करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्याला पुन्हा लॉकडाऊनकडे जावे लागेल अशी लक्षणे दिसत आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघांनी आज एकसुरात दिला. अजितदादा उद्या म्हणजे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संबंधात भेटणार आहेत. काही नवा निर्णय झाला तरी तो फार कडक नसेल. कारण एकदा ‘अनलॉक’ झाल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन कडे परतणे अवघड आहे. सरकारलाही याची जाणीव आहे. त्यामुळे आहेत त्या नियमांचीच कडक अंमलबजावणी केली जाईल असा रंग दिसतो. शिवजयंतीवर निर्बंध घातलेले आहेतच. आता राजकीय कार्यक्रमांवर बंदी येऊ शकते.
करोना संसर्गाच्या धोक्यामुळे तब्बल ६ महिने राज्यात लॉकडाऊन होते. अलीकडे करोनाचे प्रमाण कमी झाल्याने हळू हळू सरकारने ‘अनलॉक’ होणे सुरु केले. बहुतेक व्यवहार खुले झाल्याने करोना संपला या समजुतीत लोक बिनधास्त घराबाहेर निघाले होते. अनेकांच्या तोंडावर मास्कही दिसत नाहीत. सुरक्षित अंतर पाळणे तर दूर राहिले. त्या सर्वांचा परिणाम म्हणून ह्या महामारीने तोंड वर काढले आहे. मुंबईत लोकल सुरु झाल्यानेही करोना वाढला असावा. लसीकरण सुरु होऊनही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि खास करून विदर्भात करोनाचा संसर्ग वाढला आहे. रविवारी नागपुरात करोनाचे साडेचारशे रुग्ण पॉझिटीव्ह निघाले. खबरदारी म्हणून करोनाच्या हॉट स्पॉट भागात मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
आपल्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असले तरी ३६ हजार रुग्ण आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोनाने राज्यात आतापर्यंत ५१ हजार लोकांचा बळी घेतला आहे. तरीही करोनाची भूक शमलेली नाही. आपल्याला नेहमीसाठी करोनासोबत जगायचे हे वास्तव प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.