राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलणार आपला जनरल सेक्रेटरी दत्तात्रय होसबळे नवे सरकार्यवाह बनणार

Editorial News
Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीममध्ये मोठा बदल होऊ घातला आहे. संघातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेल्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड होत आहे. ६५ वर्षे वयाचे होसबळे सध्या सहसरकार्यवाह आहेत. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची जागा ते घेतील.

               संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी  सभेची बैठक यावेळी कर्नाटकातील  बेंगळूरू  येथे १९ व २० मार्च  ह्या दिवशी आयोजिली आहे. सभेच्या  बैठकीचे हे निवडणुकीचे वर्ष आहे.  निवडणुकीची बैठक  सर्वसाधारणपणे  नागपुरात होते. पण यावेळी संघाने  बेंगळूरूची  निवड केल्याने राजकीय समीक्षकांच्या  भुवया उंचावल्या आहेत.  दक्षिण भारत टार्गेट करून  हा निर्णय झाल्याचे मानले जात आहे.  होसबळे हे कर्नाटकचे आहेत.  त्यांच्या कर्मभूमीत  त्यांची निवड  करून भावनात्मक  वातावरण निर्मितीचाही हा एक प्रयत्न आहे. 

                  कागदोपत्री ही निवडणूक असली तरी  ह्या जागेसाठी स्पर्धा  नसते.   नाव आधीच ठरलेले असते. देशभरातून येणारे प्रतिनिधी सभेचे १४००  प्रतिनिधी  आपल्या   नेत्याची अविरोध निवड करतात.  बलाढ्य संघ परिवारात   सरकार्यवाह ह्या पदाला   मोठे महत्व आहे.  सरसंघचालक    म्हणतील तो कायदा असला तरी    कार्यकारी अधिकार  सरकार्यवाहाच्या हाती असतात.  सरसंघचालक  याची भूमिका मार्गदर्शकाची  असते तर  सरकार्यवाहाला  निर्णय घ्यावे लागतात.  भय्याजी जोशी मध्य प्रदेशचे. त्यांच्या कार्यकाळात  संघाला  राजकीय वैभवाचे दिवस आले असताना    त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.  त्यामागे त्यांचे वय कारण   सांगितले जात आहे.   २००९ मध्ये के. एस. सुदर्शन यांच्याकडून  त्यांनी  सूत्रे सांभाळली होती. भय्याजी सध्या ७३ वर्षांचे आहेत. संघामध्ये  ७५ व्या वर्षी   नारळ देण्याची प्रथा आहे.  विद्यमान सरसंघचालक सध्या ७० वर्षांचे आहेत.  आणखी पाच वर्षाने म्हणजे २०२५ मध्ये संघाची जन्मशताब्दी येत आहे.  त्या हिशोबानेही होसबळे यांच्याकडे  भावी सरसंघचालक  म्हणून पाहिले जाते.  सरसंघचालकाला  निवृत्तीचे वय  नसते.  ते कितीही वर्षे राहू शकतात आणि केव्हाही सोडू शकतात.  जन्मशताब्दीच्या वर्षात संघाचा चेहरा एकदम बदललेला असेल असे विश्लेषकांना वाटते. 

 185 Total Likes and Views

0 Comments

No Comment.