राम मंदिरासाठी लोकांनी दिले २१०० कोटी रुपये

Editorial News

रामाच्या नावाने  दगडही तरंगला होता  असे आपण ऐकतो.  आता कलियुगात रामाच्या नावाने दगडच नव्हे तर मंदिरासाठी लोकांमधून पैसेही उभे होतात, तेही थोडेथोडके नव्हे  चक्क २१०० कोटी रुपये.  ही रक्कम करोनाकाळात आणि तीही फक्त ४४ दिवसात उभी झाली हे आणखी विशेष.   विश्वास बसणार नाही, पण हे  वास्तव आहे. रामनामाचा महिमा ह्या  संगणक युगातही कायम आहे.

              प्रभू रामचंद्राचा  जिथे जन्म झाला त्या उत्तर प्रदेशातील अयोध्या  नगरीत  रामाचे भव्य मंदिर  बांधण्यात येत आहे. त्यासाठी ट्रस्ट  बनवला आहे. तो बांधकाम करणार आहे. मुख्य मंदिर बांधण्याचा खर्च आहे ३०० कोटी रुपये. तीन वर्षात बांधून होईल. मंदिराचा पाया घालण्यासाठी   माती काढण्याचे काम सुरु झाले आहे.   ७० एकर जागेवर  हा संपूर्ण प्रकल्प   उभा होत आहे आणि  मंदिर परिसर विकासाचा  एकूण  खर्च आहे  ११०० कोटी रुपये.  हा पैसा मोठ्या देणग्या घेऊन उभा  करता आला असता.  पण तसे केले तर त्यात सामान्य माणसाला गुंतवता आले नसते.  म्हणून परिवाराने डोके चालवले  आणि घरोघरी जाण्याचे ठरले.  १५ जानेवारीपासून  पैसे गोळा करायला सुरुवात झाली.  विश्व  हिंदू परिषद आणि संघ परिवारातील असंख्य  संस्थांचे  सुमारे दीड लाख लोक  ह्या कामात भिडले होते.  पैसे मागण्याचा  संघवाल्यांचा स्वभाव  नाही. तो त्यांचा पिंड नाही.   पण रामासाठी घरोघरी फिरले.  देशभर पाच लाख खेडी फिरले.  ५५ कोटी लोकांपर्यंत पोचले. म्हणजे कोट्यवधी घरांशी संघ परिवाराचा थेट संबंध आला आहे.  संघ परिवाराचे हे प्रचंड नेटवर्क आहे. जगात  कुठेही एवढी मोठी मोहीम  झालेली नाही.  कॉन्ग्रेसवाले संघवाल्यांना शिव्या  मारतात. पण लोकांपर्यंत घरोघरी  कोण जातो?   संघवाले गेले. राहुल गांधी, ममतादीदी यांच्याकडे गेले नसतील.  ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडेच ते गेले. विशेष म्हणजे कॉन्ग्रेसवाल्यांच्या घरांनीही    संघवाल्यांना रिकाम्या हाताने पाठवले नाही. कुठेही गडबड नाही. कुपन, पावत्या लगेच  फाडून हाती.  लोकांनी मोकळ्या हातांनी दिले.  विदर्भातून  ४० कोटी मिळाले.  एकट्या नागपुरातून   १३ कोटी रुपये गोळा झाले.  ह्या शनिवारी ही मोहीम संपली.

                 ट्रस्टचे खजिनदार  गोविंद देव गिरी   म्हणतात, आम्ही २१०० कोटी रुपयाचा आकडा पार केला आहे.   शेवटचा हिशोब होईल तेव्हा हा आकडा आणखी फुगलेला असेल.  आता बोला.  मंदिरासाठी हवे  होते ११०० कोटी रुपये. मिळाले २१०० कोटी रुपये. म्हणजे हजार कोटी रुपये जास्त मिळाले.  ह्या जास्तीच्या पैशाचे काय करणार?   

0 Comments

No Comment.