ममताने हाती घेतले हिंदू कार्ड

Editorial News
Spread the love

राजकारण भल्याभल्यांना बदलवून टाकते.   सरडाही  लाजेल इतक्या वेगाने राजकारणी रंग बदलतात.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी यांनी आज नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरायला जाताना  शिव मंदिरात पूजा केली,  चंडीपाठ म्हटला तेव्हा   बंगालचा मतदार  चाट पडला. ही  दीदी  एवढी बदलली कशी?   कॉन्ग्रेसवाले तर जाम  वैतागले आहेत.  कोणी जय श्रीराम म्हटले तर   भडकणारी दीदी  नंदीग्राममध्ये चक्क  भक्तीचे  रंग उधळताना  दिसली. ‘मै हिंदू की बेटी हू, बम्मन हू’ असे दीदीने  जाहीरपणे सांगितल्याने  बंगालच्या निवडणुकीत वेगळीच चुरस आली आहे.

           नंदीग्राम ही तीच जागा आहे जिथून दीदी  ‘दुर्गा’ बनली. दिदीचा  हा गड आहे. गेल्या तीन निवडणुकीत तृणमूल कॉन्ग्रेसचा उमेदवार इथून जिंकत आला आहे. पण आता  टक्कर  भाजप म्हणजे नरेंद्र मोदी-अमित शहा जोडीशी आहे.  दीदीला नक्कीच टेन्शन आले असणार. २०१६ म्हणजे गेल्या निवडणुकीत  तृणमूलचे उमेदवार   शुवेंदू अधिकारी   इथून  ८० हजार मतांच्या  लीडने  निवडून आले होते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुस्लीम उमेदवाराचा  त्यांनी पराभव केला होता.  भाजपला  फक्त १० हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. गेल्या वेळी शुवेंदू यांना मिळालेली मतं  तृणमूलची  होती की  स्वतः शुवेंदू यांची होती याचा निकाल  या निवडणुकीत लागणार आहे. कारण भाजपने   दीदीच्या ह्या  सेनापतीला  फोडून मोठी शिकार केली.  डीडीची सारी अंडीपिल्ली  शुवेंदू यांना माहित आहेत.  त्यामुळे दीदीला ही निवडणूक सोपी नाही. पहिल्याच दिवशी आपला मुस्लीमधार्जिणा  मुखवटा फेकून दीदीने हिंदू कार्ड हाती घेतले. आपले सेक्युलर नेते किती सेक्युलर आहेत याचा हा एक नमुना आहे. त्याला कारण आहे. ह्या मतदारसंघात  ७० टक्के हिंदू आहेत. उरलेले मुसलमान आहेत.  दोघांना सांभाळताना दिदीची  दमछाक होणार आहे.   २७ मार्चला  मतदान आहे. म्हणजे आणखी  १७ दिवस  मंदिरात जायचे की मशिदीत, ह्या  धर्मसंकटात दीदी  असतील.

 188 Total Likes and Views

0 Comments

No Comment.