फाटलेल्या जीन्स आणि संघपरिवार

Analysis News

तीर्थसिंह रावत. उत्तराखंडचे  नवे मुख्यमंत्री. भाजपने नुकतेच त्यांना खुर्चीत बसवले.  आल्या आल्या  महिलांच्या कपड्यांवरून  त्यांनी केलेल्या टिपण्णीवरून   वाद पेटला आहे. हल्ली फाटक्या जीन्स  घालण्याची टूम आली आहे.  अशी फाटके जीन्स घातलेली एक महिला   त्यांच्या     नजरेस आली. मग काय विचारता.  एका कार्यक्रमात   ह्या मुख्यमंत्र्याने   तमाम महिलावर्गाला झोडपून काढले.  ‘फाटक्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार?’  असं बरेचसे ते बोलले. यावरून  त्यांना फटाके  सुरु झाले आहेत.  संघ स्वयंसेवकाचा गणवेश पूर्वी  अर्धी चड्डी आणि पांढरा  शर्ट असा होता.  प्रियांका गांधी यांनी  मोदी, गडकरी, मोहन भागवत यांचे त्या काळातले फोटो   टाकले  आणि खाली ओळी लिहिल्या…’अरे देवा, यांचे गुडघे तर उघडे आहेत.’ खूप साऱ्या महिला संघटनांनी   ह्या तीर्थनाथाला ठोकून काढले आहे.

    त्यात आश्चर्य नाही.  हे तीर्थसिंह रावत नरेंद्र मोदींना देव मानतात. मोदी  राम, कृष्ण आहेत  असे म्हणतात. आता बोला. काहीतरी वेगळे बोलण्यासाठी  संघपरिवारातली माणसे   प्रसिध्द आहेत. योगी आदित्यनाथ, साध्वी प्रज्ञा, साक्षी महाराज  आदी मंडळी देशाचे मनोरंजन करीत असतात.   हेडगेवार, गोळवलकर, देवरस ह्या  सुरुवातीच्या तीन  सरसंघचालकांनी   त्यांच्या पदाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. पण नंतरच्या सरसंघचालकांनी वादग्रस्त वक्तव्ये  करून ती प्रतिष्ठा  मातीत घातली.  नागपूरजवळच्या  महाशिबिरात  रज्जुभैय्यानी   सोनिया गांधी यांच्यासंबंधात गैरउद्गार काढले होते.   के. सुदर्शन यांनी तर ‘प्रत्येक कुटुंबात चार मुले असली पाहिजेत’ असा आदेश  देशातील हिंदूंना दिला होता.  सुदर्शन एका घरी जेवायला गेले होते. तिथे   स्वयंपाकाचा ओटा पाहून ते म्हणाले होते..‘हे काय? बाईने जमिनीवर बसून  स्वयंपाक केला पाहिजे.  नऊवारी पातळ नेसले पाहिजे.’  मोहन भागवत तर चार घर पुढे गेले.  जुनी गोष्ट आहे. इंदूर येथे एका कार्यक्रमात  भागवत म्हणाले होते, की ‘स्त्रियांनी  घराच्या मर्यादेत राहून  घर सांभाळले पाहिजे. तसे करणे  त्यांच्यावर लग्न या कराराने  घातलेले बंधन आहे.’ आता बोला.   संघाने  कालबाह्य विचार टाकून दिले आहेत असे  सांगितले जाते.  तरीही परिवारातील माणसे   काहीतरी भयंकर बोलत असतात.  संघाने  संस्कार, संस्कृतीचा फार बागुलबुवा   माजवू नये.    संस्काराचे  काय करायचे ते लोक पाहून घेतील.  संघाच्या हाती देशाचे सरकार आहे.  लोकांना काही चांगले दिवस पहायला मिळतील  असे काहीतरी करा.  मोदींना तेवढे  सांगण्याची हिंमत  मोहन भागवत करतील काय?

0 Comments

No Comment.