काहीही करा, खपवून घेतले जाते

Editorial News

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे  नेते धनंजय मुंडे  यांच्याविरोधातील तक्रार    त्या महिलेने मागे घेतली आहे.    बॉलीवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून मुंडे यांनी  आपले लैंगिक शोषण  केल्याचा गंभीर आरोप  ह्या महिलेने केला होता. पोलिसांकडे   बलात्काराची लेखी तक्रारही तिने केली. मुंडे यांचे आपल्या मोठ्या बहिणीशी संबंध असल्याचेही तिने म्हंटले होते.  तिच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात  खळबळ उडाली होती. कारणही तसेच होते. शून्यातून  निर्माण झालेले हे आक्रमक नेतृत्व आहे.   राजकारणात घोटाळ्याचे आरोप मंत्र्यांवर होतात.  पण बलात्काराचा आरोप म्हणजे भयंकर.  तो झाला तेव्हा  विरोधकांनी   मुंडेंचा राजीनामा मागितला. पण  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार मुंडेंच्या पाठीशी उभे राहिले.  मुंडे बचावले.  आता तर त्या महिलेनेच घुमजाव केला. म्हणजे ‘ना रहा बास, न बजेगी बासरी.’  माझ्या तक्रारीचा   राजकीय हिशेब  चुकता करण्यासाठी वापर  केला जात असल्याचे   लक्षात आल्याने  आपण  तक्रार  मागे घेत असल्याचे तिने म्हटले आहे. तिने तसे लिहून देताच मुंबई पोलिसांनी तपास बंद  केला. मुंडे, ती महिला आणि  राष्ट्रवादीच्या लेखी  मामला संपला. पण खरेच इतक्या झटपट  मोकळे होता येते? सामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न आहे.

              फिर्यादीने  खोटी तक्रार दिली तर   कायद्यात  फिर्यादीवर कारवाईची तरतूद आहे. पण पोलीस त्या भानगडीत पडायला तयार नाहीत.   गृह खाते राष्ट्रवादीने  स्वतः कडे का मागून घेतले   ते एव्हाना लक्षात आले असेल. पण त्या महिलेने तक्रार का मागे घेतली हे कोडे आहे. आपल्या तक्रारीचे राजकारण होईल हे  न समजण्याइतकी ती महिला खुळी  नसावी. ‘स्त्रीचे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य  देवालाही  जिथे ठाऊक नसते. तिथे  माणसाची काय कथा?’ असे म्हटले जाते,  तेच खरे.    धनंजय मुंडे यांना मात्र मानले पाहिजे. त्या महिलेच्या मोठ्या बहिणीशी   विवाहबाह्य संबंधाची कबुली देण्याचे धाडस त्यांनी दाखवले. भाजपही  एका विशिष्ट मर्यादेत त्यांच्या मदतीला धावून गेला.  भाजप आणि मनसेचा नेता  धावून गेला नसता तर मुंडेंचा गेम  अटळ  होता.  अलीकडे राजकारणाचा दर्जा    कमालीचा ढासळत चालला आहे. कोण कोणाला कसा कापेल याचा भरवसा  राहिलेला नाही. असे असले तरी  नेत्याचे चारित्र्य वादातीत आणि पारदर्शक असावे  अशीच समाजाची अपेक्षा असते. एक काळ असा होता, की आरोप होताच  मंत्री, मुख्यमंत्रीही राजीनामा फेकून मोकळे व्हायचे.  रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.   खासगी प्रतिष्ठान स्थापणे  अंतुले यांच्या अंगावर शेकले व त्यांना राजीनामा द्यावा लागला. ‘चौकशी होऊन जाऊ द्या. मग पाहू’ असे त्यावेळी कुणी  नेता म्हणाला नाही.  समाजाचा तो धाक होता.  आता हायकमांडच आपल्या मंत्र्यांना सांभाळताना दिसत आहे.

               त्यामुळे काहीही करा, काही होत नाही.  सारे खपवून घेतले जाते असा समज   पसरला आहे.  या आधीच्या युतीच्या राजवटीत    जवळपास  अर्धा डझन मंत्र्यांना  क्लीन  चीट   देवेंद्र फडणवीस यांना वाटावी लागली. एक चीट  त्यांनी रोखून ठेवली. त्यामुळे उशिराने का होईना    खडसे यांच्यासारखा मोहरा भाजपला गमवावा लागला. पण राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना अलीकडे  झाले आहे तरी काय? असा प्रश्न ‘जाणत्या महाराष्ट्रा’ला पडणे  स्वाभाविक आहे.  तुरुंगातून आलेल्या  छगन भुजबळ यांना त्यांनी मंत्री केले.  मुंडे यांनाच नव्हे तर  दुसरे एक मंत्री नवाब मलिक यांनाही पाठीशी घातले.  पवार कुठेही असले तरी राज्यात कोण काय करतो याची बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोचत असते.   आपले मंत्री नवाब मलिक यांचा जावई काय करतो  हे त्यांना  ठाऊक नसावे, ह्यावर लोक विश्वास ठेवायला तयार  नाहीत. तरीही मलिक बचावले.  चुकीच्या माणसांना तर पवार संरक्षण  देत नाहीत ना? आरोपांचा निकाल लावण्याची जागा कोर्ट आहे. कोणताही पक्ष निकाल करू शकत नाही. पण हल्ली नीतीमत्तेचे राजकारण कोणाला हवे आहे?

0 Comments

No Comment.