एका संघनिष्ठ व्रतस्थ पत्रकाराचे जाणे -मोरेश्वर बडगे

Editorial Maharashtra Nagpur
Spread the love

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रथम प्रवक्ते आणि   संघाच्या तरुण भारत ह्या मुखपत्राचे दीर्घकाळ  संपादक राहिलेले  माधव गोविंद म्हणजे मागो उपाख्य बाबुराव  वैद्य यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस  वयाच्या ९७ व्या वर्षी आपला निरोप घेतो तेव्हा साऱ्याच विचारांची माणसे  त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतात. तशी ती आता  झाली. मागोंच्या वाट्याला आलेला असा भक्तीभाव  देशातील संघाच्या दुसऱ्या कोण्या पदाधिकाऱ्याच्या  वाट्याला क्वचितच आला असेल. शंभर वर्षे सोबत करू असा  बाबूरावांचा वादा होता. नव्वदीनंतर जेव्हा जेव्हा  वयाचा विषय निघे  तेव्हा ते  ‘आता मला इतकी वर्षे, इतके महिने, इतके दिवस राहिले’ असं  छाती ठोकून सांगत. अलीकडे मात्र त्यांना संध्याछाया खुणावत असाव्यात.  मृत्यूला ते मित्र मानू  लागले होते. कोरोनाकाळात एकदा नव्हे दोनदा मस्त भेटले, गप्पा मारल्या.  गेल्या महिन्यात मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी  शंभरीचा आपला दावा कायम असल्याचे  सांगितले होते. पण सेंच्युरी हुकली. शरीर साथ देईना तेव्हा ह्या कसलेल्या ऑलराउंडरने दोन वर्षे तीन महिने आधीच  विकेट टाकून दिली. बाबुराव गेले म्हणजे नेमके काय हरवले हे आता त्यांच्या चाहत्यांना टोचते आहे.

         बाबुराव  कोण नव्हते? संघनिष्ठ होते ही त्यांची एक ओळख झाली. संघाची ते ‘थिंक टंक’ होते.  काही वर्षे  संस्कृतचे प्राध्यापक होते, एकदा आमदार होते. पुलोदच्या राजवटीत शरद पवारांनी  खास आग्रहाने त्यांना विधानपरिषदेवर  घेतले होते. राज्यपालाच्या  कोट्याच्या यादीवरून आज सुरु मारामारी पाहिली तर  बाबुरावांच्या हिमालयाच्या उंचीचा अंदाज येतो. बाबुराव चांगल्यापैकी शेतकरी होते, पट्टीचे वाचक होते.  सर्वात महत्वाचे म्हणजे ते माणूस होते. बड्या वर्तुळात उठबैस असूनही बाबूरावांनी अखेरपर्यंत आपले आयुष्य भाड्याच्या घरात काढले, हे किती जणांना  माहित असेल? शर्ट, धोतर, काळी टोपी अशी साधी पण उच्च विचारसरणी ते जगले. हा माणूस स्वतःचा नव्हताच. तसे पाहिले तर त्यांचे शरीर, आत्मा, मन, बुद्धी हे सारेच काही संघाचे होते. अखेरपर्यंत ते संघ विचाराशी एकनिष्ठ राहिले. संघाचा आदेश होताच लठ्ठ पगाराची पक्की प्राध्यापकी सोडून ते तरुण भारतात संपादक म्हणून रुजू झाले. किती स्वयंसेवक आज अशी हिंमत दाखवू शकतील? स्वतःची पाचपैकी दोन मुलं त्यांनी संघाला दिली.  त्यांचा संघविचार  मात्र अस्सल होता. त्यांचे हिंदुत्व त्यांना इतर धर्मांचा द्वेष  करायला शिकवत नव्हते. आपण  जेव्हा दुसऱ्याशी व्यापकरित्या जुळतो, तेव्हा हे जुळणे म्हणजे धर्म अशी धर्माची सोपी व्याख्या ते सांगत. संघाचा माणूस म्हटल्यावर अनेक जण  दचकतात. मात्र धर्म आणि परंपरा रीतसर सांभाळणारे बाबुराव  कर्मठ नव्हते.  त्यांच्या घरच्या महालक्ष्मीचे जेवण  ही अनेक  जातीपंथातील लोकांची पंगत राहायची. त्यांच्या  घरी उमा भारती दिसायच्या तसा शंकर पापळकरसारखा फाटका समाजसेवकही चमकायचा. इतके सर्वसमावेशक जगणे फार थोड्या लोकांना जमते. इतरांच्या  वैचारिक स्वातंत्र्याचा आदर करणारा  असा संघवाला सापडणे अवघड.

