तब्बल १३ दिवसापासून ‘नॉट रिचेबल’ असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड येत्या मंगळवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रगट होत आहेत. पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राठोड गायब असल्याने भाजपने त्यांना टार्गेट केले आहे. गेल्या आठवड्यात ते पोहरादेवी मंदिरात येणार असल्याचे जाहीर झाले होते. पण राठोड आले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स वाढले होते. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. पण आता सहकुटुंब येत असल्याचा त्यांचा निरोप आल्याचे तिथल्या महंतांनी सांगितल्याने राठोड काय बोलणार याची चर्चा सुरु झाली आहे.
पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे धर्मपीठ आहे. समाजाची ती काशी मानली जाते. राठोड हे बंजारा समाजाचे आहेत. पूजाही याच समाजाची होती. धर्मगुरुंपुढे राठोड शरण जाणार की पूजाच्या आत्महत्येत आपला काहीही संबंध नाही अशी भूमिका मांडणार त्याकडे समाजाचे लक्ष आहे. धर्मगुरूंनी आशीर्वाद म्हणजे क्लीन चीट दिली तर सरकारच कोंडीत सापडू शकते. संतांचा पाठिंबा दिसला तर पोलिसांवरही दबाव येऊ शकतो. कारण मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे त्यांनी म्हटले होते. आता आपल्या नेत्याकडे न जाता किंवा पोलिसांनाही न भेटता राठोड थेट धर्मगुरूंना गाठत आहेत. राठोड यांच्या ह्या रणनीतीने भाजप नेतेही चक्रावले आहेत. राठोड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलीस चौकशीचा अहवाल हाती आल्याशिवाय मुख्यमंत्री काही बोलणार नाहीत. पण ‘राठोड यांचाही मुंडे होणार’ असे शिवसेना आमदारांमध्ये बोलले जात आहे. ‘राठोड गायब नाहीत. संपर्कात आहेत’ असे सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून टाकली आहे. राठोड हे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेनेनेच हिंगोलीमध्ये मोर्चा काढून पक्ष राठोड यांच्या पाठीशी असल्याचे सूचित केले. त्यामुळे मंगळवारी राठोड यांचा निकाल लागून प्रकरण मिटेल असे समाजात मानले जात आहे.