पटोले कोणाचे खाते खाणार?

Politics

कॉन्ग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी  मंत्रीपदही मागितल्याने  हायकमांड  धर्मसंकटात  सापडली आहे.  पटोले  यांना  मंत्रीपदाची जास्तीची ताकद द्यायची  म्हटले तर  एखाद्या विद्यमान मंत्र्याला घरी पाठवावे लागते.  कॉन्ग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांमध्ये  मोठे फेरबदल  होऊ घातले असल्याने   पक्षात नवाच कलह  सुरु झाला आहे. नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते चालले अशी  चर्चा जोरात सुरु झाली आहे.

    ‘मला ऊर्जा खाते मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे पटोले यांनी  नागपुरात पत्रकारांना  सांगितले खरे.  पण  आतली माहिती काही वेगळी आहे.   पटोले यांनी नुकतीच दिल्लीत   सोनिया गांधी यांची भेट घेतली.  त्यावेळी त्यांनी केवळ हवापाण्याच्या गप्पा मारल्या यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही.  पटोले दिल्लीत निघाल्याची कुणकुण लागल्याने  नितीन राऊतही  त्याच वेळी  जाऊन धडकले.  या दोघांच्या बैठकीत  काय  ठरले ते सावकाश बाहेर येईल.  पण आजतरी  सारे तणावात आले आहेत.   लोकशाहीच्या कितीही गप्पा मारल्या तरी पक्ष चालवायचा म्हणजे पैसा लागतो. पूर्वीसारखा  समर्पित कार्यकर्त्यांचा काळ संपला. आता  सभा, फिरणे म्हटले तर  नगदी पैसा लागतो.  हा पैसा कुठून आणणार?    ह्या खर्चाने  एकेकाळी  प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण  पार वैतागले होते. कुठल्याही जिल्ह्यात गेले तर  खर्च मागणारे उभे असतात. प्रदेशाध्यक्षाला  पक्षाकडून निधी मिळतो. पण तो चणेफुटाण्याचा.  त्यामुळे प्रदेशाध्यक्ष ‘दिलदार, मालदार’ असावा अशीच कार्यकर्त्यांची इच्छा असते.  पटोलेसारख्या ‘साधूपुरुषाला’   प्रदेशाध्यक्ष बनवले कोणी असा सवाल  आता कार्यकर्तेच करू लागले आहेत.  पटोले यांनी मंत्रीपद मागितल्याची माहिती खरी असेल तर  मंत्री हा सेवेसाठी  असतो की पैसे जमा करण्यासाठी? असा  प्रश्न निर्माण होतो.  सैन्य पोटावर चालते’ हे ठाऊक असल्याने  हायकमांडही मधला मार्ग    शोधण्याच्या मागे  लागली आहे.

             पण तुम्ही लिहून ठेवा.  नितीन राऊत  यांना हायकमांड हात लावणार नाही.  मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी  राऊत  सोनियांना भेटले होते.  त्यात त्यांचे खाते वाचवण्याचा विषय असण्याचे कारण नाही.  करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर  वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रस्ताव   राऊत यांनी आणला होता.  तसे झाले तर कॉन्ग्रेसला श्रेय मिळेल म्हणून राष्ट्रवादीने तो कापला.  राऊत यांना वादग्रस्त बनवण्यात आले म्हणून  दलित समाजात   संतप्त भावना आहे.  पक्षाच्या एससी सेलचे राऊत हे अध्यक्ष आहेत. मिडीयाने  वेगळे पतंग उडवायला सुरुवात केली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. काय होते  याची उत्सुकता आता  ताणली गेली आहे.

                पटोले यांच्या राजीनाम्यामुळे  विधानसभेचे अध्यक्षपद रिकामे झाले आहे. हे पद  कॉन्ग्रेसच्या कोट्यात आहे. त्यामुळे  इथे कॉन्ग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रातील भोर मतदारसंघाचे आमदार   संग्राम थोपटे  यांना अध्यक्ष बनवले जाईल.  मंत्रिपद मिळाले नाही म्हणून  त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कॉन्ग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती हे आठवत असेल.  त्यामुळे कॉन्ग्रेसला यावेळी  थोपटे यांना लक्षात ठेवावे लागणार आहे. पण ‘अध्यक्षपद खुले झाले’ ह्या शरद पवार यांच्या वक्तव्याने खळबळ आहे.  विधानसभा  अध्यक्ष बदलवण्यापासून  रस्सीखेच होणार असेल तर  महाविकास आघाडीत मोठी पडझड होऊ शकते.

0 Comments

No Comment.