ममता वाराणशीहून लढणार २०२४ मध्ये

Analysis News
Spread the love

२०२४च्या लोकसभा निवडणुकांना  बराच वेळ आहे.  पण  आतापासूनच   रणशिंग फुंकायला  सुरुवात झाली आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी  २०२४मध्ये  वाराणशीहून लढू शकतात असे एक पिल्लू कुणीतरी सोडून दिले. सोशल मिडीयावर त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.   सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  एकूण ८ टप्प्यात  तिथे मतदान होत आहे.   ममता नंदीग्राममधून उभ्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचे मतदान पार पडले. ‘ममता तिथे हरल्या आहेत. त्यामुळे आणखी एक जागेहून लढण्याची तयारी त्यांनी चालवल्याची चर्चा आहे’ असे  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी   एका प्रचार सभेत सांगितले.  त्याला टोला लगावताना तृणमूलच्या  नेत्यांनी वाराणशीचा विषय काढला  तेव्हा राजकारण तापले. वाराणशी हा मोदींचा मतदारसंघ आहे.  २०१४ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांना ललकारले होते. मोदींनी तीन लाख ३७ हजार मतांनी  त्यांची जिरवली.  वाराणशीमध्ये मोदींना हरवणे सोपे नाही. पण नंदीग्रामची निवडणूक जिंकली तर ममता   वाराणशीहून  लढू शकतात.  त्याला कारण आहे. ममता ह्या  अतिमहत्वाकांक्षी  आहेत.     त्या १० वर्षे मुख्यमंत्री आहेत.    हौस फिटली. आता त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे.  मोदींना टक्कर  देऊ शकेल  असा एकही नेता आज विरोधी पक्षांच्या छावणीत नाही. नेतृत्वाची मोठी पोकळी  आहे. म्हणायला राहुल गांधी,  अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे असे पायलीचे पन्नास  नेते आहेत. पण मोदिंपुढे  डीपोझीटही वाचवू शकणार नाहीत.   त्या पार्श्वभूमीवर ममता चांगली टक्कर देऊ शकतात.  त्यांचीही तिच तयारी सुरु आहे.  चार दिवसांपूर्वी  त्यांनी सर्व  विरोधी  नेत्यांना पत्र  लिहिले.  भाजपविरोधात  एकजुटीने लढण्याचे आवाहन  केले.  ममतादीदीने दोन वर्षापूर्वी कोलकात्यामध्येही हा प्रयोग केला होता. सर्व विरोधी नेत्यांना एक  व्यासपीठावर आणले होते. जागावाटपावरून तो प्रयोग फसला. विरोधी  ऐक्याच्या फुग्यात दीदी पुन्हा हवा भरू पाहत आहेत.  त्या लढतीलही. पण त्यांना ताकद द्यायला विरोधी पक्ष आहे कुठे?  विरोधी पक्ष दुर्बल आहे. त्यांच्यात फाटाफूट आहे.  शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करायला हवे असे संजय राऊत म्हणाले तेव्हा  काँग्रेसवाले त्यांच्या अंगावर धावून गेले. आता बोला.  त्यामुळे मोदींशी लढायची वेळ आली तर  सारे विरोधी पक्ष एक होतील याची  हमी नाही.  आणि झाले तरी क्रेडीबिलीटी नाही.  मते मिळणार कुठून?  मोदींचा कारभार हुकुमशहासारखा  आहे. त्यांना सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता हवी आहे..हे सारे एकवेळ  मान्य. पण त्यांना हरवणार कोण? मोदींना मोदीच हरवू शकतात.

 159 Total Likes and Views

0 Comments

No Comment.