मोदी केव्हा टोचून घेणार कोरोनाची लस?

Editorial

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन गोष्टीबद्दल  लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी दाढी का वाढवली? केव्हा काढणार मोदी दाढी?  दुसरी गोष्ट म्हणजे लस केव्हा टोचून घेणार? रामदेवबाबांनी  आपणाला लशीची गरज नसल्याचे मागे म्हटले होते.  त्या धर्तीवर मोदीही लशीला नाही म्हणतील असा  मोदीभक्तांचा अंदाज आहे. पण  मोदी धक्कातन्त्रात वस्ताद आहेत. ते काय करतील याचा अंदाज शरद पवारांनाही  लावता आलेला नाही.  त्यांनी दाढी वाढवायला सुरुवात केली तेव्हा   लोक वेगवेगळे बोलू लागले.  कुणी म्हणाले,  मोदींना रवींद्रनाथ टागोर व्हायचे आहे.  कुणी म्हणाले,  मोदींना  जे अपेक्षित होते तेवढा  चमत्कार ते करू शकले नाहीत. त्यामुळे ते बहुधा  हिमालयात जाण्याची मानसिक तयारी करीत असावेत. मोदींच्या दाढीचे गूढ कायम  आहे. पण  दुसरा गुंता मात्र सुटला आहे.

                       कोरोना  विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी  देशात  प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम   सुरु झाली आहे. १६ जानेवारीपासून  लसीकरण सुरु झाले असले तरी  प्राधान्याने  सुरुवातीला  आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जात आहे.    पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी  लस टोचून घेतली नाही म्हणून विरोधी पक्ष  त्यांना टार्गेट करीत आहे. पण मोदी लवकरच दुसऱ्या टप्प्यात  लस टोचून घेतील असे   आज  जाहीर झाले आहे.  मात्र हा दुसरा टप्पा केव्हा सुरु होणार हे सरकारने जाहीर केलेले नाही.  दुसऱ्या टप्प्यात ५० हून अधिक वय असलेल्या मंत्री, खासदार, आमदार असलेल्यांना लसीकरणाचे  नियोजन आहे.                 

कोरोनावरच्या लशीचा  सारा देश वाट पाहत होता. पण   आलेल्या लशींच्या परिणामकारकतेबद्दल  साशंकता पसरल्याने  लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही.  आतापर्यंत  फक्त सात लाख ८६ हजार  व्यक्तींना लस  टोचून झाली आहे.  हाच वेग राहिला तर    १३५ कोटी  लोकसंख्या टोचायला  किती वर्षे लागतील हा प्रश्नच आहे. पहिल्या दिवशी लस घेणाऱ्या काही कोव्हिड योद्ध्यांना  ताप व अंगदुखीचा  त्रास सुरु झाला.    नन्तर सारे  सुरळीत झाले.   काहींनी लस घेताच आराम न करता  कामाला सुरुवात केली.   अफवांचे मात्र  पेव फुटले.  प्रत्यक्ष लस घेणारे मात्र आपल्याला कुठलाही त्रास नसल्याचे सांगत आहेत.  पहिल्याच दिवशी लस टोचून घेणारा एक डॉक्टर म्हणाला,   त्या दिवशी थोडा ताप आला. हात दुखायला लागला. पण कोणतीही लस घेतली तर हा त्रास होतोच.  त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. राज्य सरकारनेही बिनधास्त लस  टोचून घेण्याचे आवाहन  केले आहे.

0 Comments

No Comment.