पुजाची आत्महत्या, आता कोणता मंत्री अडकणार?

Editorial News

बुवा तेथे बाया.  मग मंत्री तेथे काय?  पूर्वी राजकारणी पैशाच्या भानगडीत बदनाम व्हायचे.  आता बाईच्या  भानगडीत  त्यांच्या नावाची चर्चा होते.  गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे   मंत्री धनंजय मुंडे  यांचे नाव चालले. पुढे त्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने  मामला मिटला. आता पूजा चव्हाण नावाच्या  परळीच्या एका तरुणीच्या  आत्महत्येने राज्यात खळबळ आहे.  या आत्महत्येशी संबंध लावला जात असलेल्या  ज्या मंत्र्याच्या नावाची चर्चा आहे तो मंत्री विदर्भातला  असल्याचे बोलले जाते.  भाजपने हे प्रकरण उचलले असून    विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी  पोलिसांकडे  पारदर्शक  चौकशीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही चौकशीत सत्य बाहेर येईल  असे पुण्यात पत्रकारांना सांगितले.

                पण खरेच सत्य बाहेर येईल? कारण पुणे पोलिसांनी तूर्त अपघाती मृत्यू  म्हणून नोंद घेतली आहे. सोशल मिडीयावर   काही ऑडियो क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्या ऑडियो क्लिप्समध्येही काही  मिळाले नसल्याचे पोलीस सांगत  आहेत.  पूजा  सोशल मिडियावर लोकप्रिय होती. तिच्या  अशा प्रकारे जाण्याने समाज हादरला आहे.  राजकारण्यांनी उडी घेतल्याने  मामला तापला आहे. पण असे काय घडले होते , की एक तरुणी बाहेरून  पुण्यात येते आणि   आठवडाभरात   आत्म्हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते?  आत्महत्या की हत्या? लोक नाही नाही ते बोलत आहेत.

                            पूजा चव्हाण ही  मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळीची  राहणारी तरुणी. म्हणजे भाजप नेत्या पंकजा  मुंडे यांच्या  भागातली. बंजारा समाजाची  २२ वर्षे वयाची पूजा  सोशल  मिडिया स्टार  होती. टिकटोक स्टार  होती.  काही दिवसापूर्वी  इंग्रजी शिकण्यासाठी  पुण्याला आली होती.  भाऊ आणि मित्रासोबत  राहू लागली. अचानक  रविवारी  तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन  आत्महत्या केली. ती   मानसिक आजारी होती. उपचारही घेत होती असे  सांगण्यात येते. नेमके काय झाले?  पोलिसांना मोठे खोदकाम करावे लागणार आहे.

0 Comments

No Comment.