का पळत आहेत मंत्री संजय राठोड?

Analysis

 परळीची तरुणी पूजा राठोड हिच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस  वाढत आहे. या प्रकरणी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड   यांच्याकडे   भाजपने बोट  दाखवले आहे. पण  राठोड  बेपत्ता आहेत. १० दिवसांपासून  ते गप्प का? हा  प्रश्नच आहे.  ते लपले, की लपवले जात आहेत की चौकशी पूर्ण होईपर्यंत शिवसेनेकडूनच त्यांना लपायला सांगण्यात आले आहे?  खूप सारे प्रश्न आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही  ते नव्हते. उद्या बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या  पोहरादेवी  मंदिरात  राठोड  येणार असल्याचे  जाहीर झाले होते. पण तिथेही ते गेले नाहीत.  सरकारचा एक जबाबदार मंत्री तब्बल १० दिवस  कसा गायब राहू शकतो?  वनखाते कसे  चालायचे? राठोडही  बोलायला तयार नाहीत. त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही  गप्प आहेत.  पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल, पुजाला न्याय मिळेल  असे मुख्यमंत्री म्हणतात. पण हे सत्य जाणण्यासाठी  महाराष्ट्राला आणखी किती ताटकळत  राहावे लागणार आहे?

                  राठोड कुठे आहेत? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे गृहमंत्री   अनिल देशमुख म्हणतात. पण  वादग्रस्त प्रकरणातला संशयित इतके दिवस  नॉट रिचेबल राहतो हा त्याचा खासगी  मामला  कसा  असू शकतो? त्यांना राजीनामा द्यायला सांगावे का? शिवसेनेत दोन  तट पडले आहेत.   शिवसेनेची प्रतिमा वाचवण्यासाठी लगेच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असे  शिवसेनेतल्या एका गटाला वाटते.  पण दुसरा गट अधिक आक्रमक आहे.  राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचा कुठे राजीनामा  घेतला होता? असा सवाल ह्या दुसऱ्या गटाकडून  केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना कठोर व्हावे लागेल.   सरकारने अशीच बघ्याची भूमिका चालू ठेवली तर  लोक उद्या  सरकारकडेही संशयाने बघू लागतील.  ‘माझे सरकार पारदर्शक आहे’ असे उद्धव म्हणतात. तर मग आपला एक मंत्री का गायब आहे  हे ते का सांगत नाहीत? अशाच इतर प्रकरणात  पोलीस असेच वागतात का? संशयाचे धुके अधिकच गडद होत चालले आहे. भविष्यात राठोड निर्दोष  सिद्ध होतीलही. पण  आज ते लोकांपुढे येऊन  वास्तव का सांगत नाहीत?  त्यांच्या बंजारा समाजाचे  लोकही बुचकळ्यात पडले असतील. आपला नेता का लपला?   भाजपला मात्र  पक्की खात्री आहे. हे प्रकरण दाबले जात आहे.   देवेंद्र फडणवीस यांनी तसा  थेट  आरोप केला आहे.

                         संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत.   यवतमाळच्या  रुग्णालयात  ६ फेब्रुवारीला  पूजा अरुण  राठोड नावाच्या एका तरुणीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे.  नांदेडचा पत्ता आहे. ही पूजा कोण?  ही  पूजा गर्भपातासाठी  यवतमाळमध्ये  का आली?  ह्या केसविषयी  कुणीही डॉक्टर बोलायला तयार  नाही.   काय भानगड आहे?  लोकांच्या मनातले हे प्रश्न घेऊन    जस्टीस लीगने   एक खासगी तक्रार केली आहे.  या मामल्यात  पोलिसांनी अजूनही  गुन्हा का दाखल केला नाही   असा वकिलांच्या ह्या संघटनेचा सवाल आहे. पूजा राठोडचे काय झालं?  उत्तराची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

0 Comments

No Comment.