महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारने विमान नाकारल्याने राजकारणाला उकळ्या फुटत आहेत. कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष लपलेला नाही. ह्या सरकारने शपथ घेतल्याच्या दिवसापासून खडाखडी सुरु आहे. नळावर बायका भांडतात तसे भांडताहेत. राज्यपालांना विमानातून उतरवून देण्याचा प्रकार अनपेक्षित नाही. दोघेही टिकले तर भविष्यात ह्या पेक्षा भयंकर घडू शकते. व्हराडी भाषेत सांगायचे तर आता धोतर सोडणेच तेवढे बाकी ठेवले. बाकी त्यांचा करायचा तो सर्व अपमान करून झाला आहे. महाराष्ट्राचे हे दुर्दैवच म्हटले पाहिजे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री ह्या उच्चस्थांनी राज्यातील दोन सर्वोच्च पदांची गरिमा गुंडाळून ठेवली आहे. आपली ही संस्कृती नाही. एवढे अवमूल्यन कधीही पाहिले नव्हते. ज्या महाराष्ट्राने पी.सी. अलेक्झांडर, एअर चीफ मार्शल आय. एच. लतीफ ह्या सारखे राज्यपाल पाहिले तिथे असला कोतेपणा पाहायला मिळतो आहे.
मुख्यमंत्री ठाकरे हे राजकारणी आहेत. त्यांनी राजकारण केले तर ते एकवेळ समजू शकते. पण कोश्यारी यांनी भाजपच्या नेत्यासारखे वागावे हे अनाकलनीय आहे. कॉन्ग्रेसच्या राजवटीत कॉन्ग्रेस विचाराच्या नेत्यांना राज्यपालपद मिळत असे. पण कुणाचा एवढा तोल जात नसे. राज्यपालपद वेगळे आहे. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो. त्याने सरकारचा अजेंडा चालवायचा असतो. कोश्यारी यांची नेमकी इथे गडबड होत आहे का? कोश्यारी यांचे वय ७८ वर्षे आहे. म्हणजे पितृतुल्य माणूस आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पक्के संघवाले आहेत. तेल लावलेला पैलवान आहे. ‘काळी टोपी’ काढून ठेवायला तयार नाही. इतिहासात प्रथमच त्यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला शपथ दिली. ते सरकार ८० तासात गेले. आता महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेवर पाठवायच्या १२ आमदारांची यादी कोश्यारी यांनी अडवून ठेवली. भलेही ही यादी नियमात बसत नसेल. पण सरकारकडून आली तर ती पुढे सरकवायला हवी होती. आतापर्यंत हेच चालत आले आहे. सारेच नियमाप्रमाणे चालवायचे तर रामराज्य येईल. ते कोणाला हवे आहे?
विमान नाकारल्याच्या प्रकरणात दोघेही एकमेकांवर दोष ढकलत आहेत. राज्यपाल असले तरी त्यांना सरकारी विमान हवे असेल तर मुख्यमंत्र्याकडे लेखी परवानगी मागावी लागते. कोश्यारी यांच्या कार्यालयाने तसा अर्ज केलाही होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे ते विमानात बसले. काही वेळाने त्यांना परवानगी नाही असे सांगण्यात आले. निघण्याआधी विमान मिळते का? हे कोश्यारी यांच्या कार्यालयाने कन्फर्म करून घ्यायला हवे होते असे सरकारचे म्हणणे आहे. आम्हाला कुठलाही निरोप आला नाही असे राज्यपालांचे कार्यालय म्हणते. याचा अर्थ दोघांमध्ये कुठलाही संवाद नाही. बोलचाल नाही. दोघांकडे मोबाईल आहेत. साधे बोलले असते तर उद्धव झुकले असते. उद्धव यांनीही मोबाईल केला असता तर राज्यपालांची फजिती टाळली असती. पण इथे कोश्यारी आपण भाजप नेते आहोत हे विसरायला तयर नाहीत आणि उद्धव यांना अजूनही आपण मुख्यमंत्री झालो ह्या गोष्टीवर विश्वास नाही. शिवसेनाप्रमुखासारखे वागत आहेत. संवाद नसेल तर हे कुठेही घडू शकते. १९ वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात असेच घडले होते. तेव्हा मुख्यमंत्री होते दिग्विजय सिंह आणि राज्यपाल होते भाई महावीर. दिग्गीराजा राज्यपालांना खूप झुलवायचे. एकदा दिग्गीराजांनी सरकारी विमान दिले नाही म्हणून भाई महावीरांना माधवराव शिंदे यांच्या अंत्ययात्रेला जाता आले नाही. ह्या घटनेने महावीर प्रचंड वैतागले. यापुढे आपण सरकारी विमान वापरणार नाही असे जाहीर करून ते मोकळे झाले. कोश्यारी हे ‘महावीर’ नाहीत. त्यामुळे पुढे काय काय फ्री स्टाईल पाहायला मिळते ते पाहायचे. पण एक सांगतो. जे सुरु आहे ते महाराष्ट्राला भूषणावह नाही.