सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना विमानातून उतरवले

Editorial News

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील संघर्ष  लपून राहिलेला नाही.  गुरुवारी  तो चांगलाच चिघळला.  कोश्यारी  राज्य सरकारच्या विमानाने  डेहराडूनला जाणार होते.   पण सरकारने त्यांना परवानगी नाकारली.  कोश्यारी यांना असे काही होईल याची कल्पना नसावी.  ते सरळ  विमानात जाऊन बसले.  काही वेळाने त्यांना  वास्तव कळले. नन्तर दुपारी त्यांनी प्रवासी विमान पकडले. या प्रकारावर भाजप गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

                       राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याच्या बाबतीत  प्रथमच  असे अभूतपूर्व घडल्याने   भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले.  त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले.  इतका इगो कशासाठी? असा सवाल करून  फडणवीस म्हणाले,    सरकार रस्त्यावरचे भांडण  भांडत आहे.

                  राज्यपालांना  विमान हवे असेल तर  सामान्य प्रशासन विभागाकडे  लेखी परवानगी मागावी लागते. तसे पत्र कालच राज्यपाल कार्यालयाकडून  गेले होते.  पण पुढे काहीच झाले नाही.   राज्यपाल खासगी  कामाने जात होते म्हणून त्यांना  सरकारी विमान नाकारले असावे असे शिवसेनेकडून सांगितले गेले.  पण याची आधीच संबंधितांना कल्पना दिली असती तर  राज्यपालांची फजिती टळली असती.  तसे न करून सरकारने राज्यपालांशी उघड  संघर्ष   करण्याचे ठरवलेले दिसते.

                    राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर  नियुक्त  करावयाच्या  १२  जागांना  कोश्यारी यांनी  अजून मान्यता न दिल्याने   आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहेकारण राज्यपाल ही यादी  मंजूर करण्याच्या अजिबात  मनस्थितीत नाहीत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना राम नाईक यांनीही अशाच प्रकारे  वर्षभर यादी रोखून  ठेवली होती अशी माहिती आहे.  कोश्यारीही   सत्ताधाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहतील  अशी लक्षणे आहेत. ‘राज्यपालांनी  अंत पाहू नये’ असा थेट इशारा   उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच दिला होता.    राज्यपालाने फाईल अडवली म्हणून सरकारने त्यांना द्यायचे विमान अडवले. भविष्यात हा संघर्ष कसे वळण घेतो याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.         विधानपरिषदेवर १२ आमदार  नियुक्त करण्याचा  अधिकार राज्यपालांना आहे. पण त्या नावांची यादी   सरकार तयार करते आणि राज्यपालांना पाठवते.  आतापर्यंतचे राज्यपाल  डोळे झाकून ही यादी मंजूर करीत आले आहेत.  मात्र  कोश्यारी हे वेगळे रसायन आहे. त्यातल्या त्यात ते  थेट  पंतप्रधान मोदी यांच्या खास मर्जीतले आहेत. त्यामुळे की काय त्यांनी ह्या फाईलला हात लावलेला नाही.  कुठली नावे पाठवायची याचे काही निकष आहेत.   राजकारणात नसलेल्या  पण कला, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये असलेल्या दिग्गजांना  विधान परिषदेवर पाठवता येते.  सर्व खबरदारी घेत  सरकारने नावांची यादी पाठवून काही महिने झाले. पण कोश्यारी निर्णय घ्यायला तयार नाहीत आणि घेणारही नाहीत. १७१ आमदारांचे बहुमत असतानाही  नवे  १२ आमदार  नेमू शकत नाही म्हणून  सत्ताधाऱ्यांची चिडचिड  सुरु आहे.

0 Comments

No Comment.