फोडाफाडी सुरु, सांगलीत जयंत पाटलांनी केला चंद्रकांतदादांचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Analysis News Politics
Spread the love

सत्तेचा महिमा अपार आहे.   युतीच्या राजवटीत दोन्ही कॉन्ग्रेसमधले  नेते  भाजपमध्ये घुसू पाहत  होते. भाजपचे तिकीट म्हणजे सत्तेचा पासपोर्ट मानला जात होता. मात्र गेल्या वर्षी राज्यात महाआघाडीची  सत्ता आली  आणि भाजपला ‘बुरे दिन’ आले.  आता उलटी लाट सुरु झाली आहे.  भाजपमधून  बाहेर पडण्याची संधी  अनेक आमदार शोधत आहेत.  उद्धव सरकार लवकरच पडेल असे सांगून   भाजप नेत्यांनी  ह्या आमदारांना तूर्ततरी रोखून धरले आहे. पण कुठल्याही क्षणी   भूकंप येऊ शकतो.  पुणे, सांगलीत त्याची सुरुवात झाली आहे. भाजपचे सात नगरसेवक फोडून  भाजपच्या ताब्यातील  सांगली महापालिका   राष्ट्रवादीने हिसकून घेतली आहे.

               प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती.  ५९ वर्षे वयाच्या मुरब्बी जयंतरावांनी अखेरपर्यंत  भाजपला गाफील ठेवून  चंद्रकांतदादा यांना  धक्का दिला.  तब्बल ३० वर्षापासून  जयंतराव  इस्लामपूर मतदारसंघातून निवडून येत आहेत. शिकार टप्प्यात आली की  जयंत पाटील कार्यक्रम करतात असा  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा लौकिक आहे.  तो त्यांनी सिध्द केला.  महिला राखीव पदाचा कार्यकाळ  संपल्याने  पुढील अडीच वर्षासाठी   सांगलीच्या महापौरपदाची निवडणूक झाली.  भाजपचे  सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत ‘नॉट रिचेबल’ होते.  त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता गमवावी लागली. दिग्विजय सूर्यवंशी महापौर बनले. उपमहापौर पद कॉन्ग्रेसला गेले.                      

पुणे पदवीधर आणि  शिक्षक  मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला हरवल्यानंतर  राष्ट्रवादीने केलेली ही शिकार आहे.  दोन्ही कॉन्ग्रेसला एकत्र बसवून  महाआघाडी  धक्के देत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक  जवळ येत असताना   पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची वेळ  भाजपवर आली आहे. फोडाफोडीचे लोण वाढण्याची चिन्हे  मिळू लागल्याने  भाजप नेत्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

 239 Total Likes and Views

0 Comments

No Comment.