राठोड यांचा मुंडे झाला?

Analysis Editorial News Politics

            कुणी कितीही पटका,  वनमंत्री आणि शिवसेना नेते  संजय राठोड यांचा बाल बाका होणार नाही.  करोनाच्या भाषेत बोलायचे झाले तर राठोड  ‘निगेटिव्ह’ आहेत, ‘निगेटिव्ह’ राहतील.  राठोड यांना आज सरकार दरबारी जी   वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट झाले.  मराठवाड्यातील पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येच्या  वादात अडकलेले   राठोड  १५ दिवस गायब होते.  काल  अचानक ते पोहरादेवी गडावर प्रगट झाले.  तिथेही त्यांच्या समर्थकांनी हजारोंची गर्दी आणून शक्तीप्रदर्शन केले.  करोनाकाळात  गर्दी करू नये असे खुद्द  त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश असताना  गर्दी केली गेली.  मुख्यमंत्रीच नव्हे तर  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांनी   नाराजी व्यक्त केली.  राठोड यांचा  मुख्यमंत्री आज राजीनामा घेतील  असे वाटले होते. पण काय झाले?  काहीही झाले नाही आणि काही होणारही नाही. आपल्या देशात कुठल्या घोटाळ्याचे काय झाले?  येत्या एक तारखेपासून विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे. बजेट आहे.  भाजपच्या हंगाम्यात  अधिवेशन वाहून जाईल. पूजाचा इश्यू किती दिवस चालवणार?  इथे दररोज  नवनव्या ‘निर्भया’  न्यायाच्या रांगेत उभ्या होत आहेत.  काही दिवसांनी लोक विसरून जातील.

      काही व्हायचे असते तर आज झटपट झाले असते. पण रामशास्त्री एकदाच जन्माला येतो. राठोड यांनी मस्तपैकी  मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली.  ‘१५ दिवस कुठे होतात?’  असे कुणीही त्यांना विचारले नाही. कोण विचारणार? तीन पायांचे   सरकार आहे.  कुणाचा पायपोस कुणात नाही.  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एक महिलेने आरोप केले होते.  त्यांचे  काही वाकडे झाले नाही. मग इथे राठोड यांच्या बाबतीत तर सारे हवाहवाई आहे. जिच्यावरून भाजपवाल्यांचा  आरडाओरडा सुरु आहे  ती पूजा या जगात  नाही.  तिने  काही चिठ्ठीही ठेवलेली नाही.    काही ऑडियो क्लिप्स मिळाल्या आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर पाहता येईल.  सत्य वगैरे काही म्हणतात ते  बाहेर येईल. पण प्रश्न कायद्याचा नाही, नैतिकतेचा आहे.  केवळ मालगाडी घसरली म्हणून  राजीनामा  देणारे मंत्री देशाने पाहिले आहेत. पण आज सारेच  घसरले आहे. कुणाकुणाचा राजीनामा घेणार? सरकार रिकामे होईल. राठोड यांना कुणी गुन्हेगार म्हणणार नाही. पण संशयाचे धुके  असलेल्या  मंत्र्याच्या  मांडीला मांडी  लावून  मुख्यमंत्री बसतातच कसे?   भानगडीचा निकाल लागेपर्यंत  राठोड यांना   बाजूला राहायला  सांगता आले असते. पुजाला बाजूला ठेवा.  पोहरादेविच्या गर्दीबद्दल तर  उद्धव यांना  राठोड यांना जबाबदार धरता आले असते. कोरोनाचे नियम मंत्री पाळत नाहीत म्हणजे काय प्रकार आहे? मला तर वाटते की  राठोड यांच्यापेक्षा  मुख्यमंत्रीच जास्त टेन्शनमध्ये आहेत. सरकार टिकवायचे आहे. टिकेलही. पण एक सांगतो.   भाजपला घालवून   महाआघाडीने  जे कमावले  होते  ते ह्या दोन मंत्र्यांच्या   स्वागत मिरवणुकांनी गमावले.  बीडमध्ये  धनंजय मुंडे यांच्या स्वागताला जेसीबी लावून क्रेनने हार घालण्यात आला.  पोहरादेवीत  ‘संजयभाऊ आगे बढो’चे नारे  लागले. प्रभू रामचन्द्राचेही असे देवदुर्लभ स्वागत झाले नसेल.  लोकांची जशी लायकी तसे सरकार त्यांना मिळते असे म्हणतात. तसे काही घडलंय बिघडलंय काय?

0 Comments

No Comment.