नागपुरात १५ मार्चपासून सात दिवस लॉकडाउन

Editorial News

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून  करोनाचे रुग्ण वाढत होते.  दररोज  एक हजारावर नव्या रुग्णांची भर पडत होती.   बुधवारी तर १७१०  नवे रुग्ण  निघाले.   शेवटी ज्याची भीती होती तेच झाले.  १५ मार्चपासून २१  मार्चपर्यंत  नागपुरात  कडक लॉकडाउन  लागू होत आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी  आज ही घोषणा केली. पालकमंत्री म्हणाले,   या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.   अत्यावश्यक दुकाने, बँका  आणि भाजीपाला सुरु राहील.   खासगी कार्यालये बंद राहतील.  सरकारी कार्यालये २५ टक्के  कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. विनाकारण रस्त्यावर कुणाला फिरता येणार नाही.

         उपराजधानीत करोना   घुसायला बरोबर आज एक वर्ष पूर्ण होत आहे.    विमानमार्गे तो आला.   दुबईमार्गे  आयटी  कंपनीतील  कर्मचारी आले.    त्यातला ११ मार्चला  पहिला बाधित निघाला आणि नागपुरात खळबळ उडाली..एकापासून दुसरा असे करीत करीत  वर्ष उलटले.  वर्षभरात १३ लाख ३६ हजार चाचण्या झाल्या. त्यात १ लाख   ६२ हजार लोक पॉझिटीव्ह  निघाले. यातल्या  १ लाख ४५ हजार जणांनी  करोनावर मात केली. पण  ४ हजार ४१५ जणांचा  मृत्यू झाला. गेल्या वर्षी मार्चमध्ये फक्त १६ जण बाधित निघाले  होते.  आता ह्या मार्चमध्ये आतापर्यंत १२ हजार बाधित आहेत आणि  ८० जणांचा बळी गेला आहे. एवढा धुमाकूळ घालूनही  करोना  जायचे नाव घ्यायला तयार नाही.

                      तसे पाहिले तर  लॉकडाउन हे उत्तर नाही.  या आधीही आपण मोठा  लॉकडाउन पाहिला आहे. तात्पुरता फायदा होतो.  पुन्हा लोक  बाहेर निघाले की  रुग्ण वाढतात.  सुरक्षित अंतर राखा, मास्क घाला असे वारंवार  प्रशासन सांगत असतानाही लोक ऐकायला तयार नाहीत.  करोनाची दहशत कमी झाली म्हणून की काय किंवा लस आली म्हणून की काय लोक बिनधास्त फिरत आहेत. गर्दीत मिसळत आहेत.  पण लस घेतली तरी करोनाचे नियम पाळायचे आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाही.  बाधितांना घरात राहणे बंधनकारक असताना  तेही  बाहेर फिरत आहेत.  भटकणाऱ्या  अशा २० रुग्णांवर  महापालिकेने  करावी करीत त्यांना    कोव्हिड सेंटरमध्ये पाठवले.  लॉकडाउनची मोठी किंमत समाजाने आतापर्यंत मोजली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे  संपले.  तरीही लोक सुधारायला तयार नाहीत.   त्यामुळे प्रश्न पडतो, की    लॉकडाउन हीच आपली लस आहे काय?

0 Comments

No Comment.