शरद पवार ह्या वयात गद्दार होतील?

Analysis Maharashtra News
Spread the love

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी    भाजपचे चाणक्य  अमित शहा  यांची गुप्त भेट  घेतल्याच्या बातमीने  खळबळ आहे.  दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे ही भेट झाल्याची बातमी एका गुजराती  वृत्तपत्राने  दिली आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  अशी काही भेट झाल्याचा इन्कार केला.  पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.  शहा मात्र बोलले. ‘राजकारणात सारं काही  सांगायचं नसतं’    असे शहा  म्हणाले.  त्यामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ब्लड प्रेशर वाढले असणार.  कशाला तिकडे गेले पवार? फाफडा खाण्यासाठी तर नक्कीच गेले नसणार. मग काय भानगड आहे?  जेमतेम दीड वर्ष झाले.  सरकार पडते की काय?

             हे सरकार टिकणार नाही अशा बातम्या ह्या सरकारच्या पहिल्या दिवसापासून  सुरु आहेत. ‘मी पुन्हा येणार’ असे ओरडून ओरडून सांगत दिलेला  शब्द देवेंद्र फडणवीस यांनी अजून तरी मागे घेतलेला नाही.  सरकार पडायचेच असेल तर तीन पैकी कुठला तरी एक पक्ष  बाहेर  पडला पाहिजे.  शरद पवारांनी बाडबिस्तर गुंडाळण्याची तयारी चालवली आहे का?  गेल्या दोन महिन्यातील  घडामोडी  बोलक्या आहेत.  ‘१०० कोटी रुपयाच्या टार्गेट’वरून  महाआघाडीसरकारमध्ये   अस्वस्थता आहे.  सचिन वाझे, परमबीर सिंग, अनिल देशमुख, रश्मी शुक्ला  यांचे फटाके साधे नाहीत. आरडीएक्स आहे.  आता तर शिवसेनेचे   नेते संजय राऊत अनिल देशमुखांवर कुदले आहेत.   शरद पवारांनी  नाही म्हटले असतानाही  उद्धव यांनी देशमुखांवरील  आरोपांची चौकशी  लावली आहे. ‘देशमुख अपघाताने गृहमंत्री झाले’ असे  राऊत म्हणाले. पण मला सांगा. इथे कोण सरळ मार्गाने आला?  ‘उद्धव विश्वासघाताने आले.’ ‘आमच्यामुळे सरकार आहे’ असे नाना पटोले  हेही म्हणू लागले आहेत.  कोणाचाच कोणावर विश्वास नाही.  देवेंद्र यांनी बनवलेला  ‘सावजी मसाला’  राष्ट्रपती  राजवट  आणण्यासाठी पुरेसा आहे.  बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर  मोठा भूकंप होऊ शकतो.  पवारांना याची भनक लागली असावी.  ते गुजरातमध्ये गेले याचा अर्थ  खतरा  आहे.  पुन्हा एकदा  देवेंद्र, अजितदादा यांना भल्या पहाटे  फोन येऊ शकतो.  पवारांच्या मनात नेमके काय चालू आहे याचा अंदाज येत नाही.  ते काहीही करू शकतात.  मनात आणले तर फोड्फाड करून अमेरिकेत  ट्रम्प यांना पुन्हा सत्तेत आणू शकतात.  सवाल एवढाच आहे. ह्या वयात पवार   स्वतःला गद्दार म्हणवून घेतील?

 243 Total Likes and Views

0 Comments

No Comment.