पवार-भाजप जवळीक वाढतेय

Editorial News Politics

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि   भाजपचे चाणक्य  अमित  शहा यांची नुकतीच भेट झाली की नाही हे अजूनही रहस्य आहे.   त्यांची भेट झाली असेल किंवा नसेलही. पण एक स्पष्ट आहे.  पवार आणि भाजप यांच्यातली जवळीक वाढते आहे.  दोस्ताना वाढतो आहे. तसा हा दोस्ताना २०१४ मध्येही दिसला होता.  निकाल पूर्ण लागायचे असताना पवारांनी   सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा  जाहीर केला होता.  सात वर्षात खूप सारे पाणी पुलाखालून गेले.  दीड वर्षापूर्वी पवारांनी  शिवसेनेच्या मदतीने  सरकार उभे केले.  पवार समजायला  कठीण आहेत हेच खरे. पवारांच्या पोटात काय चालले आहे हे कुणाला कळत नाही  असे सारेच म्हणतात.  पण आता पोटदुखीच्या  निमित्ताने  डॉक्टरांना त्यांच्या पोटात डोकावण्याची संधी मिळाली आहे.   

            पोट दुखू लागल्याने पवार रुग्णालयात दाखल झाले तेव्हा  सर्वात आधी  भाजप नेत्यांनी   त्यांच्या  तब्येतीची विचारपूस केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तो देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे    यांच्यापर्यंत   अनेक नेत्यांनी त्यांना  शुभेच्छा दिल्या. पण  सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याकडून  विचारपूस झाली नाही.  साधा फोन  नाही. त्याबद्दल  सारेच आश्चर्य व्यक्त करीत आहेत.  पवार भाजपच्या जवळ येत चालले आहेत का?  अशा चर्चांना  उधाण  आले आहे.            त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार होती. पण त्रास वाढल्याने डॉक्टरांनी  मंगळवारी रात्रीच  तातडीची शस्त्रक्रिया केली.  पित्तनलिकेत  खडा अडकून पडला असल्याचे  लक्षात आले. तो तसा राहू देणे धोक्याचे होते. त्यामुळे  अडकून पडलेला खडा एन्डोस्कोपीने बाहेर काढण्यात आला.  चार दिवसाने त्यांना  डिस्चार्ज दिला जाईल.  मात्र  १० दिवसाने आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.   पवार आज ८० वर्षाचे आहेत.  या वयातही सक्रीय आहेत.   आज सकाळी  उठल्यानंतर  ते लगेच कामाला लागले. पेपर वाचून काढले.   पेपर वाचतानाचा त्यांचा  फोटो त्यांच्या मुलीने पाठवला  सुळे यांनी सुळे यांनी  ट्वीट केला तेव्हा  महाराष्ट्राला  हायसे वाटले.

0 Comments

No Comment.