आयपीएलला पैशाची कडकी नाही

Editorial News

क्रिकेटच्या नावानं काही लोक  शिव्या घालत असली तरी तुम्ही लिहून ठेवा. क्रिकेट कधीच बंद होणार नाही.  आणि समजा उद्या क्रिकेट बंद झाले तरी इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे  आयपीएल बंद होणार नाही.  कारण  क्रिकेटमध्ये पैसा आहे, ग्लामर आहे. करोनामुळे  सारे जग कोसळू पाहत असताना   आयपीएलला पैशाचा प्रॉब्लेम येणार  असे तुम्हाला वाटत असेल तर  तसे काही झालेले नाही. यंदा आयपीएल बहुधा मुंबईत खेळले जाईल. तारखा ठरायच्या आहेत.  टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी खेळाडूंचा लिलाव मोठ्या जोशात पार पडला. द. आफ्रिकेचा  ऑलराउंडर  ख्रिस मॉरिस   याला राजस्थान रॉयल्स संघाने  साडे सोळा कोटी रुपयात   खरेदी केले. बंगलोरच्या रॉयल चालेन्जर्सने विराट कोहलीसाठी सर्वाधिक म्हणजे १७ कोटी रुपये मोजले गेले. राष्ट्रीय संघातूनही न खेळलेल्या अनेकांना  लॉटरी लागली.  कोटीच्या कोटी उड्डाणे आहेत.

                      अनेकांना प्रश्न पडत असेल. एवढा पैसा येतो कुठून?  संघाचे मालक पैसे कसे कमावतात आणि किती कमावतात? संघाचे मालक आपल्या खेळाडूंना  कोटी कोटी  देत असतील तर मालकाची कमाई किती असेल? टीव्हीचे हक्क आणि टायटल स्पॉन्सरशिप या दोन गोष्टीतून  आयपीएलमध्ये पैसा येतो.   ६० टक्के पैसा क्रिकेट नियामक मंडळाला तर उरलेला   मालकांना मिळतो. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, जाहिराती मिळून प्रत्येक संघाच्या  मालकाला सारा खर्च    १५० कोटी रुपयाच्या  आसपास येतो.  टीव्ही हक्क आणि कंपन्यांचे ब्रांड   स्पॉन्सर  करून  संघाचे मालक  पैसे वसूल करतात.  यंदा पब्लिक नसल्याने तिकिटाचे पैसे  मिळणार नाहीत.   पण कितीही कात्री लागली तरी   प्रत्येक संघ मालकाचे २०० कोटी रुपये कुठे गेले नाहीत.   म्हणजे १५० कोटी रुपये लावा आणि २०० कमवा, तेही अवघ्या  दीड दोन महिन्यात. कुठल्या धंद्यात एवढा नफा आहे? पण एवढा थरार  दुसऱ्या कुठल्या खेळत आहे? कोहलीचा छक्का  पाहताना किंवा चौकार अडवताना क्षेत्ररक्षकाचा  आकांत पाहताना   माणसे  सारे टेन्शन विसरून जातात. क्रिकेटची ही ब्युटी आहे.  त्यामुळे  क्रिकेटला मरण नाही.

0 Comments

No Comment.