नागपूरजवळच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर करताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. आदिवासी संघटना आणि विदर्भवादी नेत्यांनी ह्या नामकरणाला कडाडून विरोध केला आहे. त्या ऐवजी ‘गोंडवाना प्राणी उद्यान’ असे नाव द्या अशी विरोधकांची मागणी आहे. अर्थात त्यामुळे सरकार झुकेल अशी परिस्थिती नाही. बाळासाहेबांचे पुत्र दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारीला ह्या प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटनही योजिले आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा बाळासाहेबांच्या नावाचा आहे. बाळासाहेब एक पक्षाचे जनक असले तरी सर्वांना आदरणीय होते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबईमध्ये बाळासाहेबांचा भव्य पुतळा उभा होत आहे. त्याच्या अनावरणाला शरद पवारांपासून देवेंद्र फडणवीस इथपर्यंत सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला कधीही कुणाचाही विरोध नसतो आणि विरोध असण्याचे कारण नाही. समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. त्याला बाळासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोणीही विरोध केला नाही. पण एका सध्या प्राणीसंग्रहालयाला नाव देताच विरोधाचे आवाज उमटत आहेत. विरोध करणारी मंडळी विरोधासाठी विरोध करणारी नाहीत. त्यामुळे त्यांच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत.
गोरेवाडा प्राणीसंग्रहालय हा भाग गोंडवानाचाच एक भाग आहे. तेथील गोंड समाज आणि आदिवासी समाजाची तशी मागणी आहे. त्यामुळे गोंडवाना नाव देण्याचे मागेच ठरले होते असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. तिथले लोक विरोध करीत आहेत त्यात त्यांच्या भावना आहेत. निर्णय सरकारला करायचा आहे. वाद निर्माण होईल तिथे बाळासाहेबांचे नाव वापरणे योग्य आहे का? बाळासाहेबांना वादग्रस्त का बनवता? प्रभू रामचंद्र कोण्या एका समाजाचे नव्हते. पण आज राम कमालीचा वादग्रस्त केला गेला. राजकारण्यांचे हे धंदे उद्धवजींनी ओळखले पाहिजेत. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हिमालयाच्या उंचीचे होते. बाळासाहेब मोठेच होते. एका प्राणीसंग्रहालयाला त्यांचे नाव दिल्याने ते आणखी मोठे होतील अशातला भाग नाही. गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झाला होता असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग नामांतराचे प्रयोजन काय? मग अचानक इथे बाळासाहेबांचे नाव कुठून आले? वनमंत्री संजय राठोड यवतमाळचे आहेत. त्यांचे हे काम आहे का? काहीही असो. पण कटुता टाळली पाहिजे. मी तर म्हणतो सरकारने एकदा निर्णय करावा. किती जागांना आणि किती ठिकाणी आपण बाळासाहेबांचे नाव देणार आहोत? स्वतः उद्धव यांनीच हे थांबवले पाहिजे. देवेंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पांना उद्धव सरकारने ब्रेक लावला. पण समृद्धी महामार्गाला मात्र हात लावला नाही. ज्यांना बाळासाहेबांचे नाव मिळाले त्यांचे सोने होते. समृद्धी महामार्ग मार्गी लागला. गोरेवाडा प्रकल्पही लहानसहान नाही. काही हजार कोटी रुपयांचा आहे. बाळासाहेबांचे नाव मिळाल्याने प्रकल्पाचे भाग्य फळफळत असेल तर इतर अनेक प्रकल्पासाठी तशा मागण्या पुढे येऊ शकतात. विदर्भात अनेक प्रकल्प वर्षोनवर्षे रखडले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प ३० वर्षापासून रखडला आहे. पण म्हणून ‘इंदिरासागर’ला बाळासाहेबांचे नाव द्यायचे का? औरंगाबाद्च्या नामांतरावरून सध्या जोरदार राजकारण तापले आहे. उस्मानाबाद वगैरे शहरांचीही नावे बदलण्याची मागणी पुढे आली आहे. अस्मितेच्या ह्या राजकारणाने कुठेतरी आत्मचिंतन करायची वेळ आली आहे. शेवटी ‘नावात काय आहे?’ नावात काही नाही. आहे ते कामात आहे. कामं करून महाराष्ट्राला चांगले दिवस आणायचे आहेत. त्या कामी आपण सारे भिडू या.
Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)