कॉन्ग्रेसने प्रथमच दणकट माणूस दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पंगा घेण्याची हिंमत ठेवणारे ओबीसी नेते ५७ वर्षे वयाचे नाना फाल्गुनराव पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष बनवले आहे. शुक्रवारी त्यांचे नाव जाहीर झाले तेव्हा ऊर्जावान अध्यक्ष मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अशोक चव्हाण यांच्यानंतर गेली दोनतीन वर्षे प्रदेशाध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्रातले बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. थोरात म्हणजे ढकलगाडी. महाआघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपद मिळाल्याने बाळासाहेबांना प्रदेशाध्यक्षपदाचे ओझे होऊ लागले. त्यांची कुरकुर वाढल्याने कॉन्ग्रेसने नव्या अध्यक्षाचा शोध सुरु केला. थोरात गटाने विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना चालवू पाहिले. मात्र अखेरीस विदर्भाला लॉटरी लागली.
विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेची किल्ली ह्या ६२ जागांनी उघडते. विदर्भात जास्तीत जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता मिळवणे सोपे जाते. एकेकाळी विदर्भ हा कॉन्ग्रेसचा गड होता. त्यामुळे कॉन्ग्रेसच राज्य करीत आली. १९९० नन्तर कॉन्ग्रेसला विदर्भात वाईट दिवस सुरु झाले. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. त्याच जोरावर भाजप-शिवसेना युती सत्तेत आली. पण पुढे भाजपने विदर्भाला गृहीत धरणे सुरु केले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत १५ जागांचा फटका बसला. कॉन्ग्रेसला तर अवघ्या १५ जागांवर समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्रात सत्ता मिळवायची तर विदर्भ जिंकणे जरुरी आहे हे उशिराने का होईना कॉन्ग्रेसच्या लक्षात आले असावे. राहुल गांधींनी त्याच रणनीतीतून नाना पटोले यांना आणले आहे. त्यांचे टार्गेट नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहे. ओबीसी स्वाभिमान आणि मराठा कार्ड ह्या दोन मुद्यांवर पुढचे राजकारण चालणार आहे. पटोले हे कुणबी आहेत. इकडचे कुणबी तिकडे मराठा म्हणवून घेतात. तेली समाज भाजपचा हुकमी मतदार मानला जातो. मात्र आता ओबीसी कार्ड चालवून भाजपची कोंडी करायचा हा गेम आहे. महाआघाडीतले तिन्ही पक्ष समान कार्यक्रमाच्या गप्पा करीत असले तरी एकमेकांना संपवण्याचाच त्यांचा एकसूत्री कार्यक्रम आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची वागणूक कॉन्ग्रेसला खाऊ की गिळू अशा वृत्तीची आहे. पवारांनी शिवसेनेला हाताशी धरल्याने सरकारमध्ये कॉन्ग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे. पण पवारांशी पंगा घेणार कोण? थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यात ती धमक नाही. या गरजेतूनच पटोले यांना आखाड्यात उतरवण्यात आले आहे.
पटोले त्या बाबतीत फिट आहेत. कुणालाही भिडण्याचा, शिंगावर घेण्याचा पटोले यांचा स्वभाव आहे. जन्मजात बंडखोर आहेत. साधे निमित्तही त्यासाठी त्यांना पुरते. कॉन्ग्रेसमधून भाजप आणि पुन्हा घरवापसी असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे. कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर कधी थेट मोदींशी पंगा. स्वतःला सतत चर्चेत ठेवण्याचे कसब त्यांना छान जमते. कॉन्ग्रेस म्हटले की गटबाजी आलीच. पण नाना कुठल्याही गटाचे नाहीत. नाना अतिमहत्वाकांक्षी आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. होऊन दाखवले. राजकारणातील अवघ्या ३० वर्षातली ही कमाई आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली हा त्यांचा मतदारसंघ. ‘लंबे रेस का घोडा है.’ राहुल गांधींना आपण ‘पप्पू’ म्हणतो. पण त्यांनी नानांना बरोब्बर हेरले. सुरुवातीला किसान सेलचा अध्यक्ष केले. मग गुजरातला घेऊन गेले. पुढे नागपुरात हेविवेट नितीन गडकरींशी पंजा लढायला पाठवले. गडकरींशी लढायचे म्हटले तर भल्या भल्यांची चड्डी ओली होते. पण नाना बिनधास्त भिडले. हरले. पण गडकरींचा विजयी लीड घटवून दाखवला. आता ते कॉन्ग्रेसला अव्वल पार्टी बनवतो म्हणतात. पण हे कसे शक्य आहे?
नाना यांच्या मदतीला सहा कार्याध्यक्ष, दहा उपाध्यक्ष आणि ३७ जणांचे संसदीय मंडळ अशा मोठा फौजफाटा जाहीर झाला आहे. ज्यांनी कॉन्ग्रेसची फजिती केली त्यांचाच मोठा भरणा नव्या टीममध्ये आहे. वय झालेले, हरलेले नेते काय ताकद देणार? दोघातिघांचे नाव तर कुणीही ऐकलेले नाही. कधीतरी मोदींना कंटाळून लोक आपल्याला मते देतील असे कॉन्ग्रेसवाल्यांना वाटते. ते तरी काय करतील बिचारे. एकेकाळी कॉन्ग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना महत्व होते. कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन होते. आज ते संपले आहे. उरले आहे ते दरबारी राजकारण आणि तेच तेच चेहरे. अशी टीम नानांना काय मदत करणार? कार्यकारी अध्यक्षांमध्ये विदर्भातून यवतमाळचे शिवाजीराव मोघे ह्या माजी मंत्र्याला घेण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत ते हरले होते. वयही झाले आहे. अनुसूचित जमातीचा एक नेता पाहिजे म्हणून त्यांना संधी देण्यात आली. पण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. ह्या दोघांच्या गटबाजीत यवतमाळ जिल्ह्यात पक्षाचे केव्हाच पानदान वाजले आहे. अशी गटबाजी प्रत्येक जिल्ह्यात आहे. पटोले ह्या गटातटाशी कसे जुळवून घेणार? सोलापूरच्या प्रणिती शिंदे आपल्या वडिलांना निवडून आणू शकल्या नाहीत. मोहन जोशी पुण्यात अतिशय वाईट पद्धतीने हरले. हे लोक पक्षाला काय मदत करणार? एक लक्षात घ्या. कॉन्ग्रेसला कुणी हरवू शकत नाही. कॉन्ग्रेसवालेच कॉन्ग्रेसला हरवतात. हायकमांडचे कौतुक वाटते. त्यांना भंगारात निघालेलेच नेते का दिसतात? नवे चेहरे का दिसत नाहीत. दीड वर्षापासून कॉन्ग्रेसला फुल टाईम अध्यक्ष नाही. कोर्टासारख्या ‘तारीख पे तारीख’ देऊन कॉन्ग्रेस आपले मरण पुढे ढकलतो आहे. अख्खा संघ जखमी झाला तेव्हा आपल्या क्रिकेटने ‘अजिंक्य रहाणे’ शोधला. कॉन्ग्रेसने कुणी ‘रहाणे’ का शोधू नये? हे जमत नाही तो पर्यंत एकटा नाना किती जोर मारणार?
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
147 Total Likes and Views