मोदींना ममता ठोकणार?

Editorial News Politics
Spread the love

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि  पुद्दुचेरी  ह्या पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  यातले आसाम सोडले तर कुठेही भाजपची सत्ता नाही.  त्यामुळे ह्या निवडणुकांचे निकाल  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या लोकप्रियतेचे थर्मामिटर  असेल. मोदींच्या कारभारावर  जनता खुश आहे का?   जनमताचा कौल  या निवडणुकांच्या निकालातून  मिळणार आहे.  चुरस पाचही  राज्यात आहे. पण  बंगालमध्ये आरपारची लढाई आहे.  कारण   मुख्यमंत्री ममतादीदी.  आणि त्यांना हरवण्याची भाजपची खुन्नस.  १० वर्षापासून दीदीची सत्ता आहे.  यावेळी ती  उखडून फेकण्यासाठी  मोदी-अमित शहा जोडीने  पूर्ण ताकद लावली आहे.  काय होईल?  २९४ जागांच्या विधानसभेत   तृणमूल कॉन्ग्रेस १४० जागा  जिंकेल असा  असे बहुतांश ओपिनिअन पोल सांगतात.  भाजपला १००  जागा जिंकण्याची संधी आहे.  कॉन्ग्रेस आणि माकप यांच्या नेतृत्वाखालील सात पक्षांची आघाडीही मैदानात  असली तरी खरी टक्कर   ममता आणि भाजप यांच्यात आहे.

                    ममता जिथून उभ्या आहेत त्या नंदीग्राम मतदारसंघात आज झालेल्या  प्रचंड मतदानामुळे  सर्वांचेच ब्लड प्रेशर वाढले आहे. काय होणार?  काहीही होऊ शकते.  भाजपने ही निवडणूक जीवनमरणाचा प्रश्न बनवली आहे. २०१४ ची  निवडणूकही  मोदी एवढ्या गंभीरपणे लढले नसतील. पाच वर्षापूर्वी  बंगालमध्ये भाजप औषधालाही  नव्हता.   तृणमूल कॉन्ग्रेस  फोडफाड करून   भाजपने  सैन्य उभे केले.  ममताच्या विरोधात उभे आहेत ते सुवेंदू अधिकारी एकेकाळी   ममता यांचे विश्वासू सहकारी होते.  दीदीची सारी अंडीपिल्ले त्यांना माहित आहेत.  आपण ‘बंगाल की बेटी’ आहोत, भाजपवाले बाहेरचे आहेत असे सांगत दीदी  फिरत आहेत.  प्रचाराच्या धामधुमीत  त्यांच्या पायाला दुखापत झाली.   दीदी व्हीलचेअरवरून  तोफा डागत आहेत.  राजकारण माणसाला कसे बदलवते ते पहा.  ‘जय श्रीराम’ म्हणताच चिडणाऱ्या  दीदी आता  मंदिराच्या चकरा  मारत  आहेत.  काल  तर त्यांनी आपले गोत्र  शांडिल्य असल्याचे  सांगून  धमाल केली.  हिंदू मतांना गोंजारण्याची ही धडपड आहे.  पुन्हा ममता आल्या तर बंगालचा पाकिस्तान होईल  असा इशारा भाजप नेते देत आहेत.  बंगालमध्ये ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. मतांचे ध्रुवीकरण कसे होते, कॉन्ग्रेसआघाडी कुणाची मते खाते  त्यावर  सारा खेळ आहे.  दोन मे रोजी निकाल लागेल तेव्हा देशाची राजकीय समीकरणे बदलताना दिसतील.

 267 Total Likes and Views

0 Comments

No Comment.