‘मोदींचा माणूस’ दत्ताजी होसबळे बनले संघाचे नवे सरकार्यवाह

Editorial News

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाने कात  टाकली.  तब्बल १२ वर्षानंतर आपला जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह आज बदलला.    ६५ वर्षे वयाचे कर्नाटकचे दत्तात्रय होसबळे  यांना  सरकार्यवाह निवडले.   ७३ वर्षे वयाचे भय्याजी जोशी यांच्या जागी  ते  आले आहेत.  संघाची दोन दिवसाची  अखिल भारतीय प्रतिनिधी सभा   बेंगळूरू येथे सध्या सुरु आहे. तिच्यात  एकमताने ही निवड झाली. संघात हे एकच पद असे आहे, की ज्याच्यासाठी निवडणूक होते.  पण निवडणूक म्हणजे मतदान  वगैरे प्रकार संघात नसतो.    सर्वसाधारण कानोसा घेऊन थेट नावाची घोषणा केली जाते.    त्याप्रमाणे  होसबळे यांच्या नावाची  घोषणा झाली.  संघातील मोदीसमर्थकांचा हा विजय मानला जातो.

        २०२४ मध्ये  लोकसभा निवडणुका आहेत.  २०२५ मध्ये  संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.  या पार्श्वभूमीवर    सरकार्यवाहपदाची जबाबदारी कोणाकडे येते  याची परिवारात उत्सुकता होती. सरकार्यवाहच पुढे सरसंघचालक  होतो, अशी प्रथा आहे.  सरसंघचालक हे पद  नंबर एकचे असले तरी त्यांचा रोल  गाईड, फिलोसॉफरसारखा असतो.  सरकार्यवाह  हा चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसरसारखा असतो.  त्याच्या मदतीला चार सहसरकार्यवाह असतात.   या चौघांच्या टीममध्ये   होसबळे हे एक होते.  होसबळे गेल्या १२ वर्षापासून  सह्सरकार्यवाह होते.   नरेंद्र मोदी  यांचा माणूस म्हणून  होसबळे यांच्याकडे पाहिले जाते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर  होसबळे यांना   सरकार्यवाहपदी आणण्याचा खूप प्रयत्न झाला.  ६ वर्षापासून  त्यांच्या नावाची चर्चा होती.  पण होसबळे आले तर     मोदींचा दबाव वाढेल ह्या भीतीने संघाने  तो डाव हाणून पडला.   वय होऊनही भय्याजी जोशींना चालवले.   संघ परिवारात  संघाची भूमिका ‘बिग ब्रदर’ची आहे.   मोदींचा पिंड वेगळा आहे.  मोदी कुणाच्या नियंत्रणाखाली  राहायच्या स्वभावाचे नाहीत. त्यामुळेच की काय, तुम्ही पाहाल, ह्या ६ वर्षात मोदींनी  संघाशी फार जवळीक टाळली  आहे.   पण आता त्यांचाच  माणूस  आल्याने मोदींना  मैदान मोकळे आहे.

             होसबळे हे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातले आहेत.  विद्वान माणूस आहे. माणसे जिंकण्यात  पटाईत आहे.   १९६८ मध्ये ते संघात आले.  पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून   चमकले.   आणीबाणीकाळात  मिसामध्ये १६ महिने तुरुंगवास भोगला आहे.  भय्याजी जोशी यांना  संघटनेचा माणूस म्हणून ओळखले जाते.  होसबळे  राजकारणात अधिक रस घेतात.   त्यामुळे  भविष्यात संघ कसा बदलतो ते पहायचे.

0 Comments

No Comment.