              ‘वृत्तपत्र जनतेचे असते  आणि ते  सर्वसमावेशक  राखणे हे संपादकाचे उत्तरदायित्व आहे’ हा वसा घेऊन बाबूरावांनी संपादकी केली. संघाच्या टीकाकारांनाही त्यांच्याकडे जागा मिळे. बाबुराव स्वतःही रोखठोक लिहित. मात्र अहंकार नव्हता. समवृत्ती म्हणतात ती अशी.  बहुतेक सरसंघचालकांशी त्यांचे तार जुळले होते. त्यामुळे बाबूरावांचा शब्द संघात प्रमाण मानला जायचा. त्यांचे लिखाण म्हणजे संघाचे मनोगत मानले जायचे.  तरुण भारतात त्यांनी  तब्बल ३०  ‘भाष्य’ हा स्तंभ लिहिला. रोखठोक लिहित. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनाही ठोकत असत. आज सांगितले असते तर बाबूरावांनी संपादक होणे पत्करले असते का?  कारण हल्लीचा मिडिया पार बदलला आहे.  कितीही टिळक-आगरकर होतो म्हटले तरी  ते शक्य नाही.  वृत्तपत्र म्हणा की वाहिन्या, आता मिडियाचे क्षेत्र धंदेवाईक  मंडळींच्या हातात गेले आहे. सारे एकांगी सुरु आहे.   टिळकांची पत्रकारिता केव्हाच संपली. काही मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर बहुसंख्य पत्रकार आता पत्रावळीकार झाले आहेत.   बाबुरावांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ती  ह्या अर्थाने.

           बाबूरावांनी खूप लिहिले. ते वाचलेही गेले.  मात्र  संघाचा शिक्का असल्याने  विचारवंतांच्या क्षेत्रात त्याची  चर्चा झाली नाही. नागपूर ही संघाची राजधानी आहे.  पण नागपूरकरांनी म्हणा किंवा संघवाल्यांनीसुद्धा  बाबुरावांचे म्हणावे तसे कौतुक केले नाही, हे सांगितलेच पाहिजे. त्यांच्या जाण्याने त्यांचे आप्त जेवढे अनाथ झाले तेवढाच त्यांचा आधार वाटणारा  एक मोठा वर्गही  आज निराधार  बनला आहे. आता कोण सेंच्युरीची गोष्ट करणार?  जनरल आवारी, भाई बर्धन, बाबुराव वैद्य  अशी  दबंग माणसे नागपूरने देशाला दिली. वेगवेगळ्या विचारधारेची असूनही सर्वांशी  त्यांचा संवाद असे. ह्यातून नागपूर  खऱ्या अर्थाने सेक्युलर बनले. अलीकडे ही कडी निखळल्यासारखे वाटते. अशी माणसे घडणे बंद झाले आहे.  एक नेता एक बोलला की लगेच प्रतिस्पर्धी त्याच्या अंगावर धावून जातात.  प्रतिस्पर्ध्यालाही वेगळा विचार असू शकतो हे वास्तवच लोक विसरले आहेत. त्यातून भोवताल संशयाचे वातावरण पाहायला मिळते. आजचे सांस्कृतिक नेते गिरीश गांधी सेक्युलर विचाराचे आहेत. पण त्यांच्या   यशवंतराव प्रतिष्ठानने  संघ विचाराच्या बाबुरावांना  आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला.  हा आशेचा किरण म्हटला पाहिजे.

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and
critique, served as a resident editor Lokmat.)

 251 Total Likes and Views

0 Comments

No Comment.