हमाम मे सब नंगे

Analysis Editorial News

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय अधिकारी, स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत.  महाराष्ट्र पोलिसांमध्ये जे ५-२५ निष्ठावान अधिकारी आहेत त्यामध्ये नगराळे हे एक आहेत.  गुरुवारी त्यांनी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक धक्कादायक विधान केले. नगराळे म्हणाले, ‘भ्रष्टाचार हा  केवळ पोलीस, वन व महसूल विभागातच आहे असे नाही.   भ्रष्टाचाराचा नायनाट  करणे कठीण आहे.   तो व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. त्यांना अटक करून शिक्षा करणे हाच एकमेव पर्याय आहे.’ आता बोला. भ्रष्टाचार हा  कन्सर आहे असे सत्ताधारी म्हणतात. पण इथे पोलीस महासंचालकच  म्हणतो आहे, की भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. मग आपली व्यवस्था किडली आहे का?  असा प्रश्न उपस्थित होतो.

              राज्याचा कुणी पोलीसप्रमुख प्रथमच  इतका रोखठोक बोलला आहे.  भ्रष्टाचाराला   हटवण्याच्या मार्गातली  हतबलताही  त्यांच्या बोलण्यातून दिसून  येते.  भ्रष्टाचार हटवण्याच्या मुद्यावर जयप्रकाश नारायण यांच्यापासून तो  विश्वनाथ प्रताप  सिंग, आताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. पण भ्रष्टाचार हटवू  शकले नाहीत.  ह्या पार्श्वभूमीवर  नगराळे वास्तव तेच बोलले. पण लोकांना स्वस्थ करून गेले.

                         पोलीस महासंचालक असे कसे बोलू शकतात? म्हणून काही जण थयथयाट  करीत आहेत. पण नगराळे  काय चुकीचे बोलले?  दुर्जन होण्याची संधी न मिळाल्याने सज्जन राहिलेल्या लोकांची संख्या  या जगात  प्रचंड आहे. पण भ्रष्टाचारीही  कमी नाहीत.  आज तर भ्रष्टाचार आपला डीएनए बनू पाहतो आहे. त्यामुळे नगराळे लोकांच्या मनातलेच बोलले. तसे पाहिले तर  उशिरा बोलले.  बोलायची गरज नाही.  रोज आपल्याला रस्त्यावर  तो पदोपदी दिसतो. काही पोलीस तर मोकळे बोलतात. पगार मिळाला नाही तरी चालेल. तो दंडा  आमच्या हाती असला पहिजे.  सरकारी बाबू म्हणतात,  पगार नसला तरी चालेल. पण त्या खुर्चीत बसू द्या.  मग आम्ही आमचे पाहून घेऊ.  तो दांडा, ती  खुर्ची, त्यामुळे मिळालेला अधिकार आज  भ्रष्टाचाराचे लायसन्स बनले आहेत.  ‘आपण न्यायालयात जाणार नाही’ असे  माजी सरन्यायाधीश  रंजन गोगोई   म्हणतात, याचा अर्थ काय?  भ्रष्टाचाराची किती रूपं  सांगायची? त्यांनी  प्रामाणिकपणा गहाण  ठेवल्यानेच आज देशावर  ही वेळ आली. आणि  म्हणून भ्रष्टाचार  खणून काढण्याच्या भानगडीत कुणी पडू नये.  रामराज्य कल्पनेतच रम्य असते. एक सांगू का? सामान्य माणसाला याच्याशी काही घेणेदेणे नाही.  चिरीमिरी देऊन तो आपले काम काढून घेतो? राजकारणी मात्र भ्रष्टाचाराचा  इश्यू बनवतात. त्या जोरावर  सत्तेत येऊन  भ्रष्टाचार करायला मोकळे  होतात.  कडू वाटले तरी हे वास्तव आहे. हमाम मे सब नंगे है. कोण कोणाला बोलणार? हर्षद मेहता आज या जगात नाही.  पण आपल्या किडलेल्या  व्यवस्थेने   विजय मल्या,  निरव मोदी    यासारख्या  माणसांना जन्म दिलाच की. व्यवस्था   कोण सुधारणार?

0 Comments

No Comment.