल्या निवडणुकीत    कॉन्ग्रेसचे नाना पटोले यांनी  चांगली टक्कर दिली होती.  दोन लाख १६ हजार मतांच्या लीडने  गडकरी  विजयी झाले. मात्र  २०१४ च्या निवडणुकीतला त्यांचा लीड   ६८ हजाराने घटला. खासदार न सही, आमदारही सही, ह्या हिशोबाने पटोले पुढे   साकोलीतून लढून आमदारकी मिळवते झाले.  पटोले यांना  आता प्रदेश कॉन्ग्रेसचे  अध्यक्ष  बनवण्यात आले आहे.  त्यामुळे ते पुन्हा  गडकरींशी  पंगा घ्यायला नागपुरातून उभे राहण्याची शक्यता कमी आहे. पुन्हा नागपुरात लढले तर  त्यांच्या महाराष्ट्र फिरण्यावर मर्यादा येतील.  त्यामुळे कोणाला लढवायचे?   कॉन्ग्रेसला उमेदवार देताना   दमछाक होणार आहे.

             कारण गडकरींना तुल्यबळ लढत देईल असा उमेदवार आजतरी   विरोधी तंबूत दिसत नाही. सध्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना मैदानात उतरवले तर  घमासान होऊ शकते.  कॉन्ग्रेसने कुणबी कार्ड  चालवले तर  लढतीत  चुरस येऊ शकते. नव्या चेहऱ्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील  यांना  गडकरींच्या अंगावर सोडले जाऊ शकते.  विद्यमान आमदार विकास ठाकरे हेही चांगली फाईट देऊ शकतात.  कॉंग्रेसने दावा सोडला तर  महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी आपले    माजी आमदार प्रकाश गजभिये यांना  लढवू शकते.

                   गडकरींनी  ६ लाख ६० हजार मते घेतली होती.  तेवढी मते घेऊ शकेल असा  हेविवेट  उमेदवार कॉन्ग्रेसला शोधावा लागेल. मिळाला नाही तर   मग कॉन्ग्रेस  भाजपला वॉक ओव्हर  देणार का? ‘शेर कभी बुढा  नही होता’ असे म्हणतात.  माजी खासदार  विलास मुत्तेमवार यांना पुन्हा लढवले तर ते चमत्कार करू शकतात,  असा कॉन्ग्रेसमधील एका गटाचा दावा आहे.  तब्बल सात वेळा  लोकसभा जिंकलेले मुत्तेमवार अलीकडे फारसे सक्रीय नाहीत. पण  कॉन्ग्रेस अडचणीत  दिसली तर ते आखाड्यात उडी घेऊ शकतात. जुने निष्ठावंत  गेव्ह आवारी यांच्या नावाचा आग्रह धरू शकतात. राजकारणात काहीही होऊ शकते.

                        गडकरी यांना याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे ते कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत.  कामांचा धडाका त्यांनी नव्या  जोमाने सुरु केला आहे.  नाग नदीच्या  शुद्धीकरणासाठी १८०० कोटी  रुपयांची मंजुरी आणून  त्यांनी धमाल केली.  मेट्रो रेल्वेच्या   दुसऱ्या टप्प्यासाठी   सहा हजार कोटी रुपयांची   तरतूद  यंदाच्या बजेटमध्ये करवून घेऊन त्यांनी  विरोधकांचे टेन्शन वाढवले आहे.  गेल्या ७०  वर्षात प्रथमच नागपूरसाठी एवढा पैसा  कुणी खेचून  आणला. नागपुरात एकूण ८६ हजार कोटी रुपयांची कामे सुरु असल्याचा गडकरींचा  दावा आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते तर हा आकडा वाढला असता. लोकांना हे कळते. तरीही विदर्भात भाजपच्या  १५ जागा कमी झाल्या. पुढे काय होणार? राजकारणातला हा थरार अनुभवण्यासाठी   जनतेला  २०२४ ची वाट पहावी लागणार आहे.

0 Comments

No Comment.