उशिरा आलेला राजीनामा

Editorial Maharashtra
Spread the love

अखेर   महाविकास आघाडी सरकारमधले  वनमंत्री संजय राठोड यांनी  राजीनामा दिला.  दिला म्हणण्यापेक्षा  त्यांना द्यावा लागला.  विधानसभा अधिवेशन  नसते तर हा राजीनामा आणखी लांबला असता. पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या संशयास्पद मृत्युच्या वादात अडकलेले  संजय राठोड यांनी  सुरुवातीलाच राजीनामा  दिला असता तर   उद्धव  ठाकरे सरकारच्या अब्रूचे एवढे धिंडवडे निघाले नसते.  यात  उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.    कर्तव्यकठोर  नेता म्हणून  उद्धव यांची प्रतिमा होती. पण यावेळी त्यांच्यातला ‘वाघ’ गायब दिसला.  मला चांगले आठवते. २५ वर्षांपूर्वी  युतीच्या सरकारमध्ये  शिवसेनेचे दोन मंत्री  घोटाळ्यात अडकले तेव्हा बाळासाहेब  ठाकरेंनी  लगेच त्यांचा राजीनामा घ्यायला  भाग पडले होते.  उद्धव ठाकरे पोलीस तपासाचा आग्रह का धरून होते हे कोडे अजून उलगडत नाही.  इथे नैतिक मुल्यांचा  मामला होता. राजीनामा घेऊन  त्यांना तपास लवकर करवता  आला असता. मिडीयाने  प्रकरण लावून धरले नसते तर काहीही झाले नसते.  मीडियाची ताकद इथे दिसली.  सरकारवर प्रचंड दबाव आला. पाणी नाकातोंडात जाऊ लागले तेव्हा   उद्धव यांनी तलवार उपसली. पण तो पर्यंत भाजपने  शिकार साधली होती.

                    ह्या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचे  वागणे संशयास्पद होते.  शिवसेनेतील एक गट  त्यांच्या पाठीशी होता.   अशाच प्रकरणात राष्ट्रवादीने  त्यांच्या मंत्र्याला म्हणजे धनंजय मुंडे यांना वाचवले. मग आपल्या मंत्र्याचा का बळी द्यायचा? असे  सेनेच्या काही  नेत्यांचे म्हणणे होते. इथेच गल्लत  झाली. दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत.    मुंडे लगेच  कबुली देऊन मोकळे झाले होते. इथे मात्र पूजाच्या मृत्युनंतर  संजय राठोड  गायब झाले.  तब्बल १५ दिवस ते  लपून होते.   बाहेर प्रगट  होताना त्यांनी  आपल्या बंजारा समाजाच्या  धर्मपिठाचा  आश्रय  घेतला.  पोहरादेवी गडावर प्रचंड  गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले.  त्यांची धडपड समजू शकते. पण पोलीस काय करीत होते? या मामल्यात पोलीस  आपल्या प्रतिष्ठेला जगले नाहीत.  संजय-पूजाचे फोटो, ऑडीओ क्लिप्स जोरात वाजत असताना पुण्याचे पोलीस कानात  बोळे टाकून बसले होते.  २० दिवस उलटूनही  साधा गुन्हा   दाखल केला नाही.   मोठ्या माणसांच्या प्रकरणात पोलीस असेच वागतात.  पूजाच्या निमित्ताने हे उघड गुपित बाहेर आले.  देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर  कारवाई करा. काय कारवाई करणार? वरून वेगळा आदेश  आला असेल तर तो तरी बिचारा काय करणार?

                राष्ट्रवादीचे  सुप्रीमो शरद पवार हे ह्या सरकारचे मार्गदर्शक आहेत असे म्हटले जाते.  पवारांसारखा तेल लावलेला पहेलवान  सोबत असताना  शिवसेनेची फजिती झाली.  की पवारांना हेच हवे होते?   ‘ऑपरेशन लोटस’शी याचा काही संबंध आहे काय?  लोकांचा मनात शंका आहे.

 203 Total Likes and Views

0 Comments

No Comment